Book Review : श्रीमानयोगी लेखक रणजीत देसाई (दर्जा *****)

या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९६८ च्या सुमारास प्रसिद्ध झाली. अगदी शाळेत असल्यापासून ग्रंथालयात या पुस्तकाचे दर्शन घडायचे. पण त्याचे जाडजुड स्वरुप पाहता वाचायची हिम्मत झाली नाही. आता जेव्हा वाचन हा माझा नियमीत छंद झाला आहे, तेव्हा हे पुस्तक वाचण्याची संधी मी घेतली. मराठी कादंबरी लेखनाचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून या कलाकृतीकडे पाहिले जाते ते योग्यच असल्याचा अनुभव मला ही कादंबरी वाचताना आला. रणजीत देसाईंनी अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत हे शिवचरीत्र मांडले आहे. कादंबरीचा शेवटचा १०% भाग वगळता कुठेही रटाळपणा आलेला नाही. हे चरित्र ६०% काल्पनीक तर ४०% सत्य या स्वरुपात मांडले आहे. त्यामुळे महाराजांच्या इतिहाची माहिती आणि कादंबरीचा रसास्वाद या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

तत्कालिन महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत गंभीर होती. महाराष्ट्रात बहामनी सुलतानांचे राज्य होते. वरकरणी सहिष्णू वाटणारे हे सत्ताधिश हिंदू जनतेवर अनन्वीत अत्याचार करीत होते. संपूर्ण महाराष्ट्राचे इस्लामीकरण हाच त्यांचा एक कलमी कार्यक्रम होता. दुर्दैवाने त्याला आपले हिंदु सरदारही त्यांना साथ देत होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा हा लढा उभारला नसता तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा सुंता व्हायला वेळ लागला नसता असे म्हणतात ते बरोबरच आहे. शिवाजी महाराजांनी हा जो मराठी सत्तेचा भक्कम पाया रचला त्याच्याच बळावर मराठ्यांनी पुढे अटकेपार झेंडे फडकवले.

महाराजांच्या यशात त्यांना लाभलेली विश्वासू आणि लढवय्या मावळ्यांची साथ होती. मावळे जरी पठाणांसारखे धिप्पाड व मजबूत नव्हते तरी अत्यंत काटक आणि चपळ होते. त्या चपळाईच्या जोरावरच महाराजांनी आपल्या बलाढ्य शत्रूंविरुद्ध गनिमी कावा यशस्वीरीत्या राबवला. या मावळ्यांची साथ नसती तर आपले उद्दीष्ट साध्य करणे महाराजांना कदाचीत जमले नसते. महाराजांच्या अंगात असलेले नेतृत्वगुण आणि मुत्सद्देगिरी यांच्या जोरावर बारा मावळात पसरलेल्या मावळ्यांना त्यांनी एका माळेत गुंफले आणि स्वराज्यासाठी लढा उभा केला.
शिवाजी महाराजांच्या यशामागे त्यांची दुरदृष्टी आणि शत्रूच्या बलस्थानांचा आणि कमजोरीचा अभ्यासही महत्त्वपूर्ण होता. केवळ भावनेच्या आहारी जाऊन कधीही निर्णय ते घेत नसत. शत्रू जर प्रबळ असेल तर कोणताही कमीपणा न बाळगता ते माघार घेत अथवा तह करत असत. ही दूरदृष्टी संभाजी महाराजांच्या अंगी असती तर मराठ्यांचे राज्य आणखी बलाढ्य झाले असते, आणि दिल्लीची मुघलाई संपुष्टात येऊन मराठ्यांचे राज्य भारतात आले असते. महाराजांचे हेरखातेही अत्यंत प्रभावी होते. बहीर्जी नाईकांसारखे नजरबाज महाराजांना शत्रुच्या गोटाची आणि हालचालींची अचुक माहिती पूरवत, त्याने महाराजांना लढाई अगोदरची तयारी करणे सोपे होई.

अवघ्या ५२ व्या वर्षी महाराजांचा मृत्यु मात्र अनैसर्गीक वाटतो. त्याकाळी औषधशास्त्र जेवढे प्रगत नव्हते तेवढे विषशास्त्र अत्यंत प्रगत होते. एखाद्या प्रभावशाली माणसाचा विना लढाई काटा काढण्याचा विषप्रयोग हा अत्यंत सोपा मार्ग होता. स्वराज्य उभारणीत महाराजांनी अनेक लोकांशी वैर पत्करले होते. खुद्द त्यांच्या कुटुंबाशी आणि मंत्री सरदारांशी त्यांचे तीव्र स्वरुपाचे मतभेद होते. त्यात त्यांना जवळच्या लोकांकडून विषप्रयोग होणे सहज शक्य होते. त्यांच्या अकाली मृत्युमुळे स्वराज्य उभारणीला मोठा धक्का बसला. ते आणखी काही काळ जगले असते तर औरंगजेबाचा लवकर निकाल लागला असता.

शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर स्वराज्याला योग्य वारस न मिळणे हि एक शोकांतीका होती. संभाजी महाराज त्यांच्या वडिलांप्रमाणे धुर्त नव्हते. त्यांना चुकीच्या लोकांची संगत लाभली होती. राजाराम महाराज कायम आजारी असल्याने स्वराज्य लढ्याचा भार सांभाळण्यास असमर्थ होते. त्यामुळे पुढे पेशव्यांचा उदय होईपर्यंत महाराष्ट्रातल मराठ्यांचा लढा प्रभावी नेतृत्वाअभावी दिशाहीन झाला होता. यानंतर संभाजी महाराजांवर शिवाजी सावंत यांनी लिहिलेला छावा हा ग्रंथ मी वाचणार आहे. त्यात शिवोत्तर कालाविषयी आणखी माहिती मिळेल. श्रीमानयोगी हा ग्रंथ अतिशय वाचनीय असून इतिहासाची माहिती आणि कादंबरी वाचनाचा आनंद एकाचवेळी देणारा आहे. त्यामुळे ज्या लोकांना निव्वळ तांत्रिक चरित्र वाचणे रटाळ वाटते, त्यांच्यासाठी हा ग्रंथ शिवाजी महाराजांची पूर्ण माहिती मिळविण्यासाठी अत्यंत योग्य आहे असे मला वाटते.

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)