आधुनिक भारताचा इतिहास, लेखक - के सागर, दर्जा - ★★★★★

महाराष्ट्रातल्या सुप्रसिद्ध MPSC या स्पर्धा परीक्षा म्हटल्या की के सागर अथवा क्षीरसागर यांची त्या विषयांवरील पुस्तके प्रमाण मानली जातात. मी स्वत: काही अशा स्पर्धा परीक्षांत सहभागी नसलो तरी या पुस्तकांचे वाचन करून आपले सामान्य ज्ञान वाढवणे मला आवडते. विशेषत: इतिहाचे संक्षिप्त आणि वस्तुनिष्ठ ज्ञान मिळवण्यासाठी ही पुस्तके अत्यंत उपयुक्त आहेत. क्षीरसागर यांनी ही पुस्तके लिहिताना निष्पक्षपणे त्या विषयाची माहिती दिली आहे. त्यात त्यांनी कुठल्याही पक्षाची बाजू घेतलेली नाही. त्यामुळे त्यांच्या लिखाणाला राजकीय रंग आलेला नाही. 
मी इतिहास या शृंखलेतील प्राचीन भारत, मध्य युगीन भारत आणि आधुनिक भारत असे सर्व संच वाचले. आपण आपला इतिहास फक्त शाळेत असताना शिकतो. त्यावेळी आपण शाळेच्या परीक्षेच्या दडपणाखाली असतो. त्यामुळे त्यावेळी तो इतिहास आपल्या डोक्यात शिरत नाही. त्या अभ्यासाचा आपल्याला तिटकारा असतो. सनावळ्या पाठ करून वीट आलेला असतो. त्यामुळे आपण इतिहास शिकत नसून फक्त परिक्षार्थी असतो. एकदा परीक्षा संपली की आपण सगळे विसरून जातो. आता मात्र शाळा कॉलेजचे टेंन्शन संपल्यावर इतिहासाचा अभ्यास सोपा वाटतो. त्यावरची पुस्तके वाचायला मजा येते. इतिहासातील कितीतरी घटना आपल्याला माहीत नव्हत्या ते पाहून आश्चर्य वाटते. 
एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून भारताच्या मूलभूत इतिहासाची माहिती आपणा सर्वांना असलीच पाहिजे असे मला वाटते. अशी पुस्तके वाचताना ती राजकीय दृष्ट्या प्रेरित असण्याची आणि एककल्ली असण्याचा धोका असतो. आपल्या स्वार्थासाठी काही राजकीय लोक पूर्ण इसतिहासच आपल्या सोईने बदलतात. तो धोका टाळण्यासाठी के सागर यांची ही निष्पक्ष पुस्तके आपल्याला उपयोगी पडतात. त्यांची लेखनशैली अत्यंत सुलभ असून सर्व सामान्य वाचकांना त्यांची पुस्तके वाचताना फारसा प्रयास पडत नाही. पुस्तकाचा पसारा उगाचच वाढू नये, इतिहासाची समग्र माहिती वाचकांपर्यंत सुलभरीत्या आणि थोडक्यात पोचावी यासाठी त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. 
पुस्तकाची सुरुवात विदेशी पाहुण्यांचे व्यापारासाठी भारतात आगमन होण्याने होते. भारतातील त्याकाळची अनागोंदी पाहून, चतुरतेने त्याचा फायदा उठवून शेवटी संपूर्ण भारतच घशात घालण्यापर्यन्त त्यांची मजल गेली. त्यासाठी आपल्या लोकांची भ्रष्ट वागणूक आणि गाफीलपणा कारणीभूत झाल्याचे दिसते. भारतातल्या धार्मिक, सामाजिक आणि भाषिक दुहिचा यांनी फायदा उठवला. आपल्या लोकांनाच आपल्या विरुद्ध वापरले. आजही परिस्थिती काही वेगळी नाही आहे. अजूनही भारत धर्म आणि जातीपातीच्या राजकारणात पोखरलेला आहे. जर आपण वेळीच सावध झालो नाही तर पुन्हा एकदा पारतंत्र्यात जाण्याचा धोका आपल्याला होऊ शकतो. एकदा पारतंत्र्याच्या ज्वाळा अनुभवल्यानंतर तरी आपल्या जनतेला शहाणपण येईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही. या ज्वाळांची लोकांना जाण होण्यासाठी त्यांनी आवर्जून आपल्या इतिहाचा अभ्यास केला पाहिजे व मागे झालेल्या चुका पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. 


Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा