Book Review : अस्मानी लेखक शुभदा गोगटे (दर्जा *****)
अस्मानी म्हणजे वेगवेगळ्या मासिकांमधून प्रकाशित झालेल्या विज्ञानकथांचा एक उत्कृष्ट संग्रह आहे. विज्ञानकथा हा प्रकार आता मराठीला नवीन राहिलेला नाही. अनेक वर्षं दुर्लक्षित राहिलेल्या विज्ञानकथेनं आता चांगलं बाळसं धरलं आहे. आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खांद्यावरून भविष्यातल्या शक्यतांकडे डोकावून पाहण्याचा प्रयत्न करणारा हा वाङ्मयप्रकार आता लोकप्रिय झालेला आहे. असं डोकावून पाहणं विस्मयजनक तर असतंच, शिवाय ते मनोरंजकही ठरतं. शुभदा गोगटे यांची कथांची निवड चांगली आहे. वेगवेगळ्या विषयांवर आधारित असलेल्या विज्ञान कथांमुळे एकसुरीपणा टाळला गेला आहे. विज्ञानकथा लिहताना अतिकल्पनाविलास केलेला नाही. विज्ञानकथा शास्त्रशुध्द विचारांवर आधारित असल्याने वाचनीय झाल्या आहेत. शुभदा गोगटे हे मराठी विज्ञान साहित्यातलं एक मान्यवर नाव. विज्ञानकथा, विज्ञानकादंबरी, विज्ञानलेख असे अनेक प्रकार त्यांनी समर्थपणे हाताळले आहेत. त्यांच्या अनेक कथांना व कादंबरीला विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
क्लोनिंग, कालप्रवास, यंत्रमानव अशा अनेक विज्ञान विषयांवरच्या त्यांच्या कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. गवत खाऊन काम करणार्या यंत्रमानवाची गंमत "बकाबक'मध्ये आहे, वंशशास्त्राच्या (Genetics) घोडदौडीत निर्माण होऊ शकणारी शक्यता "मार्जिनल्स'मध्ये दिसते तर कालप्रवासाचा उपयोग करणारे चोर-पोलीस "कालचतुराची चित्तरकथा'मध्ये भेटतात. भविष्यातल्या शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावभावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत.
अस्मानी या शीर्षककथेमध्ये एका शेतकऱ्याची कथा चितारली आहे. या शेतकऱ्याच्या शेतात एके दिवशी अचानक भूकंप होतो. नंतर दररोज ठरलेल्या वेळी असा भूकंप होतो. या दरम्यान त्याच्या शेतातील पिकांची वाढ राक्षसी वाटावी अशी होते आणि एक दिवस सारं शेत उद्ध्वस्त होतं. रोज ठराविक वेळी होणाऱ्या या भूकंपाचं रहस्य काय हे शोधून काढण्यासाठी मंत्र-तंत्राबरोबरच पोलिसांचीही मदत घेतली जाते. अखेर जमिनीला बसणारे हे धक्के म्हणजे भूकंप नसून जमिनीत गडप झालेल्या आणि उड्डाण करू इच्छिणाऱ्या एका यानाची ती करामत असल्याचं लक्षात येतं. या साऱ्या कथांची मांडणी गोगटे यांनी त्याचे तपशील अगदी तर्काला पटतील, असे दिले आहेत. सामान्य वाचकालाही सहज खिळवून ठेवतील अशा या कथा आहेत. बारीकसारीक तपशिलामुळे जणू आपण तो अनुभव घेत आहोत अशी जाणीव कथा वाचताना होते.
इंग्रजी साहित्यात विज्ञान कथेचे दालन समृद्ध आहे. मराठी साहित्यात आता कुठे या कथाक्षेत्राला चांगले दिवस येत आहेत. ललित साहित्यात कथा लिहिताना कल्पनेचे प्रचंड स्वातंत्र्य असते. विज्ञानकथेबद्दल तसे म्हणता येत नाही. विज्ञानात वैज्ञानिक तथ्य बाजूला ठेवून था लिहिता येत नाहीत. विज्ञानकथा लिहिताना विज्ञानाचे निकष पाळावेच लागतात हे एक अत्यंत अवघड असे काम आहे. वैज्ञानिक शोधात स्वतःच्या कल्पना घुसवता येत नाहीत किंवा वैज्ञानिक शोधाचे जे निकष आहेत ते त्याची तोडफोड करता येत नाहीत. अलीकडच्या काळात विज्ञानविषयक कथा लिहिणारे ललित साहित्यिक पुढे आले आहेत. काही वर्षांपूर्वी डॉ. जयंत नारळीकर यांचा विज्ञानविषयक कथासंग्रह खूपच लोकप्रिय झाला होता. आता या क्षेत्रात शुभदा गोगटे नावरूपाला आल्या आहेत. इंग्रजी साहित्यात विज्ञानाच्या दृष्टीतून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. चार-सहा शतकानंतर माणूस कसा असेल, माणसाची अवस्था कशी असेल, समाजरचना, घर बांधणी, सार्वजनिक वाहतूक क्षेत्रात काय काय बदल झाले असतील अशा अनेक विषयांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो.
अलीकडेच इंग्रजीतील मार्कर ही कादंबरी जगभरात गाजली. मार्कर या कादंबरीत कर्करोगाचा विषाणू आपल्या शरीरात आहे असे लक्षात आल्यानंतर संबंधित नायिका या घटनेला कशी सामोरं जाते त्याचे वर्णन आलेले आहे. विज्ञानकथेला एक विशिष्ट असा वाचक वर्ग लाभलेला आहे. त्यातील बहुतांशी लोक विज्ञान या विषयात रस घेणारे असतात. काही लोक विज्ञान विषयात शिक्षण घेतलेले असतात. ज्यांना थोडीफार विज्ञानाची माहिती आहे अशा लोकांसाठी एक काल्पनिक जग उभे करून त्यांची करमणूक करणे आणि करमणूक करताना भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणे हे एक अवघड काम आहे. शुभदा गोगटे यांनी आपल्या ‘अस्मानी’ या कथासंग्रहात हे काम अत्यंत जबाबदारीने पार पाडले आहे असे म्हणावे लागेल. विज्ञानकथा लिहिणाऱ्यांनी स्वतःहून काही बंधने घालून घेतली पाहिजेत. काही वर्षांपूर्वी विज्ञानाचा गंधही नसलेल्या एका लेखिकेने विज्ञानविषयक कथा लिहिल्या आणि प्रकाशकाने त्या पुस्तकरूपाने छापल्याही. ते पुस्तक डॉ. जयंत नारळीकर यांच्या पाहण्यात आले त्यांनी चाळले आणि विज्ञानकथेच्या नावावर काल्पनिक कथा लिहिणाऱ्या लेखिकेबद्दल नाराजी व्यक्त केली.
विज्ञान म्हणजे सत्य वैज्ञानिक कथाचा उपयोग समाजातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठी झाला पाहिजे. विज्ञानविषयक लेखनातून अंधश्रद्धा वाढता कामा नये. असे काही निकष विज्ञानविषयक कथा लिहिणाऱ्या लेखकाने पाळावेत. तसे झाले तरच विज्ञानविषयक कथांची लोकप्रियता वाढेल आणि विज्ञानविषयक कथांतून भविष्याचा वेध घेऊ पाहणारा एक वर्ग निर्माण होईल. तसे वातावरण निर्माण होईल. आता विज्ञानातील शोध अति सूक्ष्म पातळीवर गेले आहेत, त्यामुळे विज्ञानविषयक कथाही तशाच ताकदीच्या असल्या पाहिजेत. अशा कथा लिहायच्या झाल्या तर संबंधित विषयाची माहिती करून घेणे गरजेचे आहे. कोणताही मनुष्य सर्वच क्षेत्रात निष्णात असतो असे नाही. विज्ञानविषयक लेखन करणाऱ्या साहित्यिकाने पाश्चात्य देशातील लेखकांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे. पाश्चात्य लेखक ज्या विषयावर लेखन करायचे असते त्या विषयाचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतात. माहिती मिळवितात. संबंधित विषयांबाबत जगभरात काय संशोधन चालू आहे त्याची माहिती घेतात आणि नंतरच लेखन करतात. शुभदा गोगटे यांच्या या ‘अस्मानी’ कथासंग्रहातील काही कथा निश्चितच प्रचंड परिश्रम घेऊन लिहिल्या आहेत असे जाणवते. या कथा विज्ञानाची आवड असलेल्या लोकांना आवडणार आहेत.
शुभदा गोगटे यांचे लिखाण अतिशय सुंदर झाले असून वैज्ञानिक विषय असूनही वैज्ञानिक क्लिष्टपणा आलेला नाही. त्यामुळे या कथा, विज्ञान कथांची आवड असल्याप्रमाणे नियमित ललित वाचन करणाऱ्या सर्वसामान्य वाचकांनाही आवडतील यात शंका नाही. मला स्वत:ला सुखांतक कथा आवडतात. या संग्रहातील अनेक कथांना अंत नसल्यामुळे माझ्या पसंतीस उतरल्या नाहीत. भविष्यातल्या शक्यतांमध्ये संभाव्य मानवी भावभावनांचं चित्रण करणाऱ्या या कथा आहेत.
Comments
Post a Comment