वी दी नेशन (वाया गेलेली वर्षे) – वि. स. वाळींबे (मु. ले. नानी पालखीवाला) दर्जा (****)

नानी पालखीवाला हे विसाव्या शतकातले भारतातले एक लोकप्रिय व्यक्तीमत्व होते. पेशाने वकील असलेले ही व्यक्ती, भारतीय कायदा आणि घटना यांमध्ये तज्ञ समजली जाते. वकीली व्यतिरीक्त विविध महाविद्यालयांतून त्यांनी अध्यापनाचे कामही केले. टाटा समुहासह काही नामांकीत कंपन्यांचे उच्च पदस्थ अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. काही काळ ते अमेरीकेतील भारताचे राजदूतही होते. त्यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. भारतीय कायदा आणि घटना यांचा त्यांना नितांत आदर होता आणि भ्रष्टाचाराविषयी विलक्षण चीड होती. एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करताना भारतीय लोकशाही आणखी मजबूत व्हावी, समाजातल्या सर्व थरातील लोकांनी आपले परस्पर भेदभाव विसरून, एक भारतीय म्हणून गुण्यागोविंदाने एकत्र राहावे अशी त्यांची इच्छा होती.

     वी दी नेशन हे पुस्तक म्हणजे त्यानी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलेल्या विविध भाषणांचे आणि व्याख्यानांचे संकलन आहे. या सर्व भाषणातून त्यांनी भारतीय कायदा, घटना, अर्थव्यवस्था, लोकशाही, समाजवाद यांवर योग्य टिकाटीप्पणी केली आहे. काही ठीकाणी त्यांचे म्हणणे अतिशयोक्तिपुर्ण वाटते पण पुर्णपणे नाकारताही येत नाही. या पुस्तकातील त्यांच्या सर्व मतांशी मी सहमत होत नाही पण एकंदरीत त्यांचे बरेचशे विचार पटण्याजोगे आहेत. एकंदरीत त्याच्या लेखनावरून ते आदर्षवादी, समाजवादविरोधी, भांडवलशाही समर्थक असल्याचे दिसते. संबंध पुस्तक हे त्यांच्या विविध ठीकाणी केलेल्या भाषणांचा संग्रह असल्याकारणाने बऱ्याच ठीकाणी अनेक गोष्टींची पुनरावृत्ती झालेली आहे. त्यामुळे पुस्ताकात तेच तेच पुन्हा वाचावे लागल्याने कंटाळा येतो. भारताच्या वार्षिक अर्थसंकल्पाबाबतचे त्यांचा भाषण संग्रह या पुस्तकाचा सर्वात रटाळ भाग झालेला आहे. एकंदरीत पुस्तक माहितीपुर्ण आणि वाचनिय आहे. वि. स. वाळींबे यांनी या मुळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद छान केला आहे. भारतीय राज्यघटना, राज्यशास्त्र याविषयांत पदवी किंवा पदव्यूत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

Comments

Popular posts from this blog

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 9

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

Book review - Amish Tripathi - Raavan Enemy of Aryavarta Rating - ★★★★