मी वाय. सी. - यादवराव पवार (दर्जा *****)

“मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील बेताज बादशहा वरदाभाई उर्फ वरदराजन मुदलियार याचे साम्राज्य उध्वस्त करणा़ऱ्या वाय. सी. पवार नावाच्या पोलीस खात्यातील झंझावाताची ही आत्मकथा. संकल्प पक्का असेल आणि ध्येय निश्चित असेल तर साध्या कुटुंबात जन्म घेतलेला एक पोलीस अधिकारी गुंडगिरी, भ्रष्टाचार आणि दंगली यांच्यावरही अंकुश ठेवू शकतो. चांगुलपणाचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि कठोरतेचे जिवंत प्रतिक असलेल्या या सच्चा पोलीस अधिकऱ्याचे वादळी आत्मचरित्र एकूणच खचलेल्या समाजजीवनाच्या अंध:कारात आशेचा किरण ठरेल.”
माझा जन्म मुंबईत झाला. १९७२ पासून ते १९९६ पर्यंतचा काळ मी मुंबईत काढला. मुंबईत असताना या महानगराचे फायदे जसे झाले तसेच त्याच्या समस्यांचीही जाण झाली. भारतभरहून येणाऱया नशिब आजमावणाऱ्यांचे लोंढे आणि त्यांना आश्रय देणाऱ्या येथील झोपडपट्ट्या. ह्या झोपडपट्ट्या म्हणजे गुन्हेगारांचे आगार झाले होते. पोलीसही त्यांना हप्त्यासाठी साथ द्यायचे. अशावेळी वाय. सी. पवार या कर्तबगार पोलीस अधिकाऱ्याचे आगमन झाले. त्यांनी आपल्या कारकीर्दीत मुंबईतल्या गुन्हेगारीचा पुरता बिमोड केला. तो मी स्वत: अनुभवला होता. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या उत्सुकतेपोटी हे पुस्तक मी वाचायला घेतले.
लेखन अतिशय सुरेख झालेले असून धावते आहे. त्यामुळे कुठेही रटाळपणा आलेला नाही. वाय. सींचे आयुष्य प्रसंगांनी भरलेले असल्यामुळे ३६८ पानांचे पुस्तक लिहूनही बऱ्याच गोष्टी त्यांनी थोडक्यात आवरत्या घेतल्या आहे. बऱ्याच ठीकाणी व्याकरणाच्या चुका असून एखाद्या भाषातज्ञाकडून प्रूफ तपासावयास हवे होते. एकंदरीत पुस्तक अतिशय सुंदर असून वाचक ते वाचताना भारवून जातो. सध्याच्या परीस्थितीत जेव्हा इमानदार पोलीस सापडणे दुर्मिळ झाले आहे, वाय. सी. पवारांच्या कारकीर्दिकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा