अनिल लांबा - फ्लर्टींग विथ स्टॉकस् ★★★

अनिल लांबा यांच्या फ्लर्टींग विथ स्टॉकस् या पुस्तकातील एक छोटा उतारा एकदा एका वर्तमानपत्रात माझ्या वाचनात आला. तो मला अत्यंत उत्कंठावर्धक वाटला आणि मी हे पुस्तक वाचायचे ठरवले. त्या उताऱ्यात शेअरमार्केट संदर्भातल्या लोकांच्या आयुष्यातला एक छान प्रसंग चित्रित केला होता. त्या उताऱ्यावरून हे पुस्तक काहीसे कथा स्वरूपात आहे असे माझे मत झाले होते. पण हे पुस्तक वाचायला घेतल्यावर माझी निराशा झाली. हे पुस्तक एक स्टॉक मार्केटचे मॅन्युअल असून त्यात त्यातील विविध संदर्भांचा अर्थ सांगितला आहे, हे माझ्या लक्षात आले. प्रत्यक्ष जीवनातले गंमतीदार प्रसंग फार कमी दिलेले आहेत.

लेखक अनिल लांबा हे एक चार्टर्ड अकाऊंटंट असल्यामुळे त्याचा प्रभाव या पुस्तकावर पडला आहे. एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटने (गुंतवणूकदाराने नव्हे) स्टॉक मार्केटचे विश्लेषण कंपन्यांच्या नफा-नुकसानीच्या (बॅलेन्स शीट) आकडेवारीवरुन कसे करावे, त्यातील विवध संदर्भांचा अर्थ काय याचा विचार पुस्तकात केला आहे. परंतु सर्वसाधारण गुंतवणूकदार हे आकडे कसे फसवे असतात हे जाणतो. चांगली कंपनी शोधण्यासाठी कुठल्याही आकडेवारीचा अभ्यास करण्याची गरज नसते. कुठल्याही चांगल्या फायनॅन्शीयल वेबसाइटवर ती आयती मिळते. त्यातून ती गुंतवणुकीयोग्य आहे का नाही हेही स्पष्टपणे सुचवलेले असते. त्यामुळे हा अकाऊंटंटचा क्लिष्ट अभ्यास करण्याची सर्वसाधारण गुंतवणूकदारास गरज पडत नाही. निम्याहून अधिक पुस्तक अशा अर्थहीन विश्लेशणाने भरलेले आहे.

शेयर मार्केटची गुंतवणूक ही 50% कौशल्य आणि 50% नशीब या तत्वावर चालते. जोपर्यंत आपल्याला उद्या काय होणार हे माहीत नाही, तोपर्यंत तुम्ही आकड्यांचा कितीही अभ्यास केला तरी, एखाद्या चांगल्या शेयरमध्ये नुकसान होऊ शकते आणि एखाद्या टुकार शेयर मध्ये फायदा होऊ शकतो. लेखकाने हे प्रांजळपणे कबूल केले आहे की त्यांनी सुरुवातीला एक गुंतवणूक सल्लागार कंपनी स्थापन केली होती ज्याचा अल्पावधीतच बोजवारा उडाला. माझ्या अनुभवानुसार जो माणूस शेयरबाजारात प्रत्यक्ष उभा असतो (गुजराती,मारवाडी आणि सिंधी) तोच खरा मार्केटच्या लाटेवर स्वार होऊन नफा कमावतो, बाकी आपण सगळे संधी हातातून गेल्यानंतर पस्तावत बसतो.

शेयर मार्केट मध्ये गुजराती,मारवाडी आणि सिंधी लोकांची मोठी लॉबी आहे. तिथे त्यांचे टीमवर्क चालते. मराठी माणसाला तिथे अजिबात स्थान नाही. शेयर कोणताही असो, त्याच्या कंपनीचा परफॉर्मेंस कसाही असो, त्याचा भाव उचलायचा की आपटायचा हे त्यांच्या हातात असते. आपण बिचारे कंपनीचा बॅलेन्सशिट तपासत बसतो. पैशाने पैसा खेचला जातो या न्यायाने, जे आधीच श्रीमंत आहेत, ते आपले कोट्यावधी रुपये, चांगल्या बॅलेन्स शीटच्या शेयर मध्ये गुंतवून निवांत बसतात. त्यांच्या 100 कोटींचे आरामात 200 कोटी होतात. पण आपल्या सारखे लोक जे 10-15 हजार घेऊन शेयर मार्केट खेळतात, त्यांना श्रीमंत व्हायची घाई असते. ते एवढा काळ थांबू शकत नाही. असे लोक वायदा ट्रेडिंगचे बळी जातात. वायदा ट्रेडिंग हा स्पष्ट जुगार असून त्याला सरकारने अजून बंदी का घातली नाही याचे आश्चर्य वाटते. या पुस्तकात या गोष्टीचे विवेचन केलेले नाही. एकंदरीत ज्या लोकांना शेयर मार्केटची मुलभूत माहिती हवी आहे, त्यांच्यासाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. 

Comments

Popular posts from this blog

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

S. Jaishankar - Why Bharat Matters Rating ★★★

Short Books Recommendations