अमिष त्रिपाठी - सुहेलदेव ★★★★
ही कथा 11 व्या शतकातील भारतात, विशेषतः उत्तर प्रदेशमधील बहराईच प्रदेशात घडते. तेव्हा भारतावर तुर्क आक्रमकांचा दबाव वाढत होता. महमूद गझनी आणि त्याच्या सैन्याच्या विध्वंसक आक्रमणांमुळे भारतीय संस्कृती, मंदिरे, आणि लोकजीवन धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर राजा सुहेलदेव आपला स्वराज्य, संस्कृती आणि लोकांचे संरक्षण करण्यासाठी उभा राहतो. राजा सुहेलदेव हा राजा मंगलध्वज यांचा पुत्र असतो. त्याचा भाऊ मल्लदेव गझनीच्या आक्रमणात मारला जातो. हा वैयक्तिक आघात आणि देशाच्या लूटमारीमुळे सुहेलदेव एका लढवय्या योद्ध्यात रूपांतरित होतो. पुढे जाऊन, तो विविध जाती-धर्मांचे वीर आपल्या बाजूला घेतो आणि एक शक्तिशाली सैन्य उभं करतो. कथेचा मुख्य टप्पा म्हणजे बहराइचची लढाई, जिथे सुहेलदेवने तुर्क आक्रमक सालार मकसूदला पराभूत केलं. ही लढाई केवळ तलवारींची नव्हती, ती भारताच्या अस्तित्वासाठीची लढाई होती.
लहानपणा पासून आपण सर्व गझनी च्या मूहम्मदाची कथा ऐकत आलो आहोत. त्याने 37 वेळा भारतावर सवारी केली आणि भारतातली अगणित संपत्ती लुटून पुन्हा गझनीत नेली. शेवटचा महान सम्राट हर्षवर्धन याच्या मृत्यूनंतर उत्तर भारतात एक मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली होती. वेगवेगळ्या परदेशात राज्य करणाऱ्या त्याच्या विविध अधिकाऱ्यांनी बंड पुकारून आपले स्वतंत्र राज्य स्थापन केले होते. अखंड आणि प्रबळ राज्यसत्ता जाऊन तेथे छोटी छोटी स्वतंत्र आणि कमजोर राज्ये तयार झाली होती. त्यांच्यात आपापसात संघर्ष चालू होता. बौद्ध धर्माच्या प्रचारामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर क्षात्र धर्माचा ऱ्हास झाला होता. त्याचा फायदा गझनीमध्ये नुकत्याच सत्तेवर आलेल्या महमुदाने घेतला.
या घटनेवर आधारित पुस्तक अमीष त्रिपाठी यांनी लिहिले आहे. त्यांची या आधीची शिव आणि राम सिरिज बरीच गाजली. पौराणिक कथा आधुनिक संदर्भ लावून लिहिण्याची त्यांची कला सर्वांना आवडली. पुढे त्या प्रकारची पुस्तके लिहिण्याची एक चढाओढच लागली. त्यातच अमीष यांचे सुहेलदेव हे पुस्तक प्रकाशित झाले. एकाच प्रकारची बरीच पुस्तके लिहिल्याने अमीष यांची लेखणी जरा बोथट झाल्याची तक्रार अनेक समीक्षकांनी केली आहे. या पुस्तकाच्या कथेचा संदर्भ सर्व प्रथम जहांगीर कालीन लेखक अब्दूर रहमान चिश्ती यांनी आपल्या मिरत-इ-मसुदी या ग्रंथातून घेतला आहे.
हे पुस्तक ऐतिहासिक घटनेवर आधारित काल्पनिक कथा असल्याने, यात लेखकाने आपल्या कल्पनेच्या भरारी प्रमाणे बरेच प्रसंग रेखाटले आहेत. त्यामुळे हे पुस्तक वास्तव घटनेची माहिती सांगत नाही. गझनीच्या मूहम्मदाने भारतावर केलेल्या हल्ल्याचा आणि विशेष करून सोमनाथ मंदिर भंग केल्याचा बदला घेण्यासाठी श्रावस्तीचा राजा सुहलदेवने, इतर हिंदू राजांची मदत घेऊन, त्यांचा वारस सलार मकसुद याचा युद्धात पराभव केला एवढेच कदाचित सत्य आहे. त्यात राजेंद्र चोळचा किती सहभाग होता हे जरा वादादित आहे. पुस्तकाच्या शेवटी राजेंद्र चोळने मूहम्मदाचा कसा खात्मा केला यावर अमीष वेगळे पुस्तक लिहीणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
मला अमीषचे लेखन आवडते. त्यात ऐतिहासिक संदर्भ घेऊन केलेले मनोरंजक आणि धावते लिखाण तो फार चांगला करतो. काही गोष्टींचे वर्णन जरा जास्त आणि रक्तरंजीत पणे करण्याची त्याची खोड त्याच्या सर्व पुस्तकांत दिसते. तलवारीने समोरच्यावर वार केल्यानंतर त्याने त्याचे स्नायू कसे कापले व त्याच्या नेमक्या कुठल्या हाडांचा चुरा झाला याचे वर्णन अमीष सर्जिकल प्रिसीशन ने करतो. अमीषची दोन-तीन पुस्तके वाचली की त्याच्या लेखनाचा आपल्याला अंदाज यायला लागतो आणि पुढे कथेत तो काय सांगणार आहे ते आधीच कळत. त्यामुळे त्याच्या लेखणीची धार हळूहळू बोथट होत चालली आहे असे वाटते आणि लेखनात तोच तोच पणा येत असल्याचे जाणवते. साऊथच्या चित्रपटांप्रमाणे सुरुवातीला हीरो व्हिलन कडून आधी सपाटून मार खातो आणि अगदी शेवटच्या क्षणी त्याच्या अंगात शक्ति संचारते आणि तो व्हीलनचा नाश करतो अशी काहीशी संकल्पना त्याच्या प्रत्येक पुस्तकात आढळते.
या पुस्तकात अमीषने धार्मिक बॅलेन्स राखण्याचा प्रयत्न केला आहे. परकीय आक्रमणा विरुद्धच्या लढ्यात हिंदू, बौद्ध आणि भारतीय मुस्लिम एकत्र लढले असे दाखवले आहे. भारतातील सूफी कल्पनेद्वारे इस्लामचे मवाळ रूप दाखवले आहे. अति हिंसाचार करणारे आणि कुठलीही सदसद्विवेक बुद्धी नसणारे रानटी तुर्की हे इस्लामचे खरे पाईक नसल्याचे सांगितले आहे. सध्याच्या काळात भारतात जे धार्मिक तेढ माजलेले आहे त्या विरुद्ध मुक भाष्य या पुस्तकात केलेले आहे. बौद्ध धर्माच्या अति अहिंसक भूमिकेमुळे भारताचे झालेले नुकसानही यात दिसून येते. बौद्ध धर्माचे दोन अनुयायी आपल्या गुरूच्या सल्ल्याविरूद्ध जाऊन सुहेलदेवच्या सैन्यात त्याला मदत करतात. संपूर्ण पुस्तकामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना ठळकपणे जाणवते. सुहेलदेवचं प्रत्येक पाऊल देशाच्या रक्षणासाठी आहे. त्याचं युद्ध हे केवळ व्यक्तिगत सूडासाठी नाही, तर भारताच्या संस्कृतीच्या रक्षणासाठी आहे. अमिषने पुस्तकात विशेष भर दिला आहे तो जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्र येण्यावर. सुहेलदेव स्वतः जाट समाजातून येतो, आणि त्याच्या सैन्यात सर्व स्तरांतील लोक आहेत. यातून सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला आहे. सुहेलदेव हे नेतृत्वाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. संकटाच्या काळात जनतेला एकत्र बांधणं, योग्य निर्णय घेणं आणि प्रेरणा देणं, हे गुण या पात्रात ठळकपणे दिसतात. त्याचे निर्णय वेळोवेळी कठोर असले, तरी न्याय्य असतात.
अमीषचे पुढील पुस्तक राजेंद्र चोळाच्या भूमिकेवर आधारित असून ते 29 ऑगस्ट 2025 ला प्रसिद्ध होणार आहे. ते मी वाचायचे ठरवले आहे. त्याकाळी दक्षिण भारतात आणि आग्नेय आशियात राजेंद्र चोळचा मोठा दबदबा होता. महंमदाच्या आक्रमणा विरुद्ध उशिरा का होईना पण ठोस मदत त्याने केली होती असे काही इतिहासकार मानतात. गझनीचा महंमदचा मृत्यू नैसर्गिक झाला नसून, राजेंद्र चोळच्या गुप्तहेरांनी त्याला विषप्रयोग करून मारले आणि सोमनाथ मंदिराच्या विध्वंसाचा सूड घेतला अशी आख्यायिका आहे. खरे काय खोटे काय हे तो सोमनाथच जाणे, परंतु आपण मात्र अशा अद्भुत कथा वाचून आपले मनोरंजन करून घ्यायचे आहे.
हे केवळ एका युद्धवीराची गाथा नाही, तर एका विस्मरणात गेलेल्या नायकाचं स्मरण आहे. अमिष त्रिपाठीने ही कथा अशा पद्धतीने मांडली आहे की वाचकाला इतिहासाची महती समजते आणि त्याचवेळी वर्तमानात प्रेरणा मिळते. राजा सुहेलदेव यांचं चित्रण आधुनिक भारताला नेतृत्व, एकता आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व पटवून देणाऱ्या उदाहरणांसारखं आहे. हे पुस्तक केवळ इतिहास प्रेमींसाठी नाही, तर जेव्हा एक प्रेरणादायी कथा हवी असते, राष्ट्रासाठी, संघर्षासाठी, आणि विजयासाठी, तेव्हा हे पुस्तक नक्की वाचावं असं वाटतं.

Comments
Post a Comment