Book Review : १९८४ लेखक जॉर्ज ओरवेल अनुवाद अशोक पाध्ये (दर्जा - *)

कालातीत राजकीय भाष्य करणारी कलाकृती ! सत्तेचा विचार उघड करणारं अद्भुत वास्तव-कथन म्हणजे १९८४ !

माणसाच्या नैसर्गिक विपर्यासालाच अंतिम, सत्य व समर्थनीय ठरवणारी सत्ता, त्यातून घडत जाणारी बिनचेहर्‍याची माणसं आणि यात नैसर्गिक संवेदनशीलतेला पडत जाणारा भकासपणाचा विळखा ही कादंबरी कथानकाबरोबर अधिकाधिक घट्ट करत जाते. सत्तेच्या आकांक्षेनुरूप घडत व बदलत जाणारी समाजाच्या मनाची रचना व त्यासाठी सत्तेने राबवलेल्या मूलगामी पद्धती यांचं अफलातून भविष्यकथन जॉर्ज करत जातो.

हे कथन पुढे सरकताना कल्पनेपलीकडचं वाटावं इतकं अस्सल उतरतं. म्हणूनच १९४८ साली लिहिलेली ही कादंबरी आजच्या घडीलाही तिचे कुठलेही संदर्भ हरवत नाही आणि कालातीत होते! ‘समाजवादी लोकशाहीची स्थापना’ या भूमिकेवर निष्ठा असणार्‍या जॉर्ज ऑरवेलचं एकूण लेखन म्हणजे ध्येयवादी स्वप्नांना पोखरत जाण्यार्‍या सत्तेचा आलेख आहे. केवळ ‘टेबली लेखक’ म्हणून न मिरवता त्याच्या लेखनातून कृतिशील आणि निर्भीड कार्यकर्ता आपल्यासमोर येत जातो. त्यामुळे उद्ध्वस्त होतानाही वास्तवाशी सामना करण्याची त्याची अभूतपूर्व ताकद वाचकाला घेरून टाकते!

सध्याच्या हुकुमशाही मोदी सरकारच्या बाबत ही पुस्तक भविष्य वर्तवणारे ठरते. मोदी सरकारने केलेले नवनवीन शेतीविषयक आणि कामगारविषयक कायदे ही आपल्याला हळूहळू समाजवादी लोकशाहिकडून भांडवलशाहीकडे आणि पर्यायाने हुकूमशाहीकडे नेताना दिसतात. एकंदरीत पुस्तक चांगले असले तरी अतिशय रटाळ आहे. कुठलीही कथा सादर न करता एक काल्पनिक हुकुमशाही कशी राबवली जाते याचा इतिवृत्तांत या पुस्तकात दिला आहे. या पुस्तकाचे वाचनमूल्य शून्य आहे. कोणीही हे पुस्तक वाचायला घेऊन आपला वेळ वाया घालवू नये.

अक्षरनामा या वेबसाईटवर या पुस्तकाचे छान परीक्षण देण्यात आले आहे, ते पुढील प्रमाणे आहे. 

जॉर्ज ऑर्वेलच्या जवळजवळ सत्तर वर्षं जुन्या ‘1984’ नामक कादंबरीत वर्णन केलेलं एक नरकपुरीसदृश काल्पनिक राज्य अचानक परिचयाचं वाटू लागलं आहे. ते जग असं आहे ज्यात ‘बिग ब्रदर’ (किंवा राष्ट्रीय सुरक्षा संस्था) सदैव काही ना काही ऐकत असतात आणि लोकांच्या घरातील संभाषणांकडे उच्चतंत्रज्ञानयुक्त यंत्रांचे कान लागलेले असतात. (‘काय ग अलेक्झा? काय चाललंय?’) हे काल्पनिक जग अविरत चालणाऱ्या लढाईचं आहे... त्यात परकीयांविरुद्धची भीती आणि द्वेष सातत्यानं कानात ओतले जातात, तिथल्या सिनेमांत जहाजंच्या जहाजं भरून निर्वासित लोक समुद्रावर मेल्याची दृश्यं दाखवली जातात. त्या काल्पनिक जगातलं सरकार सातत्यानं सांगत असतं की, वास्तव परिस्थिती ही ‘वस्तुनिष्ठ, बाह्य आणि स्वतःच्याच बळावर अस्तित्वात नसून आमचा पक्ष जी खरी मानतो तशाच पद्धतीनं अस्तित्वात आहे.’

व्हाईट हाऊसचे प्रसारमाध्यम-सचिव सीन स्पाईसर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीच्या वेळी जमलेल्या गर्दीचा आकडा सांगितला, तो उघड उघड खोटा होता; परंतु ट्रम्प यांच्या सल्लागार केलीऍन कॉनवे यांनी स्पाईसर यांचंच म्हणणं खरं आहे, असं लंगडं समर्थन दिलं. त्यानंतर लगेचच पुढल्या आठवड्यात अॅमेझॉनच्या सर्वाधिक खपाच्या पुस्तकांच्या यादीत ‘1984’ या कादंबरीनं पहिला क्रमांक पटकावला. केलीऍन कॉन्वे यांनी ज्या तऱ्हेनं स्पाईसर यांची भलावण केली ती तऱ्हा वाचकांना ‘1984’मधील काही गोष्टींची आठवण करून देणारी होती. या कादंबरीतील ‘मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ’ (‘सत्याचे खातं’) हे सत्यपरिस्थितीवर ताबा मिळवण्याची खटपट करत असतं. ऑर्वेल लिहितो, “बाह्य वास्तवाचं अस्तित्वच नाकारणं हे मुळी ‘बिग ब्रदर’ आणि त्यांच्या पक्षाच्या तत्त्वज्ञानात अध्याहृतच असतं. वरून डोक्यावर थोपलेल्या धार्मिक आदेशांसारखे आदेश नाकारणं म्हणजे आपल्या तर्कबुद्धीचा वापर करणं. परंतु तर्कबुद्धीला दिसणारी सर्व सत्यं नाकारून ‘बिग ब्रदर हे सर्वशक्तिमान आहेत’ आणि ‘पक्ष कधीही न चुकणारा आहे’ हेच इथं मान्य करावं लागतं.’’

कादंबरीचा नायक या नात्यानं विन्स्टन स्मिथला कळतं की, “पक्षानं  आपल्याला सांगितलं आहे की, तुमचे डोळे जे बघताहेत आणि कान जे ऐकताहेत त्यावर विश्वास ठेवू नका.’’ म्हणून तो पुस्तकाच्या प्रारंभीच जे ‘उघड’ आहे आणि ‘सत्य’ आहे, त्याचं रक्षण करण्याची शपथ घेतो. “भौतिक जग अस्तित्वात आहे, त्याचे नियम बदललेले नाहीत. दगड कठीण असतात, पाणी ओलं असतं आणि वरून खाली पडणाऱ्या वस्तू पृथ्वीच्या गुरूर्वाकर्षण केंद्राकडे ओढल्या जातात.’’ तो स्वतःला आठवण करून देतो की, “स्वातंत्र्य म्हणजे दोन अधिक दोन हे चार होतात असं म्हणण्याचं स्वातंत्र्य आहे. मग पक्ष त्याच्यावर भले ‘दोन अधिक दोन म्हणजे पाच’ असंच म्हणायची सक्ती करो.’’ ट्रम्प यांच्या शपथसमारंभाच्या वेळेची माहिती आणि फोटो वेगळंच दर्शवत असूनही जेव्हा स्पाईसर म्हणतात की, ‘शपथविधीसाठी आत्तापर्यंत जमलेल्या गर्दीपेक्षा ही गर्दी प्रचंड होती. तेव्हा कादंबरीत घडलेला प्रसंगच डोळ्यांपुढे उभा राहतो.

‘1984’मध्ये ऑर्वेलनं ‘ओशनीया’ नामक एका काल्पनिक दडपशाहीनगराचं अंगावर काटा आणणारं चित्र रंगवलं आहे. त्या ठिकाणचं सरकार आपल्या वास्तवाची व्याख्या आम्हीच करणार असा हेका धरून बसलेलं असतं. फुटकळ वृत्तपत्रं (ज्यात क्रीडा, गुन्हेगारी आणि भविष्य सोडून दुसरं काहीच नसतं.) आणि लैंगिकतेवर आधारित चित्रपटांमुळे विचलित झालेल्या लोकांच्या जीवनात एकांगी प्रचार झिरपत असतो. बातम्या, लेख आणि पुस्तके यांचं पुनर्लेखन ‘मिनिस्ट्री ऑफ ट्रूथ’नं करून घेतलेलं असतं. तारखा मुद्दामहून अंधुक केल्या जातात. भूतकाळ हा अत्यंत तिरस्करणीय, दयनीय अशा नैतिक अडाणीपणानं भरलेला होता, त्यामुळेच तर ओशनीयाला पुनश्च महान बनवण्याचे आमच्या पक्षाचे प्रयत्न फळास आले, असं ठासून सांगितलं जातं. (जगण्याची भीषण अवस्था, साधंसुधं अन्न आणि कपड्यांचाही तुटवडा असे ढळढळीत पुरावे दिसत असले तरीही त्यांच्याकडे खुशाल दुर्लक्ष करावं असंही सांगितलं जात असतं.)

‘अप्रामाणिकपणा आणि फसवणुकीनं भरलेल्या आजच्या जगातल्या माहितीजालातही चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशा वेळेस बेचैन वाचकांच्या उड्या ‘1984’वर पडाव्यात यात नवल वाटण्यासारखं काहीही नाही. पाश्चात्य देशांमध्ये निवडणुकांवर परिणाम होईल असा प्रचाराचा महापूर रशिया निर्माण करत आहे, लोकशाही प्रक्रियेबद्दल संशयाची बीजं पेरत आहे. भावनांशी खेळणारे उजव्या बाजूचे नेते वांशिक आणि धार्मिक गटांमधील ताणतणावाच्या विषाग्नीला हवा देत आहेत. अध्यक्ष ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोललेल्या खोट्यातून सत्य वेचून बाहेर काढताना पत्रकारांची तारांबळ उडत आहे. ट्रम्प यांनी तपासयंत्रणांची तुलना नाझींशी केली. त्याची बातमी दिल्यावर पत्रकार ‘माझ्यात आणि तपासयंत्रणांत वितुष्ट आणत आहेत’ असा स्वतःच खोटा आरोप केला. तसंच मला प्रतिनिधींनी दिलेल्या मतांमध्ये (पॉप्युलर व्होट) बहुमत मिळालं नाही, कारण इथं लाखो बेकायदेशीर निर्वासित आले आहेत, असा पोकळ दावाही केला.         

१९४४ साली ऑर्वेलनी एक पत्र लिहिलं तेव्हापासून या कादंबरीचा विचार त्यांच्या डोक्यात चालला होता. पुढे जाऊन तिचं नामकरण ‘1984’ असं झालं. ते पत्र स्टालिन आणि हिटलर यांच्याबद्दल होतं. तसंच ‘भावनिक राष्ट्रवाद’ आणि ‘वस्तुनिष्ठ सत्याच्या अस्तित्वावरच अविश्वास दाखवण्याची प्रवृत्ती’ यांच्या भयानकतेबद्दलही होतं. ज्याच्या हातून चूक होऊच शकत नाही, अशा एखाद्या ‘फ्युरर’च्या शब्दांत आणि त्यानं व्यक्त केलेल्या भाकितांत सर्व सत्य ठाकून ठोकून बसलंच पाहिजे, या अट्टाहासाबद्दल होतं.

त्यानंतर कित्येक दशकांनी म्हणजे १९७० साली निक्सन प्रशासनानं व्हिएतनाम येथील लढाई हाताळताना केलेली लबाडी आणि निवडणुकप्रचारांत वॉटरगेट प्रकरणावरून मारलेल्या कोलांटउड्या (तत्कालीन प्रसारमाध्यम सचिव- रॉन झिग्लर यांनी आपण अगोदर केलेली विधानं आत्ता लागू नाहीत असं म्हणणं इत्यादी इत्यादी) हे पाहताना ‘1984’ची वारंवार आठवण होत असे. जणू निक्सनच्या कारभारयंत्रणेचं प्रतिबिंबच या कादंबरीच्या आरशात दिसत होतं.

१९४४ सालच्या पत्रात ऑर्वेल यांचं द्रष्टेपणच अधोरेखित होतं. तो लिहितो, “सर्वांना मान्य होईल असा मानवी इतिहास अशी काही गोष्टच अस्तित्वात नसते. तसंच ‘लोकांनी चांगलंच वागलं पाहिजे’ अशी लष्करी गरज एकदा का संपली की भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी ज्ञानशाखांचं अस्तित्व धोक्यात येतं.’’ या कादंबरीतील जगात तर ‘विज्ञान’ हा शब्दच अस्तित्वात नाहीये, कारण ‘भूतकाळातील सर्व वैज्ञानिक कामगिरी जरी विचाराच्या निरीक्षणाधारित पद्धतीवर अवलंबून असली तरी ती पक्षाच्या सर्व मूलभूत तत्त्वांच्या विरुद्ध होती.’’

‘1984’मध्ये विज्ञानाला ‘तुच्छ लेखण्याचं धोरण’ व्यक्त केलं आहे. त्या भीतीचे पडसाद  वैज्ञानिकांनी व्यक्त केलेल्या भीतीत उमटताना दिसतात, कारण पर्यावरण संरक्षण संस्थेतील संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अभ्यासाची आणि गोळा केलेल्या माहितीची छाननी ट्रम्प प्रशासन करत आहे. तसंच नवीन काम रोखून ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिल्याची माहिती आली आहे. वेगवेगळ्या सरकारी खात्यांकडून दिली जाणारी पर्यावरणविषयक माहितीही कमीत कमी दिली जावी, यासाठी ट्रम्प प्रशासनयंत्रणेचे प्रयत्न चालले आहेत. त्यामुळेही लोक चिंतेत आहेत. अशा वेळेस ‘प्रसारमाध्यमांवरील सरकारी ताब्याचं एकत्रीकरण आणि केंद्रीकरण’ यांचा उल्लेख ऑर्वेलनं ‘1984’मध्ये केला होता याची आठवण होणारच.

‘पॉलिटिको’ मासिकानं म्हटलंय की, “व्हॉईस ऑफ अमेरिका या प्रसारवाहिनीनं लोकशाही आदर्श जगभर पोचवण्याचं महत्कार्य केलं आहे. परंतु तिच्यावरही व्हाईट हाऊसचे नवीन रहिवासी आपला शिक्का उमटवण्याचा प्रयत्न करू शकतात.”

अर्थात नियमितपणे दिल्या जाणाऱ्या बातम्या, असं बोललोच नाही म्हणून घातलेले वाद आणि प्रतिवाद यांच्या प्रवाहातून या सर्व घडामोडी सातत्यानं लोकांपुढे मांडल्या जात आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होत आहे. अर्थात सत्ताधाऱ्यांना या गोंधळाची किंमत केवढी असते, हे ऑर्वेलला चांगलंच ठाऊक असल्यामुळे त्याला त्याचं नक्कीच आश्चर्य वाटलं नसतं.

‘1984’ पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर दोन वर्षांनी आणखीही एक पुस्तक प्रसिद्ध झालं, तेही अॅमेझॉनच्या या आठवड्यातील सर्वाधिक खपाच्या पहिल्या शंभर पुस्तकात समाविष्ट झालं आहे. ते हॅना आरेंट यांचं ‘द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटारियनिझम (१९५१) हे पुस्तक आहे. ‘ ‘1984’ला आधारभूत मानणारं वास्तवाधारित लेखन असं’ आपण त्या पुस्तकाला म्हणू शकतो.  ज्या वादळी घटनांमुळे हिटलर, स्टालिन आणि दुसरं महायुद्ध घडलं त्या घटनांच्या वेळी आगीत तेल ओतणाऱ्या घटकांबद्दलचं विवेचन या दीर्घ, तत्त्वज्ञानात्मक ग्रंथात केलं आहे. हॅना म्हणतात, ‘इतिहासाच्या मोडतोडीचे बळी ठरलेल्या चिंताग्रस्त समाजगटांना ‘बळीचे बकरे’, ‘सहज निघणारे तोडगे’ आणि ‘एकसंध करणाऱ्या साध्यासोप्या कहाण्या’ देण्याची अफाट ताकद एकतर्फी कथाकथनापाशी असते. या कहाण्यांत असत्य ओतप्रोत भरलेलं असेल तर सत्तेत असणाऱ्यांना ते अधिकच पथ्यावर पडतं. मग त्यांचे प्रजाजन ज्या दैनंदिन वास्तवात जगत असतात त्या वास्तवाची त्यांना नव्यानं व्याख्या करता येते.’

पुढे हॅना लिहितात, “सार्वजनिक स्तरावरच्या रणधुमाळी प्रचारयंत्रणेला असा शोध लागला की, आपले श्रोते अत्यंत वाईट गोष्टींवर विश्वास ठेवायला एका पायावर तयार असतात, मग ते कितीही मूर्खपणाचं असो. शिवाय त्या प्रचारातील प्रत्येक विधान खोटं असलं तरीही स्वतःची फसवणूक करून घेण्यास त्यांची मुळीच ना नसते.” बदल आणि अनिश्चितता भरून राहिलेला काळ असला तर मग हे भोळेभाबडेपणा आणि संशय यांचं मिश्रण चांगलंच फोफावतं. मग काल्पनिक जग निर्माण करण्यासाठी आसुसलेले राजकारणी त्या गोष्टीचा गैरफायदा घेतात. त्यांच्या त्या काल्पनिक जगात ‘अपयशांची नोंद ठेवण्याची गरज नसते, ती  मान्य करण्याची गरज नसते की स्मरणात ठेवण्याचीही गरज नसते.’ ऑर्वेलनं म्हटल्याप्रमाणे ‘त्या जगात दोन अधिक दोन पाच’ होत असतात. चुकीच्या गणिताचा स्वीकार हीच राज्यकर्त्यांच्या ताकदीचा पुरावा ठरते. ती त्यांची ताकदच वास्तवाची व्याख्या ठरवते आणि वादविवाद करण्याच्या अटीही ठरवते.

हे दृश्य निराशाजनक असलं तरी ख्रिस्तोफर हिचिन्स म्हणतात त्याप्रमाणे ऑर्वेलनं स्वतःच्या जीवनाशी एक बांधीलकी मानली होती. समजण्यास अवघड असूनही ज्याची शहानिशा करता येईल अशा सत्याचा शोध त्यांना घ्यायचा होता. हा त्यांचा शोध जणू चिवट मानवी जिद्दीचं प्रतीकच होता. कारण मानवी व्यक्तिमत्त्वात असा एक सूक्ष्म पैलू असतो, जो कधीही नष्ट करता येत नाही. हाच तो पैलू कुठल्याही परिस्थितीत फसवणूक आणि जबरदस्तीला प्रतिकार करत राहतो.

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)