व्यंकटेश मांडगुळकर - गावाकडच्या गोष्टी ★★★★

हे मराठी लेखक, चित्रकार व स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांनी कथा, कादंबऱ्या, प्रवासवर्णनांसह चित्रपटांसाठी पटकथाही लिहिल्या. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. त्यांच्या पुस्तकातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.

एका दीर्घ प्रस्तावनेने या पुस्तकाची सुरुवात होते. लेखकाला अनेकांनी विचारले होते की तुम्हाला कथा कशा सुचतात. ते माडगूळकरांनी बरेच मनावर घेतलेले दिसते. लेखन ही एक उपजत कला असते. जो हाडाचा लेखक असतो त्याला सर्व आपोआप सुचत जाते, विचार करावा लागत नाही. आपल्या अवतीभोवती ज्या घटना घडतात त्याचा सूक्ष्म अभ्यास तो सतत करत असतो. तसे व्यंकटेश माडगूळकर हे भारदस्त नाव आम्ही लहान पणापासून ऐकत आलो आहे. आमच्या शाळेच्या पुस्तकांत त्यांचे काही लेखन होते. त्यावेळी त्याचा अभ्यास करायचा भयंकर कंटाळा यायचा. आता पन्नाशी ओलांडल्यावर त्यात आपोआपच रस निर्माण झाला आहे. ॲमेझॉनवर पुस्तक चाळता चाळता अचानक या पुस्तकावर नजर गेली. प्राईम रीडिंग मध्ये असल्यामुळे ते मोफत वाचनास उपलब्ध होते. वाटले मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन या उक्तीप्रमाणे लागलीच ते वाचून काढू.

पुस्तक तसे लहान आहे. पट्टीच्या वाचकाला ते एका दिवसात नव्हे एका बैठकीत संपवता येईल, पण मी त्यातला नाही. चघळत चघळत कथेचा पूर्ण रसास्वाद घेत सावकाश पुस्तक वाचणे हा माझा पिंड आहे. हे पुस्तक प्रथम 1951 मध्ये प्रकाशित झाले. यातील महाराष्ट्राच्या गावाकडचे केलेले चित्रण आता जरा कालबाह्य वाटते. आता महाराष्ट्रातील कुठल्याही गावात गेले असता गाव आणि शहरात फारसा फरक आढळून येत नाही. गावातील लोकांचे राहणीमान चांगलेच सुधारले आहे. शहरातील सर्व सोईसुविधा गावात उपलब्ध आहेत. मोबाइल आणि इंटरनेटनेही गावात क्रांति आणली आहे. स्मार्ट मोबाइल आणि इंटरनेटचा वापर माहीत नाही अस एखाद शेंबड पोरग दिसणेही आजकाल कठीण आहे. अशा परिस्थितीत या पुस्तकात दाखवलेली परकोटीची गरीबी आणि दुरवस्था सध्याच्या पिढीच्या पचनी पडणार नाही.

पुस्तकाची सुरुवात बोजा या कथेने होतो. या कथेचे प्रमुख पात्र नेवरा नावाचा गृहस्त असून तो त्याच्या कौटुंबिक समस्येने ग्रस्त असतो. त्याच्यावर मोठा कर्जाचा बोजा असतो व तो फेडता फेडता तो आणखी मोठ्या बोज्यात कसा अडकतो ते आपल्याला वाचायला मिळते. सोन्याची माडी या कथेत बामनांच्या तोडीला माडी बांधायला घेतो आणि कर्जबाजारी होतो. शेवटी ती विकली तरी सर्व लोक कायमची त्याला सोन्याची माडी म्हणूनच ओळखतील या धुंदीत राहतो. या आणि अशा अनेक मनोरंजक गोष्टींनी हे पुस्तक भरलेले आहे. ज्यांना गोष्टी ऐकायला आवडतात, त्यांच्यासाठी हे पुस्तक एक पर्वणी आहे. आधुनिक भारतात कालानुरूप अनेक बदल झाल्याने या कथा काहींना पटणार नाही, पण एक गंमत आणि नुकतच स्वातंत्र्य लाभलेल्या गरीब भारताची एक झलक म्हणून हे पुस्तक वाचायला हरकत नाही.

Comments

Popular posts from this blog

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★

Short Books Recommendations