व्यक्तिचरित्र - सरदार भगतसिंग

सरदार भगतसिंग यांना 'भारतीय क्रांतिकारकांचे मेरुमणी' असे म्हटले जाते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारी चळवळींमध्ये भगतसिंगांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांचे संपूर्ण घराणेच क्रांतिकारक म्हणून प्रसिद्ध होते. पंजाबमधील प्रसिद्ध क्रांतिकारक अजितसिंग हे त्यांचे चुलते होत. भगतसिंगांचे वडील किसनसिंग व आणखी एक चुलते हे देखील स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.

भगतसिंग यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता. स्वतंत्र भारतात समाजवादी पद्धतीची समाजरचना निर्माण व्हावी, अशी त्यांची अपेक्षा होती. इंग्रज राज्यकर्त्यांना आपल्या देशातून हाकलून लावणे हे आपले आद्य कर्तव्य आहे; तथापि, स्वतंत्र भारतात गोरगरीब-कष्टकरी जनतेला न्याय मिळेल अशी समाजव्यवस्था निर्माण करणे हीदेखील आपली जबाबदारी आहे, असे त्यांचे म्हणणे होते.

भगतसिंग यांचा सशस्त्र क्रांतीच्या मार्गावर विश्वास होता. जुलमी इंग्रज राज्यकर्त्यांशी शस्त्रांच्या मार्गानेच मुकाबला केला पाहिजे; कारण त्यांना केवळ शस्त्रांचीच भाषा समजते, असे त्यांनी म्हटले होते. सशस्त्र क्रांतीशिवाय देशाला तरणोपाय नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी

सरदार भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी ९ व १० सप्टेंबर, १९२८ रोजी दिल्ली येथे आयोजित केलेल्या एका गुप्त परिषदेत 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन' या नावाची संघटना स्थापन केली. या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट इंग्रजी सत्तेविरुद्ध सशस्त्र लढा देणे हे होते. त्याकरिता तिने 'हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी' या नावाची सशस्त्र क्रांतिकारी सेना उभी केली. या सेनेतर्फे बाँब तयार करणे, तरुणांना शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देणे, इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले.

लाहोर कट खटला

भारताला काही सुधारणा देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने ८ नोव्हेंबर, १९२० रोजी सायमन कमिशनची नियुक्ती केली. त्यांमध्ये एकही भारतीय सदस्य नव्हता. तेव्हा या एकूण सात सदस्य कमिशनकडून आपणास न्याय मिळणार नाही, असे सांगून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सायमन कमिशनचे सदस्य भारतात आल्यावर येथील अनेक शहरांत त्यांच्यापुढे निदर्शन झाली. 'सायमन परत जा' अशा घोषणांनी जनतेने या कमिशनचे स्वागत केले. लाहोर शहरात सायमन कमिशनविरुद्ध ३० ऑक्टोबर, १९२८ रोजी झालेल्या निदर्शनांचे नेतृत्व वयोवृद्ध नेते लाला लजपतराय यांनी केले होते. त्या वेळी पोलिसांनी निदर्शकांवर अमानुष लाठीमार केला. लाला लजपतराय या लाठीहल्ल्यात जबर जखमी झाले व पुढे त्यातच १७ नोव्हेंबर, १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.

लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या स्कॉट या अधिकाऱ्याला ठार मारण्याचा प्रयत्न सरदार भगतसिंग यांनी केला; पण या प्रयत्नात स्कॉटऐवजी सँडर्स या अधिकाऱ्याची हत्या झाली- १७ डिसेंबर, १९२८.

मध्यवर्ती कायदेमंडळात बाँबस्फोट

याच वेळी सरकारने 'ट्रेड डिस्प्यूट बिल' व 'पब्लिक सेफ्टी बिल' ही सरकारी दडपशाहीला वाव देणारी दोन विधेयके मध्यवर्ती कायदेमंडळात मांडण्याचा निर्णय घेतला. या विधेयकांचा क्रांतिकारी मार्गाने निषेध करण्याचा निर्णय हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी यांनी घेतला. त्यानुसार ट्रेड डिस्प्यूट बिल कायदेमंडळात मांडले जात असताना सरदार भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात बाँबस्फोट घडवून आणला. त्याच वेळी या स्फोटामागील आपला उद्देश स्पष्ट करण्यासंबंधीची पत्रकेही त्यांनी सभागृहात फेकली- ८ एप्रिल, १९२९.

भगतसिंग व सहकाऱ्यांना फाशी

कायदेमंडळातील बाँबस्फोटाच्या प्रकरणात तसेच अन्य काही प्रकरणांत सरदार भगतसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यात आले. सरकारने या सर्वांवर निरनिराळ्या आरोपांखाली खटला भरला. न्यायालयात या क्रांतिकारकांवर खटला चालू असताना त्यांनी आपल्यावरील आरोप निर्भयपणे मान्य केले आणि सरकारचा निषेध करण्यासाठी आपण ही कृत्ये केली असल्याचे स्पष्टपणे सांगितले. सरदार भगतसिंग व त्यांचे सहकारी यांच्याविरुद्धचा हा खटला 'लाहोर कट खटला' म्हणून ओळखला जातो. या खटल्यात न्यायालयाने भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली. २३ मार्च, १९३१ रोजी या महान क्रांतिकारकांना फाशी देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)