व्यक्तिचरित्र - मनोहर जोशी

Manohar Joshi

मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावात झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती खूप वाईट. त्यामुळे त्यांचं आयुष्याचा प्रवास खडतर राहिला. वडील भिक्षुकी मागायचे. मनोहर जोशी यांनीही भिक्षुकीतून मागून कुटुंबाला हातभार लावला. मनोहर जोशी यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले.त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती.पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले.

मनोहर जोशींचं चौथीपर्यंतच शिक्षण नांदवीला झालं. पाचवीचं शिक्षण महाड, तर सहावीनंतर ते मामाकडे पनवेलला आले. मामाची बदली झाल्यानंतर ते गोल्फ मैदानात बॉयची नोकरी करू लागले. या काळात ते मित्राच्या खोलीत राहत होते. पुढे मनोहर जोशी ११ वीच्या शिक्षणासाठी मुंबईतील बहिणीकडे आले. सहस्त्रबुद्धे क्लासमध्ये त्यांनी शिपायाची नोकरी केली आणि शिक्षण घेतले. नंतर किर्ती कॉलेजमधून त्यांनी बीएची पदवी घेतली. वयाच्या २७व्या वर्षी एम.ए, एल.एल.बीची पदवी घेतली. महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनोहर जोशी यांनी वयाच्या ७२व्या वर्षी पीएच.डी पूर्ण केली. 'शिवसेनेची निर्मिती, वाढ, स्वरूप, यशापयश आणि भारतीय राजकारणातील शिवसेनेचे भवितव्य यांचा विश्लेषणात्मक अभ्यास' या विषयावर त्यांनी संशोधन करून पीएच.डी मिळवली होती. पुढे डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून त्यांना डी.लिट ही मानद पदवीही प्रदान करण्यात आली होती.

नंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरीला लागले. परंतु नोकरी करायची नाही, काहीतरी उद्योग करायचा या विचाराने त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले. मनोहर जोशी यांचा पिंड व्यवसायिकाचा होता. दूध, फटाके विक्री, हस्तीदंती वस्तूंची विक्री असे व्यवसाय त्यांनी केले. त्यातील काही बुडाले. पुढे २ डिसेंबर १९६१ मध्ये नोकरी सोडून त्यांनी कोहिनूर या नावाने क्लासेस व्यवसाय सुरू केला. याचेच पुढे कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट झाले. त्याच्या भारतात ७० शाखा आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मनोहर जोशी हे शिवसेनेकडे खेचले गेले. 1967 पासून त्यांनी अधिकृतपणे शिवसैनिक म्हणून काम सुरू केले. पक्षाचे काम करत असताना ते पहिल्यांदा मुंबई महापालिकेचे नगरसेवक झाले. दोन वेळा ते नगरसेवक राहिले.

नंतर सलग तीन वेळा ते विधान परिषदचे आमदार राहिले. पुढे १९७६ मध्ये ते मुंबई महापालिकेचे महापौर झाले. पुन्हा त्यांची पाऊले राज्याच्या राजकारणात पडली आणि ते आमदार म्हणून विधानसभेत गेले. पुढे ते १९९०-९१ या काळात विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले. महाराष्ट्रात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळाल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना  मुख्यमंत्री केले. ते १९९९ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. नंतर त्यांना एका प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला.

मनोहर जोशी राज्याच्या राजकारणातून नंतर केंद्रात गेले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रीय अवजड उद्योगमंत्री बनले. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. २००६ ते २०१२ या काळात खासदार असताना त्यांनी विविध समित्यांचं काम केलं.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा