विजय देवधर - केजिबी चे अंतरंग दर्जा - *****
रहस्यकथा, गूढकथांचे लेखन करण्यात हातखंडा असलेले लेखक आणि इंग्रजीतील उत्तमोत्तम कादंबऱ्यांना मराठी वाचकांपर्यंत नेणारे अनुवादक विजय देवधर हे मराठीतील एक लोकप्रिय लेखक आहेत. देवधर यांनी गेली सुमारे तीन दशके वाचकांना एका वेगळ्या विश्वाचे दर्शन घडविले. गूढ, अद्भुत, रहस्य, चमत्कार, साहस, शौर्य, इतिहास यांचे त्यांना आकर्षण होते. या अद्भुतरम्य जगाच्या ओढीनेच त्यांनी कादंबऱ्या आणि कथांचे लेखन केले. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटरिऑलॉजी’ या हवमानशास्त्राशी संबंधत संस्थेत नोकरी करीत असतानाच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. प्रारंभी ‘विचित्र विश्व’, ‘नवल’मधून त्यांचे लेखन प्रसिद्ध झाले. अगाथा ख्रिस्ती, सिडनी शेल्डन, आयर्विंग वॅलेस, फ्रेडरिक फोरसिथ, जेम्स हॅडली चेस, इयान फ्लेमिंग अशा इंग्रजीतील लोकप्रिय लेखकांच्या कादंबऱ्यांचे त्यांनी अनुवाद केले. मात्र ते अनुवाद न वाटता मूळ कलाकृतीच वाटावी, एवढे सरस उतरले आहेत. या वैशिष्ट्यामुळे मेमरीज ऑफ मिडनाइट, डुम्सडे कॉन्स्पिरसी, रेज ऑफ एंजल्स, ब्लड लाइन, सेवन्थ सिक्रेट, डेझर्टर आदी अनुवादित पुस्तकांमध्ये वाचकाला खिळवून ठेवण्याचे सामर्थ्य होते...