व्यक्तिचरित्र - अशोक सराफ

Ashok Saraf
अशोक सराफ हे एक लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत. मराठी चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांतही विविध भूमिका केल्या असून दूरचित्रवाणीच्या छोट्या पडद्यावरील हम पांच सारख्या मालिकेमध्येही त्यांनी अभिनय केला. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत मराठी चित्रपटसृष्टीतील विनोदी चित्रपटांचा काळ गाजवणारे अशोक सराफ हे एक मराठी सुपरस्टार आहेत. सिने अभिनेत्री निवेदिता जोशी ह्या सराफांच्या पत्नी असून नाट्य‍अभिनेते रघुवीर नेवरेकर हे त्यांचे मामा होते.

त्यांनी अनेक चित्रपटात विनोदी भूमिका करण्याबरोबरच काही चित्रपटात खलनायकी तसेच विविध भूमिका तितक्याच ताकदीने व रसिकांच्या आयुष्यभर स्मरणात राहतील अशा साकारलेल्या आहेत. उत्कृष्ट अभिनय, सहज विनोद प्रवृत्ती, चेहऱ्यावरील कमालीचे हावभाव, विनोदाची अचूक वेळ, इत्यादी त्यांच्या अभिनयाची वैशिष्ट्ये होती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे या अभिनेत्यांनी मराठी चित्रपटामध्ये फार मोठा काळ गाजवला आहे. चित्रपट क्षेत्रात सर्वांचे लाडके अशोकमामा या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी मी बहुरूपी हे आत्मचरित्र लिहिले आहे.

ओळख

मूळचे बेळगावचे असणाऱ्या अशोक सराफ यांचा जन्म मुंबईत झाला.दक्षिण मुंबईतील चिखलवाडी या भागात त्यांचे बालपण गेले. गोपीनाथ सावकार हे त्यांचे मामा होत. अशोक सराफ यांचे शिक्षण मुंबईतील डी.जी.टी. विद्यालयात झाले. त्यांना सुरुवातीपासूनच नाटकांची अतिशय आवड होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांनी शिरवाडकरांच्या ' ययाती आणि देवयानी ' या नाटकातील विदूषकाच्या भूमिकेद्वारा व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. काही संगीत नाटकांतूनदेखील त्यांनी भूमिका केल्या.

गजानन जागीरदार यांच्या 'दोन्ही घरचा पाहुणा' या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका केली. त्यानंतर दादा कोंडके यांच्या 'पांडू हवालदार'मधील इरसाल पोलीस, 'राम राम गंगाराम'मधील म्हमद्या खाटीक अशा बहुढंगी भूमिका त्यांनी लीलया साकारल्या. अशोक सराफ यांचा नाटक, सिनेमा आणि दूरचित्रवाणी या त्रिस्थळी काम सुरू आहे आणि प्रत्येक माध्यमात त्यांनी अभिनयाची पारितोषिके व पुरस्कार मिळविले आहेत.

चित्रपटात अखंड बडबड करणारी विनोदी पात्रे साकारणारे अशोक सराफ यांचा स्वभाव मात्र शांत व केवळ मित्र-मंडळीतच मिसळणारा आहे.

अभिनय-प्रवास

अशोक सराफ आणि निवेदिता जोशी

अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन त्यांनी आपल्या नाट्य-चित्रसृष्टीतील कामाद्वारे घडविले आहे. दादा कोंडकेंबरोबर पांडू हवालदार , कळत नकळत, भस्म यासारख्या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांपुढे अभिनयाचे वेगळेच पैलू उलगडले. वजीर सारख्या चित्रपटातून राजकारणी व्यक्तिरेखा त्यांनी साकारली तर चौकट राजामधील सहृदय गुणाच्या व्यक्तिरेखा केली. ऐंशीच्या दशकात लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासमवेत त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने अशी ही बनवाबनवी, धूमधडाका, यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. अशोक सराफ यांच्या बहुरंगी अभिनयाला सचिन पिळगांवकर, महेश कोठारे यांसारख्या कसलेल्या दिग्दर्शकांची साथ मिळून नवरी मिळे नवऱ्याला, आत्मविश्वास, गंमत जंमत, आयत्या घरात घरोबापासून अलीकडच्या शुभमंगल सावधान, आई नंबर वन' व 'पहिली शेर दुसरी सव्वाशेर नवरा पावशेर'पर्यंत असंख्य चित्रपटांनी मराठी रसिकांना खिळवून ठेवले.

'अनधिकृत' या त्यांच्या रंगभूमीवरील पुनरारंभाच्या नाटकास योग्य प्रतिसाद मिळाला नाही. 'मनोमिलन'नंतर सध्या अशोक सराफ सारखं छातीत दुखतंय! हे विनोदी नाटक करीत आहेत. त्यांच्या सोबत पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्या सहकलाकार आहेत. पत्‍नी निवेदिता जोशी-सराफ ह्यांच्या सोबत त्यांनी एक निर्मिती संस्था स्थापन करून 'टन टना टन' ही मराठी व काही हिंदी मालिका बनवल्या. हम पांच या झी वाहिनीवरील हिंदी मालिकेने त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी 'दामाद' (जावई) या चित्रपटाद्वारे पाऊल ठेवले. 'करण अर्जुन', 'कोयला', 'येस बॉस', 'जोडी नं.१' हे अशोक सराफ अभिनीत काही उल्लेखनीय चित्रपट.

अमेरिकेतील सिएटल येथे नुकत्याच झालेल्या बृहन्महाराष्ट्र कन्व्हेन्शन २००७ येथे विजय केंकरे दिग्दर्शित 'हे राम कार्डिओग्राम' या नाटकाद्वारे त्यांनी परदेशी रंगमंचावरही पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या भूमिकातून सदैव मनोरंजीत केले आहे.आधीच्या काळी ते नायक,खलनायक,दुहेरी भूमिका सहाय्यक व्यक्तीरेखा व विनोदी भूमिकेत लहान होते आणि सुधीर जोशी,विजू खोटे मोठे होते आणि आजकाल वडलांच्या पात्रात मोठे आहेत आणि प्रथमेश परब, परश्या,अभिजीत खांडकेकर असे ठरावीक जण लहान आहेत.

कारकीर्द

अशोक सराफ यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला. मुख्यत्वे त्यानी सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम केले.सचिन पिळगांवकर अशोक सराफ यांचा आदर करतात. आपल्या प्रत्येक सिनेमात अशोक मामांची भुमिका असावी असा त्यांचा प्रयत्न असतो. अशोक सराफ यांनी मराठी नाटकांतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या वडिलांचा इलेक्ट्रिक वस्तू आणण्याचा व विकण्याचा व्यवसाय होता. अशोक सराफ यांनी बँकेत दहा वर्ष नोकरी केली पण प्रत्यक्षात ते नोकरीवर हजर कमी राहायचे आणि नाटकात जास्त काम करायचे. त्यांची पहिली फिल्मी भूमिका एका विदूषकाची होती. दादा साहेब कोंडके यांच्या 'पांडू हवालदार' या चित्रपटात त्यांनी 'सखाराम हवालदार' या भ्रष्ट हवालदाराच्या भूमिका साकारली. अशोक सराफ यांची अभिनयाची पद्धत ही सीच्युशनल कॉमेडी स्वरूपाची आहे.त्यांची मिमीक्री कुशल बद्रिके व ओमकार भोजने करतात.

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)