किंगशुक नाग - किंगफिजर ★★★★

विठ्ठल माल्या हे अत्यंत हुशार बिजनेसमेन होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अत्यंत कंजूषपणे बिजनेस चालवला आणि शून्यातून यूनायटेड ब्रेवरीजचे साम्राज्य विकसित केले. कंपन्यांचे बॅलेन्स शिट तपासण्यात वाकबगार असलेले विठ्ठल, तोट्यात चाललेले उद्योग विकत घ्यायचे आणि ते आपल्या उद्योगात सामाऊन घेऊन आपल्या व्यवस्थापन कौशल्यातून ते फायद्यात आणायचे. आपले संपूर्ण आयुष्य ते अत्यंत साधेपणाने राहीले. आपल्या एकेक पैशाचा हिशेब ते अत्यंत सचोटीने ठेवायचे. 1983 मध्ये त्यांच्या अकाली मृत्युनंतर हे साम्राज्य विजय माल्या यांच्या पदरात पडले. त्याची त्यांनी कशी वाट लावली याचा वृत्तान्त या पुस्तकात आहे. 

सुरुवातीला बाप से बेटा सवाई या न्यायाने विजय मल्ल्या यांनी कंपनीची भरपूर प्रगती केली, परंतु कालांतराने या यशाची नशा त्यांच्या डोक्यात शिरली. त्यांनी त्यांच्या भोवती खुशमस्कारांची प्रभावळ निर्माण केली. साहेबांची थुंकी झेलायची एवढेच त्यांचे काम होते. त्यांनी अनेक महत्त्वाच्या निर्णयावर विजय माल्ल्या यांची दिशाभूल केली. जे त्यांना योग्य मार्गदर्शन करत होते त्यांचे ते ऐकेनासे झाले. त्यांचे वर्तन आपल्या वडिलांच्या बिलकुल विरुद्ध होते. त्यांच्या वडिलांनी शून्यातून विश्व निर्माण केले तर त्यांनी आपल्या मनमानी कारभाराने हे विश्व खड्ड्यात घातले . किंगशुक नाग यांनी याबद्दल या पुस्तकात बराच उहापोह केला आहे. प्रत्येक व्यवहाराची सविस्तर आकडेवारी सादर केली आहे

बिजनेस म्हणजे रिस्क घेणे हे ओघानेच आले, परंतु ही रिस्क किती घ्यावी यालाही काही मर्यादा असतात. ती मर्यादा ओलांडली की कधीही न भरून येणारे नुकसान होते, हे विजय मल्ल्या यांना हे कधीच कळले नाही. ते एका मागोमाग एक चुकीचे निर्णय घेत गेले व कर्ज बाजारी झाले, शेवटी त्यांना देश सोडून पलायन करावे लागले. विजय मल्ल्या यांच्यासारख्या अनुभवी बिजनेसमनला हे शोभले नाही. माणूस एकदा चूक करू शकतो परंतु वारंवार चुका करू शकत नाही. कंपनीच्या विकासासाठी घेतलेले कर्जाचे पैसे परस्पर परदेशातील आपल्या खात्यात वर्ग करणे हा अक्षम्य गुन्हाही त्यांनी केला. आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार करायला पैसे नसताना वैयक्तिक वाढदिवसावर कोट्यवधी रुपये खर्च केले. या आणि अशा अनेक गोष्टी त्यांना कायद्यासमोर आणि आम जनतेसमोर गुन्हेगार ठरवते. 

आपल्या बापाने अत्यंत सचोटीने आणि कौशल्याने उभारलेला उद्योग विजय यांनी अक्षरशः उधळून लावला. किंगशुक नाग यांनी या पुस्तकात अत्यंत सोप्या भाषेत त्यांचा हा प्रवास उलगडून दिला आहे. विजय यांचे नेमके कुठे चुकले याचे आकड्यांसह विश्लेषण त्यांनी केले आहे. हे पुस्तक म्हणजे वृत्तपत्र कात्रणांचा संग्रह आहे अशी टीका काही लोकांनी केली आहे, ती काही अंशी खरी आहे आणि लेखकाने त्याची प्रांजळ कबुलीही आपल्या पुस्तकात दिली आहे. परंतु त्यामुळे या पुस्तकाचे माहिती मुल्य कुठेही कमी झालेले नाही. त्यांचे लेखन अत्यंत ओघवते आणि मार्मिक आहे. काही वेळा जरा आकडेवारींचा अती मारा झाल्याने पुस्तक थोडे कंटाळवाणे होते, परंतु एकंदरीत विजय माल्या यांचा इतिहास ज्यांना जाणून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. या पुस्तकातून यापुढे होऊ घातलेल्या नवउद्योजकांनी नक्की धडा घेण्यासारखा आहे. आपल्या भोवती खुशमस्कऱ्यांचे वर्तुळ निर्माण केल्याने आणि आपल्यावर टीका करणाऱ्या मित्रांचे न ऐकल्याने आपला कसा विनाश होतो, हे विजय माल्या यांच्या या चरित्रातून शिकायला मिळते. 


Comments

Popular posts from this blog

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★

Short Books Recommendations