Book Review : अमेरिकी राष्ट्रपती लेखक अतुल कहाते (दर्जा - *****)

अमेरिकेचा राष्ट्रपती हा बहुमताने निवडून आलेला एक जनप्रतिनिधी असतो. परंतु अमेरिकेचा प्रभाव साता समुद्रांपलिकडे असल्यामुळे अर्थातच या जनप्रतिनिधीचा प्रभाव सर्व जगभर जाणवतो. अमेरिकी राष्ट्रपती कोण आहे, कसा आहे यावर सर्व जगाचं वर्तमान आणि भविष्य अवलंबून असतं. डोनाल्ड ट्रम्प सारख्या बिनडोक राष्ट्रपतीने घातलेला धुडगूस आपल्या सर्वांना ज्ञात आहेच. एक चक्रम डोक्याचा माणूस अमेरिकी राष्ट्रपती म्हणून  निवडून आला तर संबंध जगावर त्याचा काय परिणाम होतो हेही आपण पाहिले. त्यामुळे अमेरिकी राष्ट्रपती कोण आहे आणि त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे हे जाणून घेणे केवळ अमेरिकन लोकांनाच नाही तर संबंध जगाला आवश्यक ठरते.


अमेरिका ही जगातली एक जुनी लोकशाही आहे. इंग्लंड पासून लवकर मिळालेल्या स्वातंत्र्याचा अमेरिकेला फार फायदा झाला. संबंध जगाच्या 150 वर्षे ते पुढे गेले आणि अजूनही आहेत. लोकशाही आणि भांडवलशाही ही तत्वे सर्वात उत्तम आहेत असा त्यांचा ठाम समज आहे. संपूर्ण जगात आपल्यासारखी लोकशाही असावी, आपल्याला विरोधक असू नये अशी त्यांची भावना आहे. त्यासाठी ते  कोणत्याही थराला जातात. युद्ध लढतात. अब्जावधी डॉलर्स खर्च करतात.

 
पूर्वी जगात युरोपीय देश अग्रेसर ठरले होते. संपूर्ण जगावर आपले राज्य त्यांनी स्थापन केले. परंतु दोन महायुद्धांनी त्यांचे पुरते कंबरडे मोडले. त्यांच्या अधिपत्याखालील सर्व देशांना त्यांना स्वातंत्र्य द्यावे लागले. जागतिक महासत्तेचे रूपांतर पुन्हा इटूकल्या पिटूकल्या देशांत झाले. या सर्व पडझडीत वाचला तो अमेरिका. दोन्ही महायुद्धांत सक्रिय सहभाग घेऊनही अमेरिकेचे प्रत्यक्ष नुकसान झाले नाही, उलट युद्धजन्य देशांना शस्त्र पुरवठा करून स्वतः गबर झाला. 


कमी लोकसंख्या मोठे क्षेत्रफळ हे अमेरिकेचे एक भाग्य आहे. त्यात तेलाचा मुबलक साठा गवसल्याने अमेरिकी प्रगतीचा वारू मुक्तपणे उधळला. त्याच्या जोडीला जगात लवकर स्वातंत्र्य मिळणे हेही त्यांच्या पथ्यावर पडले. जोरात आर्थिक प्रगती करत जगातल्या प्रज्ञावंतांना आपल्याकडे आसरा देऊन त्यांनी प्रचंड प्रगती साधली. अशा सर्व गुणसंपन्न अमेरिकेचा राष्ट्रपती जगावर राज्य न करेल तरच नवल.


अमेरिका हा जगामधला अगदी निर्विवादपणे सगळ्यांत ताकदवान देश असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपती या पृथ्वीतलावरचा सगळ्यांत ताकदवान माणूस असणं स्वाभाविकच आहे. दर चार वर्षांनी अमेरिकेमध्ये राष्ट्रपतिपदासाठीची निवडणूक होते. २०१६ मध्ये अमेरिकेचा पंचेचाळिसावा राष्ट्रपती निवडला जाण्यासाठीची निवडणूक होणार आहे. या पाश्र्वभूमीवर आजवरच्या अमेरिकी राष्ट्रपतींच्या कामगिरीचा आणि त्यांच्या आयुष्यांचा आढावा घेणं खूपच महत्त्वाचं आणि रंजकसुद्धा आहे. 


लेखकाच्या अवलोकनानुसार अमेरिकेची दहशतवादाच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं दुटप्पी आहे. इस्राईल, पाकिस्तान, निकारागुआ, अल साल्वादोर अशा अलीकडच्या मित्रांच्या दहशतवादाविषयी अमेरिकेला फारसं दुःख होत नाही; उलट त्यांच्या कृतींचं ती सरळ समर्थनच करते. याउलट अफगाणिस्तान, पॅलेस्टाईन, सीरिया, लीबिया, इराण अशा ठिकाणच्या दहशतवादाला मात्र अमेरिका आपला शत्रू मानते. साहजिकच अमेरिकेच्या या भूमिकेचा जगभरातल्या अनेक देशांमध्ये तीव्र निषेध केला जातो आणि यातून अमेरिका आपल्या शत्रूंची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवते. म्हणूनच खरा दहशतवादी देश कोण आहे, असा विचार आपण करायला लागलो, की सगळ्या जगाच्या लोकशाहीचा, सुरक्षिततेचा आणि शांततेचा मक्ता आपणच घेतला असल्याच्या थाटात वागणाऱ्या आणि प्रत्यक्षात बरोबर याच्या उलट पावलं टाकणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा समोर येतो. अमेरिकेच्या धोरणांचे पडसाद जगावर खूप मोठ्या प्रमाणावर उमटत असल्यामुळे अमेरिकी राष्ट्रपतींचा इतिहास जाणून घेणं, भविष्यात काय घडू शकतं हे समजून घेण्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल, यात शंकाच नाही!


अतुल कहाते यांनी आपल्या लेखनात या सर्व गोष्टींचा मागोवा घेतला आहे. सुरुवातीपासून आताच्या बराक ओबामांपर्यंत सर्व राष्ट्रपतींचे अल्प चरित्र या पुस्तकांत आहे. जास्त फाफट पसारा न करता सर्वांचे चरित्र मुद्देसूद मांडले आहे. अमेरिका आणि अमेरिकेचे राष्ट्रपती यांच्या बद्दल उत्सुकता असणाऱ्या सर्वांना हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा