निरंजन घाटे - स्वप्नचौर्य ★★★★

आधुनिक मराठी विज्ञान कथांचे भीष्म पितामह कोण असे कोणी विचारले तर निरंजन घाटे यांचे चित्र समोर उभे राहते. मी कॉलेजला असल्यापासून त्यांच्या विविध विज्ञान कथांचा आणि विज्ञान लेखनाचा आस्वाद घेतला आहे. त्यांचे कथा लेखन ओघवते आणि चातुर्यपूर्ण असते. स्वप्नचौर्य हा एक कथासंग्रह माझ्या वाचनात आला. विज्ञानकथांचे पितामह या नात्याने त्यांच्याकडून अपेक्षा फार असतात, पण प्रत्येक वेळी हे रसायन जुळून येईलच असे काही नाही. अगदी पहिल्या 'पराभूत' या कथेने माझी निराशा केली. घाटे सर नेहमी त्यांच्या कथा एका अंधारात सुरू करतात. निम्मी कथा वाचेपर्यन्त कशाचा पायपोस कशाला लागत नाही. आणि कथेच्या अगदी शेवटी त्या कथेतील विज्ञानाचा उलगडा  करतात. या कथेचे असेच झाले आहे. अगदी निम्याहून अधिक कथा संपेपर्यंत काय चालले आहे ते समजत नाही. कुठले पात्र कोणाचे काय लागते हे न समजल्यामुळे बराच गोंधळ उडतो. घाटे सरांनी कथा सुरुवात करताना, कथेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगणे वाचकांच्या दृष्टीने सोईचे ठरेल असे वाटते.

अयोनिज या कथेत मानवी क्लोनिंगची कल्पना सुचवून शेवटी अचानक त्याचा ज्योतिष शास्त्राशी संबंध लावून थोडी निराशा केली आहे. कुठल्याही मानवाची कितीही अचूक कार्बन कॉपी काढली, तरी त्याचे विचार, आचार, बुद्धी इत्यादी पूर्णपणे परिस्थितीजन्य असते, याचा कथेत विचार केला गेला नाही आहे.पुढल्या कथेचे म्हणजे 'प्रतारणा' चे लेखन चांगले झाले आहे, ज्यात संशोधनाच्या नावाखाली एखाद्याची फसवणूक कशी होऊ शकते हे दाखवले आहे. 'कळवलेले भास' या कथेत आईचे केलेल व्हर्चूवल अंतिम संस्काराची कल्पना भविष्यात कदाचित प्रत्यक्षात येऊ शकते. पृथ्वीपासून दूर एका अवकाशतळावर राहणाऱ्या डॉक्टरचे परग्रहवासीय 'अपहरण' करतात, आणि डॉक्टरला "व्हेन यू कँट अव्हॉईड रेप ...." ही कॉर्पोरेट जगातील सुप्रसिद्ध म्हण आठवते. 'प्रतारणा' आणि 'धक्का' या दोन्ही कथेत पती-पत्नी संबंधातील धोकाधडी दाखवली आहे. एकाच संग्रहात अशा दोन कथा पाहून, घाटे सरांचा याबाबत काही वाईट अनुभव असावा असे वाटते. 

या संग्रहातील सर्वोतकृष्ट कथा 'परीक्षा' ही आहे असे मला वाटते. त्याचे उपरोधिक विनोदाचे लेखन घाटे यांनी छान केले आहे. आपलेच भविष्यातील वारस कालप्रवासाने पुन्हा आपल्या काळात शिरून आपल्या समस्या कशी सोडवतात हे पाहायला मिळते. 'नरोवा कुंजरोवा' या कथेत तर काही वेळा आलेला क्लोनिंग हा शब्द वगळता कुठेच विज्ञान कथा नाही. याशिवाय लेखकाने महाभारतातील फसवणुकीचा एका मानवी क्लोनला फसवण्यासाठी केलेला वापर काही पटत नाही. 'व्यथा' ही कथा शेवटपर्यन्त एखाद्या विज्ञान विश्वकोशाप्रमाणे माहिती देते, आणि शेवटच्या काही परीच्छेदांत मुख्य विषयाला हात घालते. 'कळसूत्री' या कथेत यंत्रमानव हळूहळू माणसाकडून सर्व शिकून, त्याला आपली कळसूत्री बाहुली कशी बनवत आहेत याची रंजक कथा आहे. 'ब्रह्मा न जानाति' ही आणखी एक क्लोनकथा. ह्या पुस्तकास क्लोन विशेषांक म्हणण्यास हरकत नाही. 'चाणक्यनीती' कथेत त्याचा कुठेही वापर दिसत नाही, देवयानी-ययाती च्या कथेचा आधार घेतलेला आहे.

या व अशा इतर कथांनी हा कथासंग्रह समृद्ध आहे. काही कथा घाटेंनी चांगल्या खुशखुशीत ढंगात लिहिल्या आहेत, तर काही ठिकाणी हा प्रयत्न सपशेल फसलेला आहे. निरंजन घाटे हे माझे पूर्वीपासून एक आवडते विज्ञानकथा लेखक आहेत. वयानुरूप आता त्यांचे लिखाण कमी झाले आहे. त्यांनी आपल्या हयातीत अनेक काल्पनिक आणि वास्तव लेखन केलेले आहे. मराठी विज्ञान विश्वात त्यांची काहीशी आयजॅक असीमोव सारखी प्रतिमा आहे. एकंदरीत हा कथासंग्रहाबद्दल माझे संमिश्र मत झाले आहे. लेखनातल्या काही चुका आपण त्यांना माफ करायला काहीच हरकत नसावी. विज्ञानकथा वाचकांना हा कथासंग्रह नक्कीच आवडेल असे मला वाटते.

Comments

Popular posts from this blog

कॉम्रेड गोविंद पानसरे - शिवाजी कोण होता? ★★★★★

Short Books Recommendations

जेमी ग्रीन - द पॉसिबिलिटी ऑफ लाईफ ★★★