Book Review : कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★
आपल्या लेखनात पानसरे यांनी शिवाजी आपल्या काळातल्या इतर राजांत आगळा वेगळा कसा होता हे दाखवले आहे. लोकशाहीत जिथे कोणत्याही राजाचे अस्तित्व नाकारले जाते, तिथे शिवाजी राजाचे नाव मात्र आदराने घेतले जाते, त्याची जयंती साजरी केली जाते. याचीच कारण मीमांसा या पुस्तकात लेखकाने केली आहे. ज्या काळात जुलूमी राजेशाही भारतात बोकाळली होती, तिथे या रयतेच्या राजाने जन्म घेतला व जन कल्याणासाठी आणि स्वराज्याच्या स्थापनेसाठी पूर्ण आयुष्य खर्ची घातले. शिवाजी राजांविषयी असलेल्या आत्मीयतेमुळेच अनेक लोकांनी त्यांच्या प्राणांची आहूती दिली याचे अनेक दाखले पानसरे यांनी या पुस्तकात दिले आहेत.
पानसरे ज्या कम्यूनिस्ट विचारसरणीचे होते, त्यात कायम राजेशाहीला सक्त विरोध होत आला आहे. परंतू पानसरेंचे मत शिवाजी राजांबद्दल अनुकूल दिसते. ती तशी का आहे याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. शिवाजी राजे रयतेची कणव असलेले होते, त्यांच्या काळात त्यांनी रयतेची जुलुमी जमीनदारांपासून त्यांची मुक्तता केली, शेतसारा वासुलीच्या कायद्यात सुधारणा केली, दुष्काळात सारा माफ केला इत्यादि कार्यांचे वर्णन आहे. विदेशी विचारवंतांनीही याबाबत शिवाजीची स्तुति केली आहे असे ते म्हणतात. त्यांचे लक्ष्य अति उजव्या विचारसरणीच्या राजकीय संगठनांना रूचणार नाही यात काहीच शंका नाही. आजकाल काही लोकांकडून इतिहासाला जो धार्मिक रंग दिला जात आहे त्याला त्यांनी कडाडून विरोध केला आहे. त्यांच्यामते त्यावेळचे राजकारण पूर्णपणे स्वार्थावर आधारित होते, आपण कुठल्या धर्माचे आहोत आणि कुठल्या धर्माविरूद्ध लढत आहोत याला काहीच महत्त्व नव्हते.
प्रत्यक्षात शिवाजी महाराजांचे कार्य आणि अनुयायी यांचा मागोवा घेतला असता, ते धर्मश्रद्ध होते पण धर्मद्वेष्टे नव्हते असे दिसून येते. फक्त सध्याच्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपल्या सोईनुसार त्याचा अर्थ काढलेला दिसतो. काहींनी तर त्यांना देवत्वही दिलेले आहे. पानसरेंनी या सर्व विपर्यासांचा समाचार आपल्या पुस्तकात घेतला आहे. या पुस्तकातले विचार अनेकांना रूचणार नाही. पण तटस्थपणे पाहिले असता त्यात तथ्य असल्याचे दिसून येते. इतिहासात जे होऊन गेले ते गेले ते विसरून, आपण सर्वांनी भविष्यकाळाचा विचार करून, त्यात ज्या वाईट गोष्टी झाल्या त्यांचा त्याग करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे तरच आपले आणि आपल्या भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते असे आवाहन लेखकाने पुस्तकाच्या शेवटी केले आहे.
सरते शेवटी पानसरे यांनी शिवाजी महाराजांबद्दल झालेला त्याकाळचा पत्र व्यवहार दिलेला आहे. त्यात त्यांची आपल्या रयतेविषयी कळवळ स्पष्ट दिसून येते. आपल्या रयतेस कुठल्याही शासकिय अधिकार्याने त्रास देऊ नये, अडीअडचणीच्या काळी त्यांना मदत करावी असे स्पष्ट आदेश महाराजांनी काढले होते. पुस्तकाच्या अंती सुप्रसिद्ध लेखक नरहर करूंदकर यांच्या "छत्रपती शिवाजी महाराज जीवनरहस्य" या पुस्तकातील दोन टिप्पण्या सुद्धा दिलेल्या आहेत. श्री गोविंद पानसरे यांचे विचार अत्यंत पुरोगामी असल्यामुळे पुढे त्यांची हत्या झाली.
Comments
Post a Comment