Book Review : उत्तम अनुवाद दिवाळी २०१६ (पद्मगंधा प्रकाशन) (दर्जा **)

अनुवादीत साहित्याचा मी फार पुर्वीपासून भोक्ता आहे. जगातल्या गाजलेल्या कादंबऱ्यांचा मराठी अनुवाद वाचण्याचा आनंद वेगळाच आहे. परंतु अनुवादाचा दर्जा जर चांगला नसेल तर मात्र निराशा पदरी पडते. उत्तम अनुवाद हा दिवाळी अंक वाचताना नेमके हेच झाले. उत्तम अनुवाद हे नाव वाचताना वाचकांच्या अपेक्षा उंचावतात. यात नक्कीच दर्जेदार साहित्याचा दर्जेदार अनुवाद वाचायला मिळेल असे वाटते. परंतु या वार्षिकाने मात्र वाचकांची घोर निराशा केली आहे. प्रकाशकाने लेखांची निवड व्यवस्थित केलेली दिसत नाही. मुळ लेखनच फारसे चांगले नसल्याने अनुवादही फरसा वाचनीय झाला नाही. त्यात अनुवाद कर्त्यांचा दर्जाही सूमार दिसून येतो. त्यामुळे साहित्याची पुरती वाट लागलेली दिसते. कुठल्या अंगाने याला उत्तम अनुवाद म्हणावे हा प्रश्न पडतो.

पुर्ण पुस्तकात मला फक्त "स्टीफन - राशोलचा कवी" हा एकमेव लेख आवडला. १५०० साली पोर्तुगिजांनी गोवा बळकावल्यानंतर ख्रिश्चन मिशनऱ्यांनी केलेल्या सक्तीच्या धर्मांतराची माहिती यात मिळते. गोवा आणि सालसेत भागातल्या सारस्वत ब्राह्मणांना त्याकाळी धर्म वाचवण्यासाठी घरदार सोडून परागंदा व्हावे लागले होते. मी स्वत: सारस्वत ब्राह्मण असल्या कारणाने माझ्या पुर्वजांचा इतिहास मला वाचायला मिळाला. त्याकाळी अनेक युरोपिय प्रवासी भारतात फिरुन भारताची हेरगिरी करत होते. त्यांनी भारताची, भारतीय लोकांची आणि इथल्या राजकीय गोंधळाची माहिती एकत्र करुन ती युरोपीयन राज्यकर्त्यांना कळवली. या माहितीच्या आधारेच ईस्ट इंडीया कंपनीची स्थापना झाली आणि त्यांनी भारतातल्या कुमकुवत राज्यकर्त्यांची सता उलथवून भारत गिळंकृत केला. हि माहीती मनोरंजक होती. याव्यतीरीक्त संपूर्ण अंक वायफळ कथांनी भरला आहे.

हा अंक मी Dailyhunt या Android App वर ४० रुपयांना विकत घेतला होता. आता ते सर्व पैसे वाया गेल्याचे दु:ख होत आहे. छापील आवृत्ती तर तब्बल २०० रुपयांना उपलब्ध आहे. तो वाचणाऱ्यांचे बरेच नुकसान होईल. Dailyhint हे बातम्या आणि पुस्तके वाचण्याचे अ‍ॅप अद्यापी नवीन असून बाल्यावस्थेत आहे. त्यात बरेच मराठी साहित्य स्वस्तात उपलब्ध आहे. परंतु छापील साहित्याचे डीजीटल स्वरुपात रुपांतरीत करणे अजुनही त्यांना बरोबर जमत नाही असे दिसते. मी वाचत असलेल्या पुस्तकातही बऱ्याच तांत्रिक चुका होत्या.

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)