पाउलो कोएल्हो - द अलकेमीस्ट ★★★★
गेल्या कित्येक वर्षांपासून पुस्तकांच्या दुनियेत आणि साहित्य वर्तुळात 'अलकेमीस्ट' (The Alchemist) या नावाची जोरदार चर्चा मी ऐकत आलो आहे. तुम्ही कोणत्याही बुकस्टोअरमध्ये जा किंवा ॲमेझॉनसारख्या ऑनलाईन शॉपिंग साइटवर फेरफटका मारा, 'बेस्टसेलर' या शीर्षकाखाली हे पुस्तक नेहमीच झळकताना दिसते. त्याचे मुखपृष्ठ आणि त्यावरील अफाट खपाचे आकडे पाहून साहजिकच कोणालाही उत्सुकता वाटावी, तशीच ती मलाही वाटली होती. पण गमतीचा भाग असा की, या पुस्तकाच्या नावावरून माझा सुरुवातीला एक मोठा गैरसमज झाला होता. शालेय जीवनात विज्ञानाचा अभ्यास करताना आम्ही 'किमयागार' किंवा 'अलकेमीस्ट' यांच्याबद्दल वाचले होते. हे असे प्राचीन संशोधक होते, जे सामान्य धातूंचे, विशेषतः लोखंडाचे सोने बनवण्याच्या प्रयत्नात आयुष्य खर्ची घालत असत. 'परीस' या काल्पनिक दगडाचा शोध हे त्यांचे ध्येय असे. त्यामुळे मला वाटले की, हे पुस्तक कदाचित त्या प्राचीन विज्ञानावर किंवा त्या संशोधकांच्या चरित्रावर आधारित एखादे माहितीपर पुस्तक असावे. याच कुतूहलापोटी आणि काही अंशी सामाजिक दबावापोटी (कारण 'हे पुस्तक वाचलेच प...