व्यक्तिचरित्र - चंद्रशेखर आझाद
चंदशेखर आझाद यांनी सरकारविरुद्ध अनेक क्रांतिकारक कारवायांमध्ये भाग घेतला होता. शस्त्रास्त्रे तयार करणे, सरकारी खजिन्यांची लूट करणे, सरकारी अधिकाऱ्यांवर हल्ले करणे यांसारखे कार्यक्रम आझाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतले होते.
काकोरी कट खटला
चंदशेखर आझाद यांचे नाव काकोरी कट खटल्याच्या निमित्ताने प्रथम लोकांपुढे आले. ९ ऑगस्ट १९२५ रोजी चंद्रशेखर आझाद, राम प्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिडी, रोशनसिंह ठाकूर, अशफाकू उल्ला खान इत्यादी क्रांतिकारकांनी काकोरी रेल्वे स्टेशनजवळ रेल्वेगाडी अडवून सरकारी खजिन्याची लूट केली. सरकारने या क्रांतिकारकांना पकडून त्यांच्यावर खटला भरला. हा खटला 'काकोरी कट खटला' या नावाने प्रसिद्ध आहे. या खटल्यातील काही आरोपींना फाशीची तर इतरांना जन्मठेपेची शिक्षा झाली. चंद्रशेखर आझाद हे मात्र पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यांनी भूमिगत राहून आपले क्रांतिकार्य चालूच ठेवले.
सरकारची वाढती दडपशाही
देशात क्रांतिकारक संघटनांचा प्रभाव जसजसा वाढू लागला तसतसे सरकारने क्रांतिकारकांविरुद्ध अधिक कडक धोरण स्वीकारले. साहजिकच, सरकारी दडपशाही मोठ्या प्रमाणावर वाढली. क्रांतिकारकांना निरनिराळ्या उपायांनी उपद्रव देण्यास सरकारने सुरुवात केली. यांमध्ये क्रांतिकारकांची धरपकड करणे, त्यांना तुरुंगात डांबणे, त्यांच्यावर राजद्रोहासारखे गंभीर आरोप ठेवून खटले भरणे, क्रांतिकारकांशी संबंध असल्याच्या संशयावरून निरपराध व्यक्तींचाही छळ करणे, लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करणे इत्यादी उपायांचा समावेश होता; परंतु भारतीय क्रांतिकारक सरकारच्या या उपायांनी नमले तर नाहीतच, उलट सरकारला त्याच भाषेत प्रतिउत्तर देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला; त्यामुळे सरकारी दडपशाही वाढत चाललेली असतानाच क्रांतिकारकांच्या घातपाती कृत्यांतही खंड पडला नव्हता.
मातृभूमीसाठी प्राणाहुती
काकोरी कट व अन्य काही प्रकरणांच्या संदर्भात चंद्रशेखर आझाद पोलिसांना हवे होते; त्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी बरीच खटपट केली; परंतु चंद्रशेखर आझाद अनेक दिवस पोलिसांना हुलकावण्या देत राहिले. त्यांनी भूमिगत अवस्थेत असतानाही देशाच्या विविध भागांत क्रांतिकार्याचे जाळे विणण्याचा प्रयत्न चालविला. देशातील क्रांतिकारक विचारांच्या तरुणांशी संपर्क साधून त्यांना क्रांतिकार्याचे प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम त्यांनी आखला. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या क्रांतिकारकांच्या संघटनेचे कार्यक्षेत्र विस्तृत करण्यात चंद्रशेखर आझाद यांचा अतिशय महत्त्वाचा वाटा होता; परंतु पुढे त्यांचा पोलिसांशी झालेल्या चकमकीत दुर्दैवी अंत झाला. भूमिगत अवस्थेत अलाहाबाद येथील आल्फ्रेड पार्कमध्ये आले असताना त्यांच्या आगमनाचा पोलिसांना सुगावा लागला. लगेच त्यांनी संपूर्ण पार्कला वेढा दिला. तथापि, अशा कठीण परिस्थितीतही चंद्रशेखर आझाद यांनी अतिशय धैर्याने पोलिसांशी समोरासमोर संघर्ष केला. त्यातच त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले- २७ फेब्रुवारी १९३१.
Comments
Post a Comment