द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा

आजची हिंदी चित्रपट सृष्टी माझी नाही. बरं झालं आम्ही दादरच्या कॅफे स्विमिंगपुलवर गाणी ऐकत, चहा पीत, सिगरेट ओढत सिनेमावर चर्चा करत होतो, तेव्हा चित्रपट सृष्टीत आज साचलेल्या चिखलाचा मागमूसही नव्हता. एकमेकांवरची गलिच्छ चिखलफेकही नव्हती. आमच्या वेळेला एक म्हण होती, माकडाच्या हातात कोलीत. आता ती म्हण बदलली आहे, आता माकडांच्या हातात चॅनेल अशी नवीन म्हण अस्तित्वात आलेली आहे. त्या काळात फिल्मी माणसांना शिखंडी बनवून राजकीय अर्जुन शरसंधान करत नव्हते. धार्मिक आणि राजकिय स्तरावर ती चित्रपट सृष्टी दुभंगलेली नव्हती. सिनेमातल्या माणसांच्या पोटी जन्माला आलेली मुलं आणि बाहेरून चित्रपट सृष्टीत आलेले कलाकार मंडळी असा वर्ण वर्चस्वाचा खेळ नव्हता. न कुणीतरी परदेशात बसलेला डॉन कठपुतली प्रमाणे नट नट्या आपल्या तालावर नाचवत होता. ना एकमेकांच्या करिअर संपवण्याच्या वल्गना होत किंवा सुपारी दिली जाई. 

ती आमची चित्रपट सृष्टी नंदनवन नव्हती. आदर्शवतही नव्हती. पण इतकी किडलेली कधीच नव्हती. त्यावेळी अर्थात बरीच मंडळी चित्रपट सृष्टीत सामान्य कुटुंबातून येत. आणि कष्टाने, आपल्या गुणवत्तेने मोठे होत. मग तो अशोक कुमार असो, दिलीप कुमार, देव आनंद, बलराज सहानी किंवा पुढे सुनील दत्त, धर्मेंद्र, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना अगदी अमिताभ बच्चन, शाहरुख खान पर्यंत. चटके, टक्केटोणपे खात ही मंडळी या मायावी दुनियेत  उभी राहिली. (अमिताभ नंतर एखाद्या नटाच्या प्रेमात पडायचे आमचे दिवस संपले.) 

राजकपूरचं थोडं वेगळं होतं तो पृथ्वीराज कपूरचा मुलगा होता.पृथ्वीराज हे चित्रपटसृष्टीतलं बड प्रस्थ होतं.पण चित्रपट सृष्टीत पाय रोवण्याच्या बाबतीत दोघांचा संबंध इथेच संपला. पृथ्वीराज कपूरने राज कपूरला फक्त चांगल्या शाळेत घातलं. त्या शाळेचं नाव होतं, केदार शर्मा. केदार शर्माचा चौथ्या दर्जाचा सहाय्यक म्हणून राज कपूरने कामाला सुरवात केली. राज कपूर केदार शर्माला वन मॅन इंडस्ट्री म्हणायचा. तिथून राज कपूर उभा राहिला आणि शाळेपेक्षा प्रचंड मोठा झाला. तो स्वतः एक संस्था बनला. राज कपूरने त्याच्या विशीत कोल्हापूरच्या भालजी पेंढारकरांच्या एका सिनेमात काम केलं. कदाचित पृथ्वीराज कपूरचा मुलगा म्हणून राज कपूरला त्यांनी  त्या काळात 5 हजार रुपये दिले. भालजींवर पृथ्वीराजजी खुश झाले नाहीत. त्यांनी भालजींना खडसावलं आणि विचारलं, "इतके पैसे द्यायची त्याची लायकी आहे का? केवळ माझा मुलगा आहे म्हणून तू त्याला दिलेस?" भालजींनी ते परत घेतले नाहीत. पण दूरदृष्टी असलेल्या राज कपूरने चेंबूरला जागा खरेदी करायला ते वापरले. तिथे RK Studio उभा राहिला. "आवारा" नंतर राज कपूर बापापेक्षा मोठा झाला. आपल्या भावाला, शम्मी कपूरला तो सहज मदत करू शकला असता. त्याने ना शम्मी कपूरला मदत केली, ना शशी कपूरला. शम्मी कपूरचे पहिले 18 चित्रपट फ्लॉप  गेले. तो आसामच्या टी इस्टेटवर मॅनेजर व्हायला निघाला होता. "तुमसा नही देखा" चालला आणि त्याचं आयुष्य बदललं. पण तोच राज कपूर स्वतःच्या मुलांच्यावेळी जास्त 'बापा'सारखा वागला.स्वतःच्या बापाचा धडा विसरला.राज कपूर खरं तर स्कॉच व्हिस्कीचा ब्रँड अँबेसीडर व्हायला हवा होता.इतकं मद्य त्याला प्रिय ! पण पार्टीत बुजुर्ग व्ही. शांताराम असतील तर त्यांच्या समोर मद्याचा ग्लास घेऊन तो जायचा नाही. त्यांना सांगायचा, "अण्णा, झाली ना आता चर्चा. आता आम्हाला मद्य प्यायचंय. आता जा ना जरा

आज घराणेशाही बोकाळली आहे. डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर व्हावसं वाटतं, पुढाऱ्याच्या मुलाला पुढारी, तसं चित्रपट सृष्टीतल्या माणसाला चित्रपट व्यवसायात यायला वाटलं तर ते चुकीचं नाही. पण त्यासाठी स्वतःला उच्च समजणं आणि दादागिरी करणं हा नादानपणा आहे.हल्ली अवार्ड समारंभ किंवा मुलाखती किंवा पार्टीच्या नावाखाली कुणी कुणाचा काहीही अपमान करतं . संस्कृतीमूल्य ही पूर्णपणे ढासळलेली आहेत. मोठ्यांबद्दलचा आदर संपला आहे. संस्कृती रसातळाला जायला लागली आहे.

पूर्वी गट नव्हते का? पूर्वी इगो नव्हते का? पूर्वी भांडणं नव्हती का? सर्वकाही होतं. पण आजचं विद्रूप, किळसवाणं रूप त्याला नव्हतं. माझ्या क्रिकेटर मित्राने सांगितलेला एक किस्सा सांगतो. त्याला सलीम खानने (सलमानचे पिताजी) यांनी सांगितलेला. एका पार्टीत सलीम खानला दिलीप कुमार भेटला. त्याने दिलीप कुमारला गळा भेट दिली. ते लांबून राज कपूर पहात होता. सलीम खान राज कपूरला भेटले आणि त्यांनी राज कपूरच्या पायाला हात लावला. राज कपूरने त्यांना उठवलं आणि दिलीप कुमारच्या दिशेने पहात म्हणाला, "तुने आज मुझे खरीद लिया. मांग जो मांगना है." 

राज कपूरच्या पायाला हात लावल्याने राज कपूर सुखावला होता. पण तोच राज कपूर "संगम"च्यावेळी दिलीप कुमारकडे गेला आणि म्हणाला, "सुंदर आणि गोपाल यापैकी तुला जी भूमिका करायची आहे ती कर. पण मला तू हवाच." दिलीप कुमार हसला आणि म्हणाला, "त्यातली तू पाहिजे ती भुमिका मला दे. फक्त चित्रपटाचं दिग्दर्शक तू असता कामा नये." राज कपूरला त्यातला गर्भितार्थ कळला आणि त्याने ती भूमिका राजेंद्र कुमारला दिली. चढाओढीतून वैमनस्य, अती दुश्मनी फार क्वचित झाली. वैयक्तिक चिखलफेक तर अगदीच कमी. 

गुरुदत्तने आत्महत्या केली असं मानलं जातं. काय वय होतं त्याचं? फक्त 38.! आणि कर्तृत्वाचा विचार केला तर सुशांत त्याच्यासमोर टिचभरच आहे. वहिदा गुरुदत्तला सोडून गेली म्हणून त्याने आत्महत्या केली असं ठामपणे ठरवून वहिदाची कुणी रिया नाही केली. कुणी वहिदाचं चारित्र्य हनन केलं नाही. ना गीता दत्त पत्रकारांकडे धावली. तिचं दुःख तिने स्वतःच पचवलं.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या काळात धार्मिक आणि राजकीय शांतता खूप मोठी होती. स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर भारताचा धार्मिक तत्वावर तुकडा पडणार हे माहीत झाल्यावर मुसलमान कलावंतांचं धाब दणाणलं. तरीही फैज अहमद फैज, मंटो किंवा नूरजहाँ सोडली तर त्यावेळच्या अनेक मुस्लिम कलाकारांनी भारतात राहणं पसंत केलं. कारण त्यांचा भारत सरकारवर जास्त विश्वास होता. साहीर, शकील, मजरूह, दिलीप कुमार, नौशाद, नर्गिस सारखी कितीतरी सिनेमातली उत्तुंग मंडळी मुस्लिम होती.  भारत हा देश त्यांना त्यांचं घर वाटे. इथेच त्यांना त्यांच्या कलेचं चीज होईल असं वाटलं. काही कलाकारांना त्यांच्या निर्मात्यांनी घाबरून हिंदू नावं दिली. उदा. दिलीप कुमार, मीना कुमारी,शामा,. वगैरे. पण पेटलेला वणवा शांत झाला आणि एक वेगळं वातावरण तयार झालं. 1951 साली बांग्लादेशहून आलेल्या हिंदू निर्वासितांसाठी मुस्लिम मधुबालाने 51 हजार रुपये दिले. 1951 चे 51 हजार आहेत. आज किती झाले असतील. विचार करा. 

लता मंगेशकरला हिंदू निर्माते नाकारत असताना पाकिस्तानात गेलेल्या गुलाम हैदरने ओरडून सांगितलं, "लवकरच काळ असा येईल, जेव्हा तुम्ही तिच्या घरी रांग लावाल." आणि त्याचं म्हणणं खरं ठरलं. बैजू बावराचं एक गाणं आठवतं? "ओ दुनिया के रखवाले" आजही काशीविश्वेश्वरासाठी सकाळी ते लावलं जातं. कुणी लिहलं? शकील बदायुनी.कुणी गायलं? रफीने. कुणी संगीत दिलं? नौशादने. तिघेही मुस्लिम पण गाणं मात्र पक्कं हिंदू. 

"ए मलिक तेरे बंदे हम" आठवतंय? लिहलं भरतव्यासने. गायलं लता मंगेशकरने. संगीत दिलं वसंत देसाईने. सर्व हिंदू. पण पाकिस्तानातल्या पंजाब प्रांतात शाळेत प्रार्थना गीत म्हणून अधिकृतपणे सरकारने लावलं होतं. रफी हा देवमाणूस. त्याने एकदा डायलिसिस मशीन नवं असताना परदेशातून आणलं होतं. पण त्याने ते सैफी किंवा तत्सम हॉस्पिटलस् ना दिलं नाही. तर ते आम जनतेच्या हॉस्पिटलला देऊन टाकलं. 

आम्ही सिगरेट ओढत, चहा ढोसत  दिलीप कुमार चांगला की देव आनंद? मीना कुमारी की नूतन? रफी की किशोर  वगैरे वाद घातले. पण कुणी मुस्लिम होता म्हणून तो नावडता झाला, असं कधी झालं नाही. पाकिस्तानात जाऊन जेव्हां तलत मेहमूदने ठामपणे सांगीतलं की, लता मंगेशकर ही नूरजहाँपेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. तेव्हा तो फक्त पोलिटिकली कॅरेक्ट बोलत नव्हता, तर त्याच्या हृदयातून आलेले ते उद्गार होते. 

त्यावेळेलाही सिनेमातल्या मंडळींना काही ठाम राजकीय मतं होती. साहीर, शैलेंद्र, मजरूह, गुरूदत्त, बलराज साहनी, मेहबूब वगैरे ही मंडळी उघड उघड डाव्या विचारसरणीची होती. दिलीप कुमार, नर्गिस ठामपणे काँग्रेसवाले होते. मनोज कुमार, लता, भालजी, सुधीर फडके ही हिन्दुत्ववादी, सावरकरवादी मंडळी होती. पण या सर्वांचे एकमेकांशी संबंध अत्यंत चांगले होते. कधीही कुणीही एकमेकांवर कसल्याही प्रकारचा आरोप केला नाही. किंवा राजकीय गटबाजी केली नाही. 

1962 च्या चिनी युद्धानंतर कृष्ण मेननना संरक्षण मंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं. त्यांनतर लगेचच निवडणूक होती. त्या निवडणुकीमध्ये देव आनंद सह काही कलाकारांनी कृष्ण मेननचा प्रचार केला. कारण त्यांची आणि कृष्णा मेनन यांची वैयक्तिक मैत्री होती. पण म्हणून देव आनंदला त्या काळात कुणी देशद्रोही म्हणून हिणवलं नाही. 

सुनिल दत्त, नर्गिस देव आनंदच्या केवढे जवळचे! त्यांच्या लग्नाची बातमी प्रथम सुनिल दत्तने देव आनंदला सांगितली. त्याच नर्गिसने देव आनंदला आणीबाणीत संजय गांधींच्या रॅलीत भाग घेण्याची विनंती केली. देव आनंदने थेट नकार दिला. इंदिरा गांधींच्या दहशतीला भीक न घालता, जयप्रकाश नारायण यांच्या पाठीशी देव आनंद उभा राहिला. तेव्हा चित्रपट सृष्टीतली अनेक मंडळीही जयप्रकाश नारायण यांच्या पाठीशी उभी राहिली. पण म्हणून ती मंडळी आणि इतर असे गट पडले नाहीत. 

राजेश खन्ना काँग्रेसमध्ये गेला म्हणून त्याचा सिनेमा पाहणं कुणी सोडलं नाही. शत्रुघ्न सिन्हा बीजेपीत गेला म्हणून कुणी कौतुक किंवा विरोध केला नाही. प्रत्येकाच्या राजकीय विचाराचा आदर केला गेला. मला एकदा देव आनंद सांगत होता, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना देव आनंद आणि दिलीप कुमार प्रचंड आवडत. ज्यावेळेला देव आनंदला त्यांना भेटायचं असेल तेव्हा ते आणि देव आनंद लंडनला जात. एका हॉटेलला उतरत. आणि एकमेकांना भेटत. 

आणखी एक किस्सा दिलीप कुमारच्या बाबतीत वाचलाय. आता नेमका कुठे वाचलाय सांगू शकत नाही. पण ज्यावेळेला पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना नवाज शरीफ यांच्याकडे काहीतरी खास काम होतं. त्यावेळी दिलीप कुमारला त्यांनी फोन करायला सांगितला. आणि दिलीप कुमारने तो केला. डिप्लोमसी सुद्धा अशाप्रकारे नटांच्या मदतीने करता येत होती. 

आमच्या त्या कॅफेच्या टेबलवर सिनेमातल्या राजकीय विचारसरणीची चर्चा वेळोवेळी झाली. तरी सुद्धा त्यांच्यावर बहिष्कार टाकणं, त्यांची पोस्टर फाडणं वगैरे प्रकार कधी झालाच नाही. आजही मला जितके नसरुद्दीन शहा, प्रकाश राज आवडतात तेवढेच मला परेश रावल, अनुपम खेर हे आवडतात. 

आमच्यासाठी जे देव होते, ते देवच राहिले. देवांचा आम्ही धर्म नाही पाहिला. ना जात. आजचे सिनेमे मी पाहतो. आजच्या सिनेमांचे विषय, हाताळणी, विषयातला बोल्डनेस, उत्तम अभिनय यांचा विचार केला तर ते मला प्रचंड आवडतात. नावडती बाजू आजच्या सिनेमांची एकच आहे, संगीत आणि गाण्यांमध्ये नसलेलं काव्य. आजही ते कॅफेचे मित्र भेटले आणि सिनेमाच्या गप्पा निघाल्या तर आजचा फिल्मी चिखल आम्ही कधीच तुडवत नाही. आम्ही आमच्या विश्वात रमतो. आजच्या चिखलामध्ये भले सुंदर सुंदर कमळं उगवत असतील पण आम्हाला तो मंद मोगऱ्याचा गंध जास्त प्रिय आहे.

शेवटी मुस्लिम मधुबालाच्या गळ्यातून हिंदू लता मंगेशकर जे म्हणाली आहे, तेच खरं "गुजरा  हुआ जमाना, आता नही दुबारा"

Comments

Popular posts from this blog

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 9

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

Book review - Amish Tripathi - Raavan Enemy of Aryavarta Rating - ★★★★