पानिपत - विश्वास पाटील (दर्जा *****)
![Image](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg9-0z6o130YfDpxwJkMKCkAgU_1Lrlo_EYtVycdLN926hE90C_toCOOMPV5zAWSMACfdNdyyIyWCMiiQ1a5Srx1jaT1wwUtz6LTiVIBk6naybw1uRpnn_AE3KaATTcd5Z1uL_DgQK7ijU/s200/Vishwas+Patil+-+Panipat.jpg)
विश्वासरावांचे गाजलेले पुस्तक पानिपत जेव्हा हातात आले, तेव्हा त्याबद्दल बरीच उत्सुकता लागून राहिली होती. लहानपणापासून मी पानिपतच्या तीन लढायांबाबत ऐकत आलो. शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातल्या सनावळ्या पाठ करताना मला बराच कंटाळा यायचा. वाटायचे की या घटनांच्या सनावळ्या पाठ करुन काय साधणार आहे. प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा काही उपयोग आहे का?, असा सवाल मी करायचो. परंतु करणार काय, म्हणतात ना, आलीया भोगासी असावे सादर. कीतीही कंटाळवाणा असला, तरी मी काय थोडाच अभ्यासक्रम बदलू शकणार होतो. मला आता नक्की आठवत नाही पण आठवी ते दहावी इयत्तेत असताना कधीतरी मराठीच्या पुस्तकात “भाऊसाहेबांची बखर” या कादंबरीवर आधारीत, “आपेश मरणाहून ओखोटे” हा अगदी पहिलाच धडा होता. त्याची भाषा प्राचीन मराठी भाषेवर आधारीत होती, त्यामुळे समजायला अतिशय कठीण होती. पहिलाच धडा असा कठीण पाहून मी हादरलोच. त्या धड्यातील एकही शब्द मला समजत नव्हता. पण त्यानंतर आमच्या शाळेतील मराठी विषयाच्या शिक्षिकेने तो धडा जेव्हा अतिशय सोप्या भाषेत समजावून दिला, तेव्हा कुठे हायसे वाटले. त्यानंतर भितीची जागा उत्सुकतेने घेतली. पानिपतच्या लढाईबद्दल प...