Book Review - सुहास शिरवाळकर - समांतर - दर्जा ★★★★★
‘मुळात खरं तर माझी इथ येण्याची इच्छाच नव्हती. इथंच काय, या क्षणापर्यंत मी अशा कोणत्याच ठिकाणी कधी गेलो नव्हतो. वाफगावकरनं इतकी मनधरणी केली केली… त्याचं मन मोडायचं नाही, म्हणून केवळ मी आलो होतो’ या वाक्यानं कादंबरीची सुरुवात होते आणि उत्सुकता चाळवण्याचीही!
कुमार महाजन चारचौघांसारखा तिशीतला तरुण. छोटासा संसार असलेला. पण त्याची आर्थिक ओढाताण होतेय. कुटुंबाचा खर्च वाढतोय पण पैसे पुरत नाहीत. बायकोच्या माफक अपेक्षा पूर्ण करता येत नाहीयेत, लहान मुलाचे हट्टही पूर्ण करता येत नाहीयेत. त्यात त्याची नोकरी जाते. अशा ओढग्रस्तीच्या परिस्थितीत त्याचा मित्र वाफगावकर त्याला घेऊन जातो एका स्वामींकडे… कुमारचं भविष्य जाणून घेण्यासाठी. कुमारलाही आपलं भविष्य जाणून घ्यायचं आहे. काय असेल कुमारचं भविष्य? मुळात देव, नशीब अशा गोष्टींवर विश्वास नसलेला नास्तिक कुमार, स्वामींनी सांगितलेल्या भविष्यावर कसा विश्वास ठेवतो ? त्याच्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय? आणि स्वामींची भविष्यवाणी खरी ठरते का? या साऱ्या प्रश्नांची उकल करणारी, एक जबरदस्त सपेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘समांतर’.
सुहास शिरवाळकर तथा सुशी यांच्या लिखाणाचे विश्वच वेगळे असते आणि वाचकाला त्या विश्वात पुस्तक संपेपर्यंत ठेवण्याचे कसब सुशी मोठ्या खुबीने करतात. हाच अनुभव समांतर वाचताना येतो. कादंबरी गूढकथा प्रकारची आहे. कुमार महाजन या गृहस्थाच्या जीवनात लाखात एक घडणाऱ्या घटना घडत असतात त्यातच भर म्हणून त्याच्या हातच्या रेषा अगदी तंतोतंत चक्रपाणी नामक इसमाच्या हाताशी जुळतात येथून कथानक सुरू होते. पुढे दोन व्यक्ती काही वर्षांच्या फरकाने अगदी समांतर जीवन कसे जगतात यावर कथानक फिरते आणि चकित आणि थोडा भीतीदायक शेवट करून पुस्तक संपते.
सुशी नी पात्रे फार छान रंगवली आहे, वाफगावकर हे पात्र असेच नायकाकडून उपेक्षा सहन करून देखील मैत्री टिकवायचे काम या पात्राने छान केले आहे त्यामुळे पात्र लक्षात राहते. असेच चक्रपाणी हे पात्र हे पात्र शेवटपर्यंत स्वतःभोवतीचे गूढ वलय किंचितभरही कमी होऊ देत नाही. पूर्ण पुस्तकात नायकाभोवती घटना देखील आपण गूढकथा वाचतोय याची जाणीव करून देतात.
या पुस्तकाने मागील लॉकडाऊन मध्ये चांगलाच धुमाकूळ घातला होता कारण यावर आधारित एक वेबसिरीज तेव्हा रिलीज झाली होती. त्यामुळे हे पुस्तक चांगलेच प्रकाशात आले होते. हे पुस्तक एका बैठकीत वाचून संपण्यासारखे आहे. जर तुम्ही शिरवळकरांचे वाचक असाल आणि गूढकथा आवडत असतील तर निश्चित एखाद्या सुटीच्या दिवशी वाचावं असं हलकेफुलके पुस्तक.
Comments
Post a Comment