मार्क टुली - इंडिया इन स्लो मोशन ★★★
तीस वर्षांहूनही अधिक काळ बी. बी. सी. चे भारतातील प्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मार्क टुली यांना 'वाईट सरकारी प्रशासन' या केवळ एकाच कारणामुळे भारताच्या प्रगतीला खीळ बसली आहे हे लक्षात आलं. अयोध्या प्रकरणानंतर खुद्द अयोध्येमधील हिंदू लोकांची सहिष्णू वृत्ती, गालिचे विणणार्या बालकामगारांच्या प्रश्नाचे खरे आणि राजकीय स्वरूप, तेहलका प्रकरणातून उघड झालेला संरक्षण खात्यातील भ्रष्टाचार, हैदराबादचे 'सायबराबाद' करण्याचा चन्द्राबाबू नायडू यांचा प्रयत्न, गुजराथमधील जलसंधारणाचे खाजगी स्तरावरील प्रयत्न त्याला होणारा सरकारी विरोध, शेतकर्यांच्या आत्महत्या, काश्मीरमधील खरी परिस्थिती अशा अनेक विषयांना मार्क टुली यांनी मर्मग्राही स्पर्श केलेला आहे. अनेक भारतीयांना अजूनही माहीत नसलेले असे एक वेगळे विश्व त्यांनी उलगडून दाखवलेले आहे. या सर्वांतून 'सारे जहॉंसे अच्छा' असलेला आपला भारत देश अजून मागे का रेंगाळतो आहे, याचे उत्तर त्यांनी फार समर्पकपणे दिले आहे.
गोरा माणूस दिसला की आपण त्याचे गुलाम होतो. या पुस्तकात मार्क टुली यांनी बीबीसी पत्रकार म्हणून ज्या लोकांची भेट घेतली त्यांनी त्यांच्यापुढे लोटांगण घातलेले दिसते. भारतीयांची ही प्रवृत्ती स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे लोटूनही बदललेली नाही असे दिसते. प्रत्येक जण भारतातली अव्यवस्था आणि भ्रस्टाचार यावर टीका करताना दिसतो. त्यावर समाधान काढताना दिसत नाही. मार्क टुली यांनाही एखाद्या विदेशी पत्रकाराप्रमाणे भारताची घाण दाखवण्यातच अधिक रस दिसतो. ज्यांनी वॅसीली मित्रोखिन यांचे "मित्रोखिन अरकाइवज" हे पुस्तक वाचले असेल त्यांना मार्क टुली हे सीआयए किंवा एमआय ६ एजंट वाटण्याची शक्यता अधिक वाटेल. या गुप्तहेर संस्था आपल्या स्पर्धक देशांत असे अनेक एजंट पत्रकारितेच्या बुरख्याखाली पाठवतात. त्यांच्यामार्फत त्या देशातल्या नेत्यांशी संधान साधून त्या देशाविरोधी कारवाया कसे करतात, ते या पुस्तकात इंग्लंडमध्ये पळून गेलेल्या मित्रोखिन या केजीबी एजंटच्या गौप्यस्फोटात दिसून येते. ज्या प्रकारे मार्क टुली, संत बक्ष या नेत्याबरोबर वैयक्तिक संबंध ठेऊन होते व त्यांच्याकडून त्याकाळातल्या कॉँग्रेस सरकारची आतली माहिती गोळा करत होते, यावरून अशीच शंका येते.
यापुस्तकात लेखकाने भारतात त्यांनी त्यांच्या पत्रकारीते दरम्यान भारतल्या विविध भागातल्या समस्यासंबंधी विविध लोकांशी घेतलेली भेट आणि त्यांना आलेला अनुभव या विषयावर आहे. काही ठीकाणी हे वर्णन रटाळ झालेले आहे. मार्क हे काही उत्तम लेखक आहेत अशातला भाग नाही. ते केवळ पत्रकार असून त्यांच्या लेखनशैलीला मर्यादा आहेत असे दिसून येते. हे पुस्तक २००३ साली प्रकाशित झाल्याने त्याचा संदर्भ त्याकाळापुरता मर्यादित आहे. ज्या वाचकांना त्याकाळातल्या भारतातले राजकीय वातावरण आणि समस्या जाणून घेण्यात रस असेल त्यांना कदाचित हे पुस्तक आवडेल. मी फक्त अनेक वेळा बीबीसीवर त्यांचे नाव ऐकल्याने आणि त्यांना हिन्दी भाषेत बऱ्यापैकी बोलताना ऐकल्या मुळे उत्सुकतेपोटी हे पुस्तक वाचले आणि ते मला काही फारसे आवडले नाही.

Comments
Post a Comment