व्यक्तिचरित्र - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
परिचय व कार्य
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर असे होते. त्यांचा जन्म मध्य प्रदेशातील महू या गावी १४ एप्रिल, १८९१ रोजी झाला. ते महार या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातीत जन्माला आले असल्याने त्यांना पूर्वायुष्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करावा लागला होता. तथापि, या परिस्थितीवरही मार करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. अमेरिका, इंग्लंडमधील विद्यापीठांच्या उच्च पदव्या त्यांनी संपादन केल्या आणि आपल्या विद्वत्तेची चमक सर्वांना दाखवून दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही अगोदर महात्मा फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी शाहू महाराज इत्यादींनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी कार्य केले होते; परंतु डॉ. आंबेडकर स्वतःच अस्पृश्य समाजातून आले होते. या समाजाच्या वेदना, सुखदुःखे त्यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती; त्यामुळे डॉ. आंबेडकर यांच्या कार्याला वेगळाच अर्थ प्राप्त झाला होता.
अस्पृश्यांच्या हक्कांसाठी संघर्ष
डॉ. आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजासाठी अनेक प्रकारे कार्य केले. तथापि, त्यांची या संदर्भातील सर्वांत महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास व स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्यास शिकविले. अस्पृश्य हे याच देशाचे नागरिक असून या देशावर इतर कोणाहीइतकाच त्यांचाही अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. अस्पृश्यांचे हक्क प्रस्थापित करण्याच्या प्रश्नाला त्यांनी सर्वाधिक महत्त्व दिले.
डॉ. आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह (२० मार्च, १९२७), मनुस्मृतीचे दहन (२५ डिसेंबर, १९२७), नाशिकच्या काळाराम मंदिरप्रवेशाचा सत्याग्रह (३ मार्च, १९३०) इत्यादी कार्यक्रमांद्वारे अस्पृश्यांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला. त्यांच्या या कृतींना प्रतीकात्मक अर्थ होता. त्याद्वारे त्यांना हे दाखवून द्यावयाचे होते की, उच्च वर्णीयांनी अस्पृश्यांना वर्षानुवर्षे त्यांच्या न्याय्य हक्कांपासून वंचित ठेवले असले तरी यापुढे अस्पृश्य बांधव आपल्या न्याय्य हक्कांसाठी प्रत्यक्ष संघर्षाचा मार्ग अवलंबून ते हक्क मिळवून घेतील. आंबेडकरांच्या या कृतीतूनच अस्पृश्यांची अस्मिता जागृत झाली. आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये अस्पृश्यांचे प्रतिनिधित्व करून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. १७ ऑगस्ट, १९३२ रोजी इंग्लंडचे पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्ड यांनी 'जातीय निवाडा' जाहीर करून आंबेडकरांची ही मागणी मान्य केली. महात्मा गांधींचा अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध होता. स्वतंत्र मतदारसंघाच्या निर्मितीमुळे अस्पृश्य समाज उर्वरित हिंदू समाजापासून दूर जाईल, अशी त्यांची धारणा होती; त्यामुळे जातीय निवाड्यातील या तरतुदीच्या विरोधात त्यांनी येरवडा तुरुंगात प्राणांतिक उपोषण सुरू केले. या प्रसंगी गांधीजींचे प्राण वाचावेत म्हणून आंबेडकर तडजोडीस तयार झाले. त्यानुसार २४-२५ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व आंबेडकर यांच्यात एक करार घडून आला. हा करार 'पुणे-करार' म्हणून ओळखला जातो. या करारान्वये आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह सोडला व अस्पृश्यांसाठी कायदेमंडळात राखीव जागा असाव्यात, असे उभयपक्षी ठरविण्यात आले.
ऑगस्ट, १९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली आणि या पक्षाची ध्येय, धोरणे स्पष्ट करणारा जाहीरनामा १५ ऑगस्ट, १९३६ रोजी प्रसिद्ध केला गेला व जुलै १९४२, मध्ये 'शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन'ची स्थापना केली. या पक्षांच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यांच्या हितरक्षणासाठी अविरत प्रयत्न केले. त्यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्यही अतिशय मोलाचे आहे. 'बहिष्कृत हितकारिणी सभा', 'पीपल्स एज्युकेशन सोसायटी' या संस्थांमार्फत अस्पृश्यांमध्ये शिक्षणप्रसार घडवून आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. पुढे या संस्थांच्या माध्यमातूनच २० जून, १९४६ रोजी मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना करण्यात आली.
डॉ. आंबेडकर हे 'भारतीय घटनेचे शिल्पकार' म्हणून ओळखले जातात. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने भारतीय राज्यघटना तयार करण्यात त्यांनी महत्त्वाचा वाटा उचलला होता. १४ ऑक्टोबर, १९५६ रोजी त्यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६ डिसेंबर १९५६ रोजी मृत्यू झाला.
Comments
Post a Comment