द्वारकानाथ संझगिरी - मुंबई व्ह्यू - उद्यम

दादर परिसरात तेव्हा मोडक इंजिनीयर यांचा बंगला प्रसिद्ध होता. हे मोडक इंजिनीयर नेमके कोण होते, त्यांचं काम, याबदद्ल आजच्या पिढीला माहिती असणं कठीणच आहे. पण आजची मुंबई या एका माणसामुळे पाणी पिऊ शकते एवढं एक वाक्य सांगितलं तरी मोडक या माणसाच्या कर्तृत्वाची पुरेशी कल्पना येईल.

जवळपास रोज संध्याकाळी शिवाजी पार्कला जाताना मी ‘उद्यम’ नावाच्या एका बंगल्यावरून जातो. माझ्या लहानपणापासून तो बंगला आमच्या शिवाजी पार्कमधे मोडक इंजिनीयरचा बंगला म्हणून प्रसिद्ध आहे. लहानपणी कोण हे मोडक इंजिनीयर हा प्रश्न मनात यायचा. माझ्या वडिलांनी ह्य प्रश्नाचं उत्तर मला एका वाक्यात दिलं होतं, ‘‘अरे तू रोज वैतरणाचं पाणी पितोस ना, ते ह्यंच्यामुळे.’’ त्या वेळी वैतरणा हा मुंबईपासून साधारण पाऊणशे मैलावर एक तलाव आहे. तिथे धरण आहे आणि त्या धरणाचं पाणी मुंबईत येतं एव्हढंच नागरिकशास्त्र किंवा भूगोलाच्या पुस्तकातून मला कळलं होतं. इंजिनीयर व्हायचं बीज माझ्या मनात रुजलं ते मोडकांच्या कानावर पडत असलेल्या नावामुळे! अर्थात म्हणून मी सिव्हिल इंजिनीयरच झालो हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही. दोन दिवस इलेक्ट्रिकल इंजिनीयरिंगला बसल्यावर मला पटलं की ‘करंट’ आपल्याला दिसत नाही. दिवा पेटल्यावरच आपण म्हणतो, ह्य वायरमध्ये करंट आहे. इमारत, पूल, धरण उभं राहताना कसं दिसतं, जाणवतं. त्यामुळे सिव्हिलला गेलो. बरं हा बाळबोध विचार करून मी सिव्हिलला गेलो होतो. अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेंटिंगप्रमाणे इलेक्ट्रिकल मला अ‍ॅबस्ट्रॅक्ट वाटलं. शिवाजी पार्क ही लहान लहान मुलांच्या मनात विविध बिया पेरणारी एक विलक्षण जागा आहे. मोडकांचं जिथे घर आहे, त्या समोर सेनापती बापटांचा पुतळा आहे. सेनापती बापट म्हणजे राजकारण आणि समाजकारणातला असा साधुपुरुष की, असे आत्मे महाराष्ट्राकडे आता फिरकतच नाहीत. मोडकांनी, त्यांच्या गच्चीवजा पोर्चवर उभं राहून ‘ए सुभाष’ अशी हाक मारली असती, तरी ती समोरच्या गल्लीत राहणाऱ्या सुभाष गुप्तेला ऐकू आली असती. 'Warne may be latest, but Subhash Gupte was greatest', असं साक्षात सर गारफिल्ड सोबर्स बोललाय. ह्यवर सुभाष गुप्ते काय दर्जाचा फिरकी गोलंदाज होता ह्यची कल्पना येईल. सुभाष गुप्तेच्या समोर राहणाऱ्या संदीप पाटीलनेही मोडकांच्या बंगल्यावरून थ्रो केला असता, तर जिथे प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरे राहात होते तिथे पोहोचला असता किंवा त्या उद्यम बंगल्यावर कुणी रात्रीच्या शांततेच्या वेळी जयोस्तुते म्हटलं असतं तर त्या बंगल्याच्या उजवीकडे एक गल्ली सोडून राहणाऱ्या स्वा. सावरकरांना ते ऐकायला आलं असतं. विविध क्षेत्रांतली टॉपची मंडळी इतक्या एकमेकांच्या जवळ राहात होती. म्हणून मी म्हटलं, नुसतं तिथून फिरताना मुलांवर चांगले संस्कार होऊ शकतात. त्या विभागात जे कॉन्क्रीटचे रस्ते आहेत, मुख्य म्हणजे वर्षो न् वर्ष टिकलेले रस्ते आहेत ते मोडकांच्याचमुळे!

अचानक मोडकांबद्दल मला लिहावंसं वाटलं, त्याला अनेक कारणं आहेत. नव्या पिढीला त्यांची माहिती कमी आहे. इतिहासाबद्दल, तो जोपासण्याबद्दल आपल्याला प्रेम नाही. राजकीय मंडळी इतिहास त्यांच्या स्वार्थापुरता वापरतात. राजकीय किंवा सामाजिक व्यक्तिमत्त्वाएव्हढेच समाजाच्या दृष्टीने इंजिनीयर्स, डॉक्टर्स, शास्त्रज्ञ महत्त्वाचे असतात पण आपल्याकडे वलय फक्त राजकीय पुरुष, क्रिकेटपटू आणि सिनेमातल्या मंडळींना असतं. रस्ता, चौक, गल्ल्या, स्टेशन्स ही आपल्याकडे बहुतेक पुढाऱ्यांसाठीच किंवा त्यांच्या नातेवाईकांसाठी राखून ठेवलेली असतात. जगन्नाथ शंकरशेट ह्य महान व्यक्तीची मुंबईसाठी केव्हढी मोठ्ठी कॉन्ट्रिब्युशन आहे! रेल्वे, व्हीटी स्टेशन, म्युझियम, जेजे स्कूल ऑफ आर्टस, राणीबाग. ह्य माणसाने मुंबईचं एक वेगळंच स्वप्न पाहिलं आणि स्वप्नपूर्तीच्या दिशेने पावलं टाकली. त्यांच्या नावाच्या पुलावरून जाताना आजच्या पिढीला त्यांच्याबद्दल संस्कृतची स्कॉलरशिप सोडली, तर फार काही माहीत नसतं. हे त्यांच्यापेक्षा आपलं दुर्दैव आणि दारिद्रय़ आहे. तसंच थोडं मोडकांचं आहे. वैतरणा तलावाला मोडकसागर म्हणतात, पण मोडकांचं कॉन्ट्रिब्युशन फार थोडय़ा मंडळींना ठाऊक आहे.

त्यांना नानासाहेब म्हणत. त्यांचं नाव नारायण! ते अभ्यासात हुशार होते हे सांगायची गरज नाही. पण आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे कधी गरीब विद्यार्थी फंडातून मदत घेऊन तर नंतर काणे स्कॉलरशिप मिळवून ते मॅट्रीक झाले. मॅट्रीकमध्ये चांगले गुण मिळाल्याने पुण्याच्या फग्र्युसन कॉलेजमध्ये प्रवेश त्यांना स्कॉलरशिपसह मिळाला. पुढे पुण्याच्या इंजिनीयरिंग कॉलेजमधून ते १९११ साली बी.ई. झाले. मग सरकारी नोकरी, पण त्यानंतर त्यांची पडणारी पावलं ही वामनाची पावलं होती. माथेरानच्या पाणीपुरवठय़ाची सूत्रं त्यांच्या हातात आल्यावर त्यांनी तिथल्या प्रसिद्ध शारलॉट लेकमध्ये ऐन पावसाळ्यात पाइपलाइन टाकली. मी पावलं वामनाची का म्हणतो, कारण एक सरकारी कर्मचारी असून कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी कुठच्या कुठे भरारी मारली. त्यांच्या बुद्धीचे पंख हे गरुडाचे होते. त्यामुळे त्यांना जमूनही गेले. भारत सरकारची स्कॉलरशिप मिळवून ते इंग्लडला गेले. पण परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी डॉ. टर्नर ह्यंच्या हाताखाली देशातल्या कितीतरी मोठमोठय़ा शहरातला पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची कामं केली. इंग्लंडमधली त्यांची स्कॉलरशिप फक्त दोन वर्षांची होती, पण तिथल्या प्रायर ह्य इंजिनीयरने त्यांची स्कॉलरशिप एका वर्षांने वाढवली. अर्थात त्या वेळी इंग्लडमध्ये राहाणं म्हणजे सुखसोयीत लोळणं नव्हतं. ते समुद्राजवळील हेस्टिंग नावाच्या गावात राहात. १९१८ ते २१ची गोष्ट आहे. त्या वेळी तिथे गावात वीज आलेली नव्हती. घरात बाथरूम नसे. सार्वजनिक स्नानगृहात जाऊन आंघोळ करावी लागे. प्रवास ट्राम आणि घोडागाडीचा होता. पण तिथे त्यांना पाणीपुरवठा, पूलबांधणी, रस्ते बांधणे, ड्रेनेज वगैरे सिव्हिल इंजिनीयरिंगमधल्या वेगवेगळ्या कामाचा अनुभव मिळाला. त्यांना स्वतंत्र अधिकारसूत्रे दिल्यामुळे थोडक्यात जबाबदारी टाकल्याने त्यांची बॅग अनुभवाने भरून गेली. तिथून परतल्यावर अनुभवाच्या बॅगा कस्टमसुद्धा अडवू शकत नाहीत किंवा त्यावर डय़ुटी लावू शकत नाहीत. उलट परदेशातून अनुभवाची पुंजी घेऊन आल्यामुळे चक्रवाढ व्याज मिळतं. नानासाहेबांना ते मिळालं. ते जी.आय.पी. रेल्वेत (आत्ताची सेंट्रल रेल्वे) एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर झाले. आजच्या सरकारी भाषेत सांगायचं तर कार्यकारी अभियंता! त्या वेळी रेल्वे खासगी होती, पण हिंदी माणूस रेल्वेत एकदम कार्यकारी अभियंता झाल्याचं ते पहिलं उदाहरण होतं.

तिथून त्यांच्या कारकीर्दीचा आलेख फक्त वरच चढत गेला. जिथे जिथे त्यांनी काम केलं, तिथे तिथे त्यांनी आपला ठसा असा उमटवला की पुढच्या पिढय़ा त्यांना दुवा देतील. रेल्वेत असताना रेल्वेसाठी दौंड, पुणे, कल्याण, भुसावळ, जुन्नर वगैरेंच्या पाणीपुरवठा योजना केल्या. कल्याणच्या ड्रेनेजचं काम करून त्यांनी कल्याणचं कल्याण केलं. माणसाला पाणी प्यायला देणे अतिशय पवित्र काम आहे. पाण्याला उगाचच जीवन म्हणत नाहीत. आणि ज्यांनी पाण्यासाठी पायपीट केली आहे, पाण्याने भरलेल्या कळशा उचललेल्या आहेत, त्यांना नळाला पाणी येण्याचं सुख आणि पावित्र्य समजू शकतं.

रेल्वेतून त्यांनी मुंबई महानगरपालिकेत जवळपास रेड कार्पेटवरूनच ‘एन्ट्री’ घेतली. मुंबई महानगरपालिकेचे पहिले भारतीय कमिशनर (आयुक्त हा शब्द त्या वेळी जन्माला आला नसावा) अर्देसर यांनी त्यांना अर्ज करायला सांगितलं. त्या वेळी महानगरपालिकेत, पारशांचं वर्चस्व होतं. तरी मोडकच डेप्युटी सिटी इंजिनीयर झाले. आणि नंतर १९३२ पासून ४७ पर्यंत ते सिटी इंजिनीयर होते. महानगरपालिकेतही त्यांना रेड कार्पेटवरून जमिनीवर पाय ठेवायला लागलाच नाही. १९४८ साली स्वराज्यानंतर ते चार महिने महापालिका आयुक्त झाले, पण मग सरकारची भूमिका होती की आयुक्त हा आयसीएस (आता आयएएस) असावा. मग काय करायचं? खास कायदा करून स्पेशल इंजिनीयर म्हणून त्यांची नियुक्ती केली गेली आणि त्यांना कमिशनर इतकाच पगार दिला गेला.* *महानगरपालिकेच्या इतिहासात असं दुसरं उदाहरण नसावं.*

आणि मग त्यांनी मुंबईला अद्ययावत शहर बनवायला सुरुवात केली. दादर सुवेज डिस्पोजल स्कीम त्यांचीच. महामुंबईचा मास्टर प्लॅन त्यांचाच! आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे वैतरणा-तानसा पाणी योजना. मुंबईहून ७५ मैलांवर असलेल्या वैतरणा नदीवर धरण बांधणे आणि तिथून तानसा तलावाद्वारे थेट अशा दोन मार्गानी पाइप्स टाकून मुंबईत पाणी आणणे. वैतरणा धरण हे भारत स्वतंत्र झाल्यावर मुंबई महानगरपालिकेने बांधलेलं धरण होतं. त्यात नानासाहेबांचा वाटा सिंहाचा! आता धरण बांधायचं म्हटलं की, जगभरातून भरपूर पैसे घेऊन धरण बांधण्याचं ज्ञान वाटायला कन्सल्टंट तयार असतात. तेव्हा योजना मोडकांनी तयार केली आणि त्यात काही त्रुटी राहू नये म्हणून ते ‘स्वखर्चाने’ युरोपला गेले आणि तिथल्या तज्ज्ञांशी विचारविनिमय करून आले. ‘स्वखर्चाने’ हा शब्द लक्षात ठेवा. सिव्हिल इंजिनीयरिंगचे शहेनशहा सर विश्वेश्वरय्यांनीसुद्धा मोडकांच्या स्किमचं कौतुक केलंय. ही गोष्ट म्हणजे सर डॉन ब्रॅडमनने सचिनला सर्वोत्कृष्ट फलंदाजीचं सर्टिफिकेट देण्यासारखं आहे. बरं हा उद्योग करत असताना, त्यांनी चंदिगढ आणि उज्जन शहरांचा पाणीपुरवठा आणि सांडपाण्याच्या योजना तयार केल्या होत्या.

सामान्य माणसाला पाणी देणं ही त्यांची जीवननिष्ठा असावी असं वाटतं. पण नानासाहेब जेव्हा हे कार्य निष्ठेने करत होते तेव्हा नियती वैयक्तिक आयुष्यात, त्यांच्या तोंडचं पाणी पळवत होती. त्यांनी त्यांच्या ऐंशी वर्षांच्या आयुष्यात घरचे किती मृत्यू पाहिले असावेत? त्यांचे आईवडील गेले तेव्हा ते ३४ वर्षांचे होते. त्यांच्यावर भावंडांची जबाबदारी होती. त्यांची दोन भावंडं लहानपणी गेली. नंतर त्यांच्या लग्न झालेल्या तीन बहिणी एकापाठोपाठ एक गेल्या. त्यांचा लाडका भाऊ विष्णू संधिवाताने १५व्या वर्षी गेला. त्यांची स्वत:ची तीन मुलं गेली. पण प्रत्येक वेळी मनावर दगड ठेवून त्यांनी कारकीर्दीत पुढचं पाऊल टाकलं.

मोडकसाहेबांवर महानगरपालिकेतून निवृत्त झालेले डेप्युटी म्युनिसिपल इंजिनीयर मनोहर सोहनी ‘वैतरणेचे सुपुत्र’ असं छोटेखानी चरित्र लिहीत आहेत. त्यात वैतरणा स्किमचीसुद्धा माहिती असेल. मला स्वत:ला ह्य स्तंभात नानासाहेब मोडकांबद्दल लिहावंसं वाटलं, कारण त्यांच्यामुळे मनात इंजिनीयर व्हायचं बीज पडलं होतं हा एक भाग आहेच. पण माझ्या सुदैवाने मीसुद्धा मुंबई महानगरपालिकेत पाणीपुरवठा खात्यात अनेक वर्षे कार्यरत होतो. शेवटी निवृत्त होताना प्रमुख अभियंता झालो. जसजसा अनुभव मला मिळत गेला, तसतसं नानासाहेबांनी वैतरणा धरण आणि स्कीम पूर्ण करताना, केव्हढं प्रचंड शिवधनुष्य पेलवलं, ह्यची कल्पना आली. शिवधनुष्य उचलून त्याला प्रत्यंचा लावणं हे ‘रामा’सारख्या युगपुरुषाचंच काम असतं. सिव्हिल इंजिनीयरिंगमध्ये ती ताकद मोडकांकडे होती. आता मुंबई महानगरपालिकेचं मध्यवैतरणा धरण आणि स्कीम उभी राहातेय. खरं तर जवळजवळ झालीए. मी प्रमुख अभियंता असतानाच त्यातल्या बऱ्याच कामांची सुरुवात झाली. अर्थात ह्यत माझा वाटा फक्त खारीचा होता. त्या वेळी मी त्या खुर्चीवर असणं हा नशिबाचाच भाग जास्त होता. नशिबाला कर्तृत्व मानायला मी तयार नाही आणि आता इंजिनीयरिंग ज्ञान पैशाच्या खनखनाटाबरोबर, तुमच्या ताटात येतं. मोडकसाहेबांच्या वेळी काळच वेगळा होता. माझं नशीब एव्हढंच की, मोडकसाहेब ज्या वाटेवर, त्यांची वामनाची पावलं उमटवत डौलाने चालले, त्या वाटेवर एक छोटंसं पाऊल ठेवण्याची संधी मला नशिबाने दिली. माझ्याबरोबरच्या सहकाऱ्यांनाही त्यांच्या भाग्याची जाणीव झाली असेल. त्यामुळे आज ‘उद्यम’ ह्य मोडक इंजिनीयरच्या बंगल्यावरून शिवाजी पार्कला जाताना कृतार्थ आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे कृतज्ञ वाटतं आणि हात जोडले जातात. खरंच, तेथे ‘कर माझे जुळती’ असं म्हणावं अशा माणसाचं अस्तित्व एकेकाळी त्या बंगल्यात होतं.


Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा