लॅरी कॉलीन्स आणि डॉमिनिक लेपियर - फ्रीडम एट मिडनाइट ★★★★

फ्रीडम एट मिडनाइट हे लॅरी कॉलीन्स आणि डॉमिनिक लेपियर या विदेशी जोडगोळीने लिहिलेला भारताच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. साहजिकच तो त्यांच्या विदेशी दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. पाश्चिमात्य लोकांना भारतीय संस्कृती आणि विचारधारा नीट समजत नाही आणि भारतातील अनेक पारंपारीक संकल्पना त्यांना वेडगळ वाटतात. भारतीय लोकांच्या दारीद्र्याचे आणि गलीच्छपणाचे वर्णन करताना, त्यांची ती अवस्था, त्यांच्यावर १५० वर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटीश लोकांच्या अमानुष पिळवणुकीने झाली आहे, याचा त्यांना विसर पडतो. पुस्तकात भारतीय लोकांच्या अजागळपणाचा तिरस्कार आणि ब्रिटिश लोकांच्या शिस्तबद्द आचरणाचे कौतुक केलेले आहे. लॉर्ड माऊंटबॅटन नसते तर भारताची वाट लागली असती असा सुर या पुस्तकात बघायला मिळतो.

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येत भारतात भयंकर गोंधळ चालला होता. दुसऱ्या महायुद्धात पोळून निघल्यानंतर आपल्या वसाहतींच्या बोज्यातून अचानकपणे बाहेर पडण्याची ब्रिटनला घाई झाली होती. अचानक त्यांचा भारतातील रस कमी झाला होता. भारतातील व्यवस्था लवकरात लवकर भारतीय नेत्यांच्या बोकांडी मारून त्यांना पलायन करायचे होते. तरी आम्ही शिस्तबद्धरित्या भारत सोडत आहोत असे भासवण्यासाठी मॉऊंटबॅटन या ब्रिटनच्या राजाच्या नातेवाईकाला बळच व्हाईसरॉय म्हणून भारतात पाठवण्यात आले. त्याने अगदी सहा महिन्यात भारताला पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा घाट घातला. ना पुरेसा वेळ ना कुठले नियोजन. रॅडक्लीफ नावाच्या भारत कधीही न पाहिलेल्या वकीलाला प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन न करता, ऑफिस मध्ये बसून, नकाशावर रेघोट्या ओढून भारताचे विभाजन करण्याचे काम सोपवण्यात आले. या अनागोंदीमुळे २० लाख लोकांचा बळी गेला आणि करोडो लोकांचे विना नियोजन स्थलांतर झाले. भारत सोडणाच्या रागातून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मुद्दाम हे घडवून आणले हे आपल्याला सहज समजून येते. परंतु या पुस्तकात लेखकांनी ब्रिटिशांची बाजू उचलून धरली आहे. शेकडो वर्षे भारतावर राज्य करून, मागासलेल्या भारताची सुधारणा केल्यानंतर भारताला वाऱ्यावर सोडून जाताना त्यांना अतिशय दु:ख झाले असे ते भासवतात. भारतीय नेते प्रशासन सांभाळण्यास नालायक असल्याने त्यांनी मॉऊंटबॅटन यांना ते सांभाळण्याची विनंती केली आणि ती विनंती मान्य करून त्यांनी भारतावर उपकार केले असे म्हटले आहे.

प्रत्यक्ष दुसऱ्या महायुद्धानंतर झालेल्या महाविनाशामुळे ब्रिटीशांना आपल्या वसाहती सोडणे भाग पडले. परंतु गांधीजींच्या अहिंसात्मक आंदोलनामुळे ब्रिटिशांनी भारत सोडला असा पोकळ युक्तिवाद पुस्तकात करण्यात आला आहे. अर्धेअधिक पुस्तक तर गांधीजींच्या कौतुकानेच भरलेले आहे. जर दुसऱ्या महायुद्धाचा झटका बसला नसता, तर ब्रिटिशांनी जगातल्या कुठल्याही वसाहतीवरील आपली पोलादी पकड ढिली केली नसती हे सर्वमान्य आहे. ब्रिटिश मुत्सद्दी विन्स्टन चर्चिल यांना ते कदापी मान्य नव्हते. अनेक वर्षानंतर भारताला स्वातंत्र्य देण्याची उपरती झाल्याने भारतीय नेत्यांनाही ती पदरात पाडून घेण्याची घाई करणे भाग पडले. ब्रिटिशांच्या काळात १९२० नंतर भारतात लोकसंख्येचा स्फोट झाला. ब्रिटिश त्यांचा स्वार्थ सोडला तर कुठल्याही नियोजनात लक्ष घालत नव्हते. त्यामुळे संपूर्ण भारताचे रूपांतर एका बकाल झोपडपट्टीमध्ये झाले होते. या बजबजपुरीचे संतापजनक परंतु सार्थ वर्णन लेखकांनी केले आहे. त्या परिस्थितीस ब्रिटिश हेच कारणीभूत होते असे त्यांनी लिहिलेले नाही. गांधीजींचे कमी कपड्यात राहण्याचे कारण त्यांना उमजलेले दिसत नाही. त्याद्वारे ब्रिटिशांनी भारताची अवस्था काय केली आहे हे त्यांना जगाला दाखवायचे होते. 

भारतातील इंग्रजधार्जिण्या आणि अय्याश संस्थानिकांचे घृणास्पद वर्तन पाहता यांनी त्याकाळात भारत ब्रिटीशांना विकला होता असे दिसते. ब्रिटिशांनीही धूर्तपणे त्यांचा उपयोग बंडखोर भारतीयांना काबूत ठेवण्यासाठी पद्धतशिरपणे केला. १८५७ चे बंड फसण्यात असेच लबाड संस्थानिक कारणीभूत होते. भारतातील हिंदू मुस्लिम फूटीचाही त्यांना फायदा झाला. भारतातून जाता जाता भारताची ढोबळ फाळणी करून त्याचा बदला ब्रिटिशांनी घेतला. १७५७ च्या प्लासीच्या लढाईतील विजयापासून १९४७ च्या स्वातंत्र्यापर्यन्त ब्रिटिशांनी भारताची ६५ ट्रिल्यन डॉलर्स इतक्या संपत्तीची लुट केली असे एका आर्थिक संस्थेने अंदाज बांधला आहे. त्या संपत्तीच्या जोरावरच आज महाराष्ट्राएवढा असलेला ब्रिटन जगातील टॉप ५ अर्थव्यवस्थेत चमकताना दिसतो. २० लाख निष्पाप लोकांच्या हत्येस आणि करोडो लोकांच्या स्थलांतरास कारणीभूत ठरलेल्या, विनानियोजन आणि घाईघाईने केलेल्या फाळणीस जबाबदार असणाऱ्या लुईस मॉऊंटबॅटन आणि डॅनियल रॅडक्लीफ यांना दोषी ठरवून फासावर का देण्यात आले नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. नेहरू आणि पटेल ही त्यास तितकेच जबाबदार आहेत.

पुस्तकात  गांधीजींना आणि  मॉऊंटबॅटन अवास्तव महत्व दिलेले आहे. काही ठिकाणी त्यांच्या कमी वस्त्रांची आणि कृश देहयष्टीची चेष्टाही केली आहे. नेहरू आणि पटेल यांना अक्षरशः वेड्यात काढले आहे.  गांधीजींमुळे पंजाब जळत असताना कलकत्ता शांत राहिले, हा एक चमत्कार होता असे लिहिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभा यांना विलन बनवले आहे. नथुराम गोडसे आणि त्यांच्या साथीदारांनी गांधींची हत्या कशी केली, त्यास तत्कालीन पोलिसांचा नाकर्तेपणा कसा कारणीभूत झाला यावर अनेक पाने खर्च केली आहेत. पुस्तकाची भाषा ओघवती आहे त्यामुळे पुस्तक वाचनास सुलभ आहे. लेखकांचा दृष्टिकोण पाश्चिमात्य आहे, त्यामुळे तो भारतीय वाचकांस पटेलच असे नाही. एकंदरीत भारताला स्वातंत्र्य कसे मिळाले, भारताची फाळणी कशी झाली , त्याचे भारतावर काय परिणाम झाले याचा काहीशी निष्पक्ष माहिती ज्यांना हवी आहे, त्यांनी हे पुस्तक जरूर वाचावे.

Comments

Popular posts from this blog

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★

Short Books Recommendations