पुस्तक परिचय - व्यंकटेश माडगूळकर - नागझिरा
आजच्या पुस्तकाचा विषय माझ्या आवडीचा - जंगलाचा... जंगल - काय असतं ? म्हटलं तर फक्त झाडे, नदी-नाले, प्राणी पक्षी यांनी भरलेला जमिनीचा एक तुकडा .... की वन-देवता? की पशु-पक्ष्यांचं घर? की जीवनचक्रातील अति-महत्वाचा घटक? की आपल्यातल्या दांभिकपणाला - दिखव्याला - व्यवहाराला गाळून टाकणारं आणि आपल्यालाही त्याच्यासारखाच सर्वसमावेशक, निर्मळ बनवणारं आणि आपल्यातल्या originality ला बाहेर आणणारं, असं एक अजब रसायन? जंगल भटक्यांना विचारा एकदा... बोलतानाच त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यात जी चमक दिसेल ना, त्यातून फार वेळ वाट न बघता सरळ जंगल गाठण्याची इच्छा न होईल तरच नवल! आमचा एक मित्र- ज्याने असंच जंगलांचं वेड लावलं आणि अजून एक भटकी मैत्रीण - जिने त्या वेडात भरच घातली..... आणि असे अजून अनेक भटके निसर्गप्रेमी ... आणि मुळातूनच निसर्गाची ओढ , या सर्व गोष्टी माझ्या जंगल -प्रेमासाठी कारणीभूत ठरल्या. आणि मग अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली, शंकर पाटील (कथा), डॉ. सलीम अली, जिम कॉर्बेट, व्यंकटेश माडगूळकर इत्यादींनी या निसर्गदेवतेकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी दिली. त्या सर्वांनाच आजचा हा पुस्तक-परिचय सादर अर्पण!!