भारत विकणे आहे – वि. स. वाळींबे (मु.ले. चित्रा सुब्रमण्यम) दर्जा (***)
विकासाचा मार्ग अनुसरताना भारताला कोणता त्रास सोसावा लागला, यापेक्षा विकास करून घ्यायला नकार दिल्यामुळे या देशाला कोणत्या अनावश्यक यातना सहन कराव्या लागल्या, याचा ‘भारत विकणे आहे’ या पुस्तकात वस्तुस्थितीच्या आधारे मार्मिक उहापोह करण्यात आला आहे. आपल्याला जेव्हा अभिमान वाटायला हवा तेव्हा आपण शरमून जातो, आणि जेव्हा आपली आपल्यालाच लाज वाटायला हवी तेव्हा आपण स्वतःवर खूष होऊन जातो. हे असे का घडते, याचे परखड विवेचन म्हणजे चित्रा सुब्रम्हण्यम यांचा हा महत्त्वपूर्ण लेखसंग्रह. वर्तमानाकडे पाठ फिरवून आपण एकतर वेदांचा आधार शोधू लागतो किंवा भविष्यकाळासंबंधी जागतिक बॅंकेकडे आशाळभूतपणे पाहू लागतो. हा लेखसंग्रह म्हणजे गेल्या पंन्नास वर्षातील आपल्या बालिश वर्तनाचा सडेतोड आलेखच. आपण, आपल्या सभोवतालचे वास्तव आणि इतर वास्तवांच्या संदर्भात या वास्तवाचे मूल्यमापन या संबंधात अभ्यासपूर्ण मागोवा घेण्याचे कार्य हा लेखसंग्रह समर्थपणे पार पाडतो. आपल्या पुढा-यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर विदूषकांसारखे वर्तन करून, स्वतःचे आणि देशाचे कसे आणि किती हसे करून घेतले, हे जाणून घेण्यासाठी ‘भारत विकणे आहे’ वाचायलाच हवे...