पुस्तक परिचय - एस एल भैरप्पा - आवरण आणि सार्थ

S. L. Bhairappa Avaran Sarth
छद्मी धर्मनिरपेक्षता आणि ती जोपासणारी कडवी जातीयवादी इकोसिस्टीम समजून येईल या दोन पुस्तकांमधून...... आवरण आणि सार्थ पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित, ज्यांनी एकहाती पुरोगाम्यांच्या आव्हानाला साहित्यात उत्तर दिले...आणि ज्यांचे साहित्य समाजाने उचलून धरले ...असे प्रसिद्ध कन्नड लेखक एस_एल_भैरप्पा यांची ही दोन प्रसिद्ध पुस्तकं.  भारतातील छद्मी धर्मनिरपेक्षता तिच्या अडून हिंदू धर्मावर होत असलेले हल्ले, झालेले हल्ले, इतिहासातील हल्ले आणि पाडलेली पवित्र मंदिरे...लव्ह जिहाद आदी गोष्टी! लव्ह आणि लव्ह जिहाद मधील अंतर समजून घेताना आवरण उपयोगी पडते.....रक्षाबंधन भेट म्हणून एक चांगली निवड! भारतातील  ढोंगी सेक्युलर लोकांचे लक्तर या कादंबरीतून भैरप्पा ने वेशीवर टांगून ठेवले आहेत...जे पुरोगामी विचारांचा भुरका तोंडावर घेऊन बसले.. त्यांचा तो भुरका भैरप्पांनी टराटरा फाडला आहे!

आवरण

गेली तीन-चार दशके कन्नड भाषेतील सर्वाधिक खपाचे कादंबरीकार आहेत - डॉ एस एल भैरप्पा! आजवर त्यांनी 21कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच लोकप्रियही ठरल्या. भारतातल्या आघाडीच्या कादंबरीकारांमध्ये भैरप्पा यांचे स्थान वरचे आहे. ते सिद्धहस्त लेखक आहेत. केवळ कल्पना आणि लालित्यशैलीच्या बळावर कादंबऱ्या प्रसवणाऱ्या लेखकांच्या कुळातले हे नाहीत. कुठल्याही विषयावर लिखाण करण्याआधी त्या विषयाचा सर्व अंगाने अभ्यास-वाचन करतात.भरपूर परिश्रम घेतात. त्या विषयातील तज्ज्ञांशी विचारविमर्ष करतात. "पर्व" ही कादंबरी लिहिण्यापूर्वी त्यांनी तब्बल साडेसहा वर्षे महाभारतकालीन जीवनविषयक ग्रंथांचा अभ्यास केला होता.

कोट्यवधी हिंदूचे आद्य आराध्य दैवत असलेल्या काशी विश्वनाथाला दरवर्षी पंचवीस कोटी लोक जातात पण तिथे जी मस्जीद आहे तेच मूळचे काशी विश्वनाथाचे मंदीर आहे. आपण जिथे नमस्कार करतो ते मूळ मंदीर नाही  हे लक्षात आल्यावर मूळ मंदिराच्या स्थळावर नमस्कार करण्याची इच्छा तीव्र होते. कोट्यवधी भारतीयांच्या या इच्छेला सुप्रसिद्ध कन्नड कादंबरीकार डॉ एस.एल. भैरप्पा यांनी "आवरण" या कादंबरीतून वाचा फोडली आणि ती कादंबरी केवळ कन्नड वाचकांची न राहता भारतीयांची झाली. कन्नड भाषेत पंचवीस आवृत्या निघाल्या आणि अन्य भारतीय भाषांच्या आवृत्त्या दररोज वाढत आहेत.

फेब्रुवारी 2007 मध्ये "आवरण" प्रकाशित झाली. 2009 पर्यंतच हिची 22पुनर्मुद्रणे झाली. तीन वर्षांत या कादंबरीवर 10 चर्चासत्रे झाली. या पुस्तकावर 10 पुस्तके प्रकाशित झाली, त्यापैकी 4 पुस्तके ही "आवरण'वर टीका करणारी आहेत. आवरणने कन्नड पुस्तकांच्या खपाचे आजवरचे सारे विक्रम मोडून काढले आहेत.

वाचकांनी या कादंबरीला डोक्यावर घेतले आहे, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानपीठ पुरस्कार विजेते यू.आर. अनंतमूर्ती, गिरीश कर्नाड, चंद्रशेखर कंबार अशा नामवंत कन्नड लेखक-नाटककारांनी या कादंबरीवर टीकेची झोड उठवली आहे.गंमत म्हणजे जी नामवंत विचारवंत मंडळी आवरणवर तुटून पडताहेत, टीका करताहेत त्या प्रवृत्तीची पात्रे कादंबरीत आहेत. सत्य झाकोळणाऱ्या या प्रवृत्तीला पुराव्यानिशी उघडे पाडणे हा या कादंबरीचा गाभा आहे.

सत्य कोणाच्या रागालोभाची पर्वा करीत नाही. एका अर्थाने आवरण ही सत्यनिष्ठ कादंबरी आहे. "हिडन टॉरिझन्स : 1000 ईयर्स ऑफ इंडियन सिव्हिलायझेशन'चे लेखक एन.एस. राजाराम यांनी आवरणची तुलना डॅन ब्राऊन यांच्या विश्वविख्यात "दा-विंची कोड" या कादंबरीशी केली आहे. स्वार्थी आणि प्रभावी शक्तींनी खरा इतिहास दडपून ठेवून खोट्या इतिहासाचा प्रचार करणं, हे दोन्ही कलाकृतींमधील समान सूत्र आहे.

कादंबरीची सुरुवात फ्लॅश बॅकपद्धतीने होते. ही कादंबरी ऐतिहासिक आणि वर्तमान या दोन स्तरांवर उलगडत जाते. 1992 साली बाबरी ढांचा पाडण्यात आल्यानंतर समाजात धार्मिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असते. त्यानुसार प्राचीन वास्तू-शिल्पांवर आधारित माहितीपट निर्माण करण्याचे काम आमीर आणि रझिया कुरेशी यांच्यावर सोपविण्यात येते. माहितीपटाच्या प्राथमिक तयारीसाठी दोघेही विजयनगर (हंपी) येथे येतात. तेथील उद्‌ध्वस्त मंदिरे पाहून रझिया अंतर्मुख बनते.

रझिया ही पूर्वाश्रमीची हिंदू असते. लक्ष्मी तिचं आधीचं नाव.आमीरच्या प्रेमात पडून तिने धर्मांतर केलेले असते. घरातून वडिलांचा विरोध असूनही पुरोगामी विचारांच्या प्राध्यापक शास्त्री यांच्या प्रोत्साहनामुळे आणि आमीरच्या आधुनिक विचारांमुळे ती मुस्लिम बनते. हिंदू धर्मावर टीका करणे आणि प्रस्थापित विचारवंतांच्या वर्तुळात वावरणे यामुळे ती सतत प्रसिद्धीत असते. याच सुमारास विजयनगरच्या भग्न अवशेषांनी ती अंतर्मुख होऊन सत्य जाणण्याचा प्रयत्न करू लागते.

रझिया सत्यावर आधारित डॉक्युमेंटरीचा आग्रह धरू लागते अन्‌ आमीर मात्र सत्याशी प्रतारणा करीत असल्याचे तिच्या ध्यानात येऊ लागते. दरम्यान तिच्या वडिलांचे - आप्पांचे निधन होते. लक्ष्मी तब्बल 28 वर्षांनंतर आपल्या गावी पोचते. कादंबरीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळते ती इथे. रझियाला छळणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळण्याची आशा तिच्या मनात येथे निर्माण होते. तिच्या वडिलांनी एकत्रित केलेली ग्रंथसंपदा तिच्या हाती लागलेली असते. आप्पांनी काढलेली टिपणे आणि त्यांचा व्यासंग पाहून लक्ष्मी स्तिमित होते. तिथेच राहून अभ्यास करायचा निर्णय ती घेते. लक्ष्मीने परधर्मात जाऊन विवाह केल्यानंतर आप्पांनी मुस्लिम धर्म, मुस्लिम चालीरीती, त्यांची आक्रमणे, भारतात आणि भारताबाहेर घडविलेला विध्वंस यांचा अभ्यास सुरू केलेला असतो. यावर आधारित एक गंभीर पुस्तक लिहायचा त्यांचा निर्धार असतो, पण त्यांच्या मृत्यूने ते काम अधुरे राहिलेले असते. वडिलांनी जमविलेली पुस्तके आणि त्यांनी काढलेली टिपणे यांच्या सहाय्याने ते अधुरे काम पूर्ण करण्याचे लक्ष्मी ठरवते. ही कादंबरीतील कादंबरी फारच अप्रतिम आहे. ती स्वत: वाचण्याचा आनंद प्रत्येकाने घेतलाच पाहिजे.

दरम्यानच्या काळात आमीर रझियापासून मानसिकदृष्ट्या दूर होऊ लागतो. या वयात तो एका कोवळ्या मुस्लिम मुलीशी निकाह करतो. दरम्यान प्राध्यापक शास्त्री यांच्या आईचे निधन होते. या काळातील पुरोगामी म्हणवून घेणारे प्राध्यापक शास्त्री आणि आधुनिक विचारांचा बुरखा पांघरणारा आमीर यांचे चित्रण खूपच प्रत्ययकारी झाले आहे. या पात्रांचे वर्तन वाचताना आजच्या समाजातील ढोंगी पुरोगामी विचारवंत-लेखक आपसूकच डोळ्यांसमोर तरळू लागतात. सध्याचे वास्तवच अत्यंत अचूकपणे लेखकाने या पात्रांच्या माध्यमातून समोर आणले आहे.

याच काळात इतिहास पुनर्लेखनाविषयी प्रा. शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली सरकारकडून एका परिषदेचे आयोजन करण्यात येते. या परिषदेला रझियालाही आमंत्रण असते. मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा इतिहास पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा रझिया पुराव्यानिशी या गोष्टीला विरोध करते. शास्त्रींसाठी ही घटना अनपेक्षित असते. पुढील परिषदेसाठी रझियाचा पत्ता कट होतो. कादंबरीतला हा भाग देशातील विविध विद्यापीठांतील विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांचे चारित्र्य उघडे पाडणारा आहे. इतिहासाचे पुनर्लेखन, भगवेकरण आदी वारंवार चर्चेत येणाऱ्या वादांमागील सत्य समजून घेण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांनी हा भाग आवर्जून वाचलाच पाहिजे.

स्वत:ला निधर्मी, सेक्युलर समजणारे विचारवंतांचे खरे स्वरूप अतिशय जिवतंरीत्या कादंबरीच्या शेवटच्या भागात साकारले आहे. लक्ष्मीच्या कादंबरीतील नायक रजपूत राजपुत्र आहे. युद्धात पराभव झाल्याने त्याला गुलाम म्हणून राहावे लागते आहे. त्याचे बीज फोडून त्याला खोजा म्हणून जनानखान्यात ठेवलेलं असतं. हा आता इस्लामच्या प्रभावाखाली आलेला असतो. या खोजाच्या माध्यमातून लक्ष्मीची कादंबरी उलगडत जाते. या राजपुत्राच्या वाट्याला काय काय येतं? काशी विश्वनाथाचे मंदिर उद्‌ध्वस्त होतानाचा प्रसंग, गंगेच्या किनारी भेटलेल्या साधूशी संवाद आणि त्यातून त्याच्या मनाला आलेली उभारी हे सारं प्रत्यक्ष कादंबरीतच वाचा. आता तो खोजा छ. शिवरायांच्या प्रेरणेने स्वातंत्र्याचा बिगुल वाजविणाऱ्या छत्रसालाकडे जायला निघतो आणि रझियाच्या कादंबरीचा शेवट होतो, पण त्या कादंबरीच्या प्रकाशनानंतर उठलेला हलकल्लोळ, वेगाने घडणाऱ्या घडामोडी "आवरण'च्या शेवटच्या भागात रेखाटले आहे. आवरणमधील रझियाच्या कादंबरीला जो विरोध झाल्याचे आवरणमध्ये वर्णन आले आहे, तसाच विरोध आवरणला होताना दिसत आहे. कादंबरीकाराचे हे यशच म्हटले पाहिजे.

आवरणमधील रझियाच्या कादंबरीवर सरकार बंदी घालते, तेव्हा आमीरही रझियाच्या मदतील धावून येतो. कारण रझियाच्या कादंबरीने त्याचे डोळे उघडतात. रझियाने आपल्या कादंबरी लेखनासाठी ज्या इतिहास ग्रंथांचा आधार घेतलेला असतो, ती संदर्भग्रंथांची यादी न्यायालयीन लढ्यासाठी घेण्यात येते. 136 ग्रंथांची सूची बनवून त्याआधारे कादंबरीवरील बंदीविरोधात न्यायालयीन लढा देण्याचा निर्धार लक्ष्मी आणि आमीर करतात आणि येथे आवरण कादंबरी समाप्त होते.

भैरप्पा यांची लेखनशैली वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. कादंबरीतील वर्तमान संदर्भ खूपच बोलके आणि जिवंत आहेत. गिरीश कर्नाड, यू.आर. अनंतमूर्ती आदी विचारवंत आणि साहित्यिक मंडळींचे ढोंग उघड करणारी काही पात्रे कादंबरीत अतिशय जिवंतपणे साकारली आहेत. काहीजणांना वाटते की, कादंबरीतील प्राध्यापक शास्त्री हे पात्र यू.आर. अनंतमूर्ती यांच्यावरच आधारलेले आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामी, आधुनिक विचारांचे म्हणवून घेणारी ही मंडळी सत्याचा अपलाप कशारीतीने करतात, हे "आवरण'मधून अतिशय खुबीने व प्रभावीपणे मांडले आहे. त्यामुळेच ही सेक्युलर टोळी "आवरण'वर तुटून पडताना दिसत आहे. "आवरण'मधील भूमिका ही 136 ग्रंथांच्या आधारे संदर्भपृष्ठांसह मांडल्याने सेक्युलरांच्या टीकेला वेगळे उत्तर देण्याची आवश्यकताच राहिलेली नाही, यात लेखकाचे चातुर्य दिसून येते.मोजक्या शब्दांत मोठा आणि मार्मिक आशय व्यक्त करण्याची लेखकाची शैली वाचकास चिंतनाला प्रेरित करते. पुढील काही उद्धरणे पाहा...

"विस्मरणाने सत्य झाकोळून टाकणाऱ्या मायेला "आवरण' म्हणतात आणि असत्य बिंबविणाऱ्या कार्याला "विक्षेप' असे म्हटले जाते. व्यक्तिगत पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "अविद्या' आणि सामूहिक अथवा जागतिक पातळीवर चालणाऱ्या या क्रियेला "माया' म्हटलं जातं.'' ... आपल्या व्यतिरिक्त इतर कुणाचीही आराधना करणाऱ्या भक्ताला तो सतत जाळणाऱ्या नरकात टाकून देतो. अशा प्रकारच्या देवाची निर्मिती करणारेही अशाच मत्सरी स्वभावाचे आहेत, असा याचा अर्थ नाही का होत? मी फक्त एकटा आहे, तिथे इतर कुणाला जागाच नाही, असं म्हणणारा; काम-क्रोध-मद-मत्सर असलेला देव निर्माण करणारा धर्म तरी कसला?''

औरंगजेबानं विश्वनाथ मंदिराचा विद्‌ध्वंस करून त्या जागी उभारलेल्या मशिदीचं, काटेरी कुंपण बांधून सशस्त्र सैनिक रक्षण करताहेत.' "... मागे कुणीतरी केलेल्या चुकांसाठी आजचे जबाबदार नाहीत हे तर खरंच, पण मागच्याशी नातं जोडून "आपण त्यांचेच वारसदार' या भावनेत आपण अडकणार असू तर त्यांनी केलेल्या कर्माची जबाबदारीही स्वीकारावी लागेल.''

सार्थ

तुम्हाला मध्ययुगात फिरायचे आहे का? अगदी टाईम मशीन मध्ये बसून मध्ययुगीन भारतात जाऊन आल्याचा अनुभव सार्थ ही कादंबरी वाचून मिळेल. भारतीयत्व ,भारतीय संस्कृती विशेषतः हिंदू जीवन पद्धतीचा अभिमान ज्यांच्या लेखनितून झळकतो...धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी लोकांचे कळप त्यांच्या साहित्यावर तुटून पडले.पण सामान्य वाचकाने मात्र त्यांचे लेखन डोक्यावर घेतलं... त्यांचं उत्तम उदाहरण म्हणजे सार्थ आणि आवरण या दोन बेस्ट सेलर कादंबऱ्या! सार्थ नंतर ज्यांनी आवरण वाचली नाही त्यांनी जरूर वाचली पाहिजे...आणि ज्यांनी आवरण वाचली आहे त्यांनी सार्थ निश्चित वाचली पाहिजे...तरच आवरण वाचणे सार्थ ठरेल!

मागच्या भारताच्या भेटीत बाबांनी आवर्जून वाचायला दिलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे भैरप्पा यांचे "सार्थ".ही म्हणजे भैरप्पांची आणखी एक अप्रतिम कलाकृती.उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेली एक उत्तम रचना. हे पुस्तक तुम्हाला घेऊन जातं सातव्या-आठव्या शतकात. या शतकात लोक कसे जगत असतील, त्यांची सामाजिक, भावनिक, आर्थिक, धार्मिक बैठक कशी असेल याची .कल्पना येते. सार्थ म्हणजे व्यापारांचा तांडा! सातव्या-आठव्या शतकात हा शब्द प्रचलित होता. राष्ट्रकूट,गुर्जर,प्रतिहार अशा अनेक छोट्या छोट्या राज्यांनी बनलेला तेव्हाचा भारत.या राज्यांतून देशोदेशी व्यापार करण्यासाठी सार्थ निघत असे.या तांड्याचा एक प्रमुख असे,तो म्हणजे सार्थवाहक. हया सार्थचे कामकाज कसे चालते याची विस्तृत आणि रंजक माहिती या पुस्तकातून मिळते.

ही कहाणी आहे तारावती नगरीच्या नागभट्ट या नायकाची. मंडणमिश्र यांच्या गुरुकुलात हा नागभट्ट शिक्षण प्राप्त करतो. याच गुरुकुलात त्याचा सहपाठी आणि मित्र असतो अमरुक राजा.शिक्षण संपल्यानंतर हा राजा नागभट्टला विशेष कामगिरीवर एका सार्थाबरोबर पाठवतो.राज्याचे उत्पन्न वाढावे यासाठी सार्थाची कामकाजाची पद्धत, प्रवासात येणाऱ्या अडचणी, व्यापार कसा करतात, कर किती आणि कसा आकारला जातो अशा बारीकसारीक तपशीलांचा अभ्यास करणे ही नागभट्ट वर सोपविण्यात आलेली कामगिरी. प्रवासाची आवड असल्याने नागभट्ट सुद्धा ही कामगिरी स्विकारतो.

अचानक एक दिवस त्याला एका गाववाल्याकडून समजतं की अमरुक राजाने नागभट्टच्या पत्निला आपल्या जाळयात ओढलंय. दगाबाजीने आणि प्रतारणेमुळे नागभट्ट खूप दुखावतो, आणि परत गावी न जाण्याचा निर्णय घेतो. मग सुरू होतो नागभट्टचा एकट्याचा प्रवास! या प्रवासात त्याला अनेक बरेवाईट अनुभव येतात.आयुष्यात नेमकं काय करायचं हे कळत नसल्याने तो भरकटत जातो. कधी योगी, कधी तांत्रिक, कधी नट,कधी विद्यार्थी, कधी राजकीय सल्लागार,कधी क्रांतिकारी अशा विविध भूमिका जगायला लागतो. या मार्गावर त्याला अनेक मार्गदर्शक गुरुंच्या रूपात भेटतात.नटाची भूमिका पार पाडताना त्याच्या आयुष्यात चंद्रिका नावाची नटी येते, ही एक योगिनी देखील असते.

चंद्रिकेचे पात्र फार रंजक आहे, नायिका असावी तर अशी. कमालीची सुंदर, नाट्यकलेत पारंगत,ध्यानधारणेत पारंगत, उत्तम शिष्या,आपल्या निश्चयापासून न ढळणारी, नागभट्ट वर प्रेम करणारी पण घेतलेल्या व्रताशी बांधील असलेली.खऱ्या अर्थानं नागभट्टच्या आयुष्याला किनाऱ्याला लावणारी. हा काळ होता बौध्द धर्माच्या प्रसाराचा, तथागत होऊन हजार एक वर्षांचा काळ उलटला होता, धर्मप्रचाराचे काम आता बुद्धाचे अनुयायी करत होते. राजाश्रयाच्या मदतीने बौद्ध धर्माचं प्रस्थ वाढत चालले होते. देशात ठिकठिकाणी स्तूप,चैत्य,विहार यांचे बांधकाम जोरात चालले होते. अनुयायांकडे धर्मप्रचाराचे काम आल्यावर त्याला अनेक अँगल प्राप्त झाले,बौद्ध धर्मातच अनेक पंथ निघाले. विविध मौलिक ग्रंथनिर्मिती झाली. एक महत्त्वाचा विरोधाभास मला नमूद करावासा वाटतो तो म्हणजे गौतम बुद्धाने मूर्ती पूजेचे कधीच समर्थन केले नव्हते मात्र बौद्ध भिक्खू स्तूपाची किंवा चैत्याची निर्मिती करताना विविध बौध्द देवी-देवतांच्या मूर्त्या कोरु लागले असा उल्लेख या पुस्तकात आहे.विशेष म्हणजे या मूर्त्या हिंदू देवी-देवतांच्या मूर्तींशी साधर्म्य साधणाऱ्या होत्या.बुद्धाच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे वर्णन पुराणातल्या हिंदू देवतांच्या कथांशी जुळणारे वाटायला लागले.

त्यातच काही इतर धर्मियांची बुद्धाला विष्णूचा दहावा अवतार मानण्याची विचारधारा देखील दिसते. कधी कधी वाटतं बुद्धाचे मुळ तत्वज्ञान किंवा इतरही धर्मांची मुळ शिकवण खरोखरच आपल्यापर्यंत पोहचले असावे? दुसरी गोष्ट म्हणजे धर्मपरिवर्तन.इतर धर्मियांना बौध्द धर्माचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांचे मतपरिवर्तन करून बौद्ध धर्माची दिक्षा प्रदान करणे हे बौद्ध भिक्खूचे मुख्य काम.हा,पण यात कुठेही जोरजबरदस्ती नाही.धर्म परिवर्तनाचा निर्णय सर्वस्वी समोरच्या व्यक्तीचा.उलट वादविवाद करून धर्मपरिवर्तनाची पध्दत या शतकात रूढ होती.हिंदू/इतर धर्मीय विद्वान आणि बौद्ध विद्वान एकमेकांना आव्हान देत, यात वादविवाद स्पर्धा चाले, जो जिंकेल त्याने समोरच्याचा धर्म स्वीकारायचा अथवा अन्य कुठले प्रायश्चित्त घ्यायचे. "कुमारील भट्ट" हे हिंदू पंडित या साठीच प्रसिद्ध होते,अनेक बौध्द विद्वानांना त्यांनी आपल्या ज्ञानाने वादविवादात हरवले होते.हेच कुमारील भट्ट पुढे नालंदा विद्यापीठात दाखला घेतात,बौद्ध धर्माचा सखोल अभ्यास करण्यासाठी बौद्ध धर्म स्विकारतात देखिल. पण पुढे काही अकल्पित घटना घडतात आणि ते अग्निप्रवेश करतात.

आदी शंकराचार्य यांचा या कथेतील प्रवेश हे देखिल एक महत्त्वाचे प्रकरण आहे.त्यांनी दाखवलेला अद्वैत तत्वज्ञानाचा मार्ग तर सर्वश्रुत आहेच. मंडणमिश्र आणि त्यांच्या विद्वान पत्नी भारतीदेवी यांच्यात आणि शंकराचार्य यांच्यात चाललेला वादविवादाचा प्रसंग उत्तम सादर केला आहे.हे संपूर्ण प्रकरण म्हणजे तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेले आहे. स्त्री-पुरुष संबंध हा देखील या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. त्या काळात असलेले स्त्री-पुरुषांचे परस्पर संबंध, त्यांची गुंतागुंत,त्यातून निर्माण होणारे नाट्य वाचकास कथेशी बांधून ठेवतेच पण विचारास चालना देखील देते.याच संबंधाचा वेगवेगळ्या शक्ती प्राप्त करण्यासाठी विविध पंथांनी केलेला उपयोग,भारतीदेवींनी शंकराचार्यांना विचारलेला अनुभवधिष्टीत प्रश्न आणि त्याचे योग्य उत्तर मिळवण्यासाठी शंकराचार्य यांनी हाती घेतलेले कार्य,अनुभव घेऊन झालेला बोध आणि त्यानंतर वादविवादाचे दिलेले उत्तर... सगळंच अचंबित करून सोडते.

याच काळात म्लेंच्छ पण भारतभूमी वर आक्रमण करू लागले होते,सार्थ अडवणे, व्यापारावर बंदी आणणे, तलवारीच्या जोरावर जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावणे, दडपण आणण्यासाठी मंदिर आणि इतर धार्मिक स्थळ फोडणे, प्रार्थनास्थळे उभारणे, जनतेचा छळ करणे, राज्यांवर आक्रमण करणे अशा जमेल त्या प्रकाराने आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा म्लेंच्छांनी चंग बांधला होता.हेच लोक पुढची शतके भारतावर राज्य करणार होते,एका प्रचंड मोठ्या स्थित्यंतराला भारत सामोरी जाणार होता.याची सुरुवात या शतकात झाली होती तर!

पुस्तकाचा शेवट देखील वेगळा आहे.वाचकांना विचार करण्यास भाग पाडणारा आहे."वैवाहिक जीवन देखील एक प्रकारचे व्रतच असतं" हे अधोरेखित करणारा आहे.तसच आपल्या धर्माविषयीची श्रध्दा,प्राप्त झालेली शिकवण,विचारांची बैठक, धैर्य, साहस आणि उद्याची आशा या पाठबळावर येणाऱ्या बदलांना धीटपणे सामोरी जाण्याची चेतना दर्शवणारा आहे. काय होतं नेमकं?संन्यासाश्रम श्रेष्ठ की गृहस्थाश्रम?कुमारील भट्टच्या अग्निप्रवेशाचे कारण काय?(अग्निप्रवेश करण्याआधी प्राप्त केलेले बौद्ध धर्माचे ज्ञान इतर कुणा योग्य माणसाला प्रदान करता आले असते तर नक्कीच त्याचा उपयोग झाला असता असे माझे मत आहे.)नागभट्टला त्याच्या जीवनाचे ध्येय सापडतं का?चंद्रिकेच्या योगधारणेतून तिला अपेक्षित ते समाधान लाभतं?पुस्तकात या सगळ्यांची उत्तरं नक्की मिळतील.

"आवरण" आधी वाचली मी काही वर्षांपूर्वी, आता असं वाटतं "सार्थ" आधी वाचायला हवी होती. ऐतिहासिक संदर्भ लक्षात घेता सार्थ म्हणजे "भाग १" आणि आवरण म्हणजे "भाग २" असं वाटायला लागतं.आवरण लवकरच परत वाचायला हवी.असो! अनेक अनुभवांनी समृद्ध आणि तत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेले पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. भैरप्पांचा इतिहासाचा अभ्यास,बौद्ध,वैदिक,जैन,म्लेंच्छ अशा सगळ्या धर्मांचा केलेला सखोल अभ्यास,काही ऐतिहासिक/धार्मिक महत्त्वाच्या घटना आणि त्याभोवती रचलेली रंजक कथा,"सौ.उमा कुलकर्णी" यांनी केलेला ओघवता अनुवाद हे सगळं म्हणजे बुद्धीला चालना देणारं जबरदस्त रसायन आहे.यातले तत्वज्ञान सगळंच सगळ्यांना कळेल असं नाही,(माझ्या अल्पमतीला काही भाग कठीण वाटला,अभ्यासाच्या अभावी काही संज्ञा समजल्या नाहीत.)पण मानवी स्वभाव किती विविध पैलूंनी बनलाय, आयुष्यात ध्येय नसताना किंवा ध्येय उमगेपर्यंत मनुष्य कसा शीड नसलेल्या जहाजासारखा भरकटत राहतो, तसंच प्रत्येक धर्म किती विस्तृत आहे,जाणून घेण्यासारखं बरंच काही आहे हा विचार येण्याचं आणि प्रत्येक धर्माविषयी कुतूहल आणि उत्सुकता निर्माण करण्याचं बळ या पुस्तकात नक्कीच आहे.

लेखक - आर. एस. लुटे, ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी, व्हॉट:9421605019; विनया मगरे-सहस्त्रबुद्धे

एस एल भैरप्पा यांचे अन्य उपलब्ध साहित्य!

१. पर्व 550/

२. मंद्र 795/

३ तंतू 795/

४ पारखा 295/

५. काठ 340/

६. परिशोध 330/

७. वंशवृक्ष 350/

८. तडा 320/

९. आवरण 360/

१०. उत्तरकांड 395/

११. साक्षी 430/

१२. माझे नाव भैरप्पा 425/

१३. सार्थ 395/

१४. गृहभंग 490/

१५. साक्षी 430/

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा