दास्तां-ए-इराणी

दादर चौपाटीला अरबी समुद्राच्या बरोबर सरळ रेषेत उभे राहिलो की मुंबई महापालिकेचे प्रसिद्ध दिवंगत इंजिनीअर नानासाहेब मोडक यांचा 'उद्यम' बंगला नजरेस पडतो. बंगल्याच्या समोर सेनापती बापट यांचा पुतळा आणि पुतळ्याच्या डाव्या बाजूने डोळे झाकून चालायला लागलात तरी तुमचे पाऊल थेट 'एलओबी'मध्येच पडेल. म्हणजेच 'लाइट ऑफ भारत'. शिवाजी पार्क परिसरातील शेवटचे इराणी हॉटेल. हॉटेल छोटेखानी. सकाळ, दुपार, संध्याकाळ कोणत्याही वेळेत गेलात तरी हाऊसफुल्ल. एरवी वातानुकूलित हॉटेलशिवाय न करमणाऱ्या मुंबईकरांना ४० अंश सेल्सिअस उन्हाच्या तडाख्यातही गरगर फिरणाऱ्या पंख्यांच्या इराणी हॉटेलात जाण्यात मात्र भारी उत्साह असतो. त्याचं कारण अर्थातच खिमापाव, ऑम्लेट पाव, ब्रुनमस्का, बनमस्का आणि सदाबहार पानीकम चाय...

जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलात तरी इराणी हॉटेलची मजा काही औरच असते. मुंबईतील वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही हॉटेल आता टीचभर वाटतात. मात्र सच्च्या खवय्यांचे पहिले पाऊल इराणी हॉटेलातच पडते. सर्वच इराणी हॉटेलांचा इतिहास मोठा रंजक आणि हजारो आठवणींनी गुंफलेला आहे. 'एलओबी' ही त्यापैकीच एक. यंदा या हॉटेलला ८२ वर्षे पूर्ण होताहेत. गुलाम हुसेन हे याचे मूळ मालक. हैदराबादमधील एका इराणी कॅफेमध्ये सफाई कामगार, वेटर आणि अखेरीस भागीदार म्हणून त्यांनी काम केले. १९३९च्या सुमारास मुंबई गाठली. हुसेन यांनी पहिल्यांदा मोडक यांच्या 'उद्यम' बंगल्यामागील गल्लीत, सध्याच्या ठिकाणापासून दोन दुकाने दूर जिथे आता एक लॉण्ड्री आहे, तिथे नंतर ओव्हन फ्रेश दुकानाच्या बाजूला आणि सध्या 'एलओबी' जिथे आहे ते १९५६ साली सुरू केले. या ठिकाणी हॉटेल सुरू करण्यास काहींचा विरोध होत होता. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे मदतीला धावून आले. त्यांच्या मध्यस्थीने ही जागा घेऊन हॉटेल सुरू झाले.

हॉटेलची रचना पारंपरिक इराणी पद्धतीची आहे तशीच. लाकडी टेबल आणि खुर्च्या. पूर्वीसारख्या मजबूत लाकडी खुर्च्या आता मिळत नाहीत. खुर्चीतून खिळे बाहेर येत असल्याची तक्रार गिऱ्हाईक करत होते. त्यामुळे लाकडासारख्या दिसणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्या वापरल्या जातात. टेबलवर लाल-पांढऱ्या रंगाचे चेक्सचे कापड जणू हॉटेलचा ट्रेडमार्क. खुर्चीवर बसण्याआधीच आजूबाजूला घमघमाट सुटलेला. मटणखिमा, भुर्जी पाव, चरचरीत तेलातून बुडून आलेले डबल ऑम्लेट पाहून तुमची रसंवंती ओठावरून ओघळली म्हणूनच समजा. या फेमस डिशसोबत रझा यांनी नावाप्रमाणेच 'बिग बी ऑम्लेट, 'शेजवान ऑम्लेट, हिरव्या मिरच्या असलेले सुर्ती ऑम्लेट, तोंडात वितळणारे चिकन ऑम्लेट, गरम मसाला भरलेले हैदराबादी ऑम्लेट, रजनी ऑम्लेट असे काही प्रयोग केले आहेत. 'केप्सा बिर्याणी' हा अलीकडच्या काळातील लोकप्रिय प्रकारही आहेच. पानीकम चाय ही खासियत असली तरी त्यासोबत दालचिनी पुडीची जाफरानी मसाला, पुदीना आणि लिंबू मारलेली सुलेमानी असे झोप उडवणारे 'चाय'वंताचे आणखी इराणी चोचले येथे पुरवले जातात.

'लाइट ऑफ भारत' हे नाव दस्तुरखुद्द प्रबोधनकार ठाकरे यांनी दिले आहे, अशी माहिती गुलाम हुसेन यांचे नातू व या हॉटेलचे मालक रझा साकी यांनी दिली. प्रबोधनकारांची आठवण म्हणून दिवंगत प्रसिद्ध व्यंगचित्रकार विकास सबनीस यांच्याकडून प्रबोधनकारांचे स्केच बनवून घेऊन ते रझा यांनी हॉटेलात लावले आहे. वडील मोहम्मद जवाद हे २०१०पर्यंत हॉटेल सांभाळत होते. यांच्यानंतर रझा आता या हॉटेलचा वारसा जपत आहेत. 'कॅफे'ची साखळी चालवणाऱ्या अनेक कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांना विकत आणि लाखो रुपये भाडे देऊन हॉटेल चालवण्यासाठी मागितले. पण हे हॉटेल आपलं पहिलं प्रेम आहे. ते कुणा दुसऱ्याच्या हातात गेलेले मला आवडणारे नाही, अशा शब्दांत रझा यांनी आपल्या हॉटेलप्रेमाचा 'इजहार' केला.

शिवाजी पार्क मैदानापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या हॉटेलात कॉलेजचे विद्यार्थी, क्रिकेटपटू, राजकीय नेते, कार्यकर्ते, मराठी-हिंदी चित्रपट, मालिका क्षेत्रातील विविध मान्यवरांचा मोठा राबता आजही आहे. बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे भाऊ श्रीकांत ठाकरे, रमेश ठाकरे हॉटेलात वारंवार येत. स्वा. सावरकर यांचे पाय या हॉटेलला लागले आहेत. सावरकरांचे नातू रणजित सावरकर अजून ऑम्लेट पाव पार्सल मागवतात. बाळासाहेब तासनतास हॉटेलात बसत. जयदेव ठाकरे, राज ठाकरे हे देखील अनेक वर्षे नियमित येत. राज यांच्या आवडीचे शाही चिकन ही स्पेशल डिश करून आजही घरी पार्सल पाठवतो, अशा आठवणी रझा यांनी सांगितल्या. वयाने १२-१३ वर्षांचा असताना सचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत एका पत्रकाराने या हॉटेलमध्येच घेतली. संदीप पाटील हॉटेलच्या गल्लीतच राहत होते. ते येत किंवा पार्सल मागवत.

सध्याच्या महागाईच्या काळात हॉटेलचा धंदा चालवणे खूप कठीण झाले आहे. इतर हॉटेलांच्या तुलनेत आमचे दर खूप स्वस्त आहेत. वर्षानुवर्षे आम्ही दरवाढ करत नाही. हॉटेलचा हेरिटेज लूक, पूर्वजांनी जपलेली परंपरा, वेगळेपण आणि खवय्यांचे प्रेम निव्वळ यामुळे जी काही थोडीफार इराणी हॉटेल सुरू आहेत, असे रझा आवर्जून सांगतात.

कॅफे कॉलनी स्टोअर्स अॅण्ड रेस्टॉरंट

दादर टीटीपासून 'चित्रा' चित्रपटगृहापर्यंतच्या १० मिनिटांच्या अंतरात तब्बल चार इराणी हॉटेल होती. मात्र एखाद्या बुलंद किल्ल्याचा एकेक बुरूज ढासळत जावा तशी ही हॉटेल हळुहळू काळाच्या पडद्याआड जाऊ लागली. दादर पूर्व भागात 'कॅफे कॉलनी स्टोअर्स अॅण्ड रेस्टॉरंट' हा शेवटचा इराणी शिलेदार पाय रोवून किल्ला लढवत उभा आहे. आतमध्ये प्रवेश करताच खिमा आणि ऑम्लेटचा घमघमाट सुटणाऱ्या काहीशा कळकट वाटणाऱ्या इराणी हॉटेलची तुलना कशाचीच होणार नाही. मुंबईच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक सुबत्तेची खाद्यसंस्कृतीची प्रासादचिन्हेच ती.

टिळक पुलावरून खाली उतरलात की हिंदू कॉलनीत प्रवेश करताना डाव्या हाताला लागते ते 'कॅफे कॉलनी स्टोअर्स अॅण्ड रेस्टॉरंट'. जुन्या इराणी हॉटेल स्टाइलचा जामानिमा खाण्यापिण्यासोबत तेल, साबण, टुथपेस्ट, बिस्कीट, आइस्क्रीम, चॉकलेट अशा विविध प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची परंपरा 'कॅफे कॉलनी'ने जपली आहे. नावातच हिंदू असलेल्या या कॉलनीत इराणी मुसलमानाचे हॉटेल तेही जवळपास ९० वर्षांपूर्वी; म्हणजे मोठा सामाजिक, सांस्कृतिक धक्का होता. मात्र कॉलनीच्या पहिल्या गल्लीतील कोपऱ्यात हे हॉटेल बांधण्यात आल्याने कुणी विरोध केला नसावा, अशी माहिती जाणकार देतात. सन १९३५मध्ये खुश्रू यांनी हे हॉटेल सुरू केले. नंतर रूस्तम नावाच्या व्यक्तीने चालवून नाझरियन या इराणी नागरिकाला १९७२ साली विकले. त्यानंतर हे कुटुंबीय गेली ५० वर्षे हे हॉटेल चालवत आहेत. छोटेखानी चौकोनी टेबल, त्याभोवती फेर धरणाऱ्या चार खुर्च्या. मेन्यूकार्डमध्ये डोके खुपसायच्या आधीच मटणखिमा, मटण घोटाला, मटण गोश्त, मोगलाई, हैदराबादी, डबल ऑम्लेट, ऑम्लेट सँडविचची पोथी वेटर धडाधड वाचू लागतो. हे मागवू की ते...

नाझरियनकडे बारकाईने पाहाल तर नजरेसमोर 'थ्री इडियट'मधले बोमन इराणी उभे राहतात. समोरच्या प्लेटमधील ऑम्लेट पावचा तुकडा तोंडात घोळवत ते हॉटेलचा इतिहासच सांगू लागले... 'ये होटल बडा लकी है, यहां डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रुनमस्का और चाय पिने के लिये आते थे.. खोरदाद सर्कल से ट्राम पकड के वो बोम्बे हायकोर्ट जाते थे.. यही नजदीक उनका घर है.. कभी कभी खिमापाव, मटणपाव घर पार्सल भी ले जाते थे. प्रकाश आंबेडकरजी के शादी मे मैने अपने हातो से स्पेशल बिर्यानी बना के उन के घर भेजी थी...' नाझरियन जुन्या आठवणीत रमून जातात. 'हॉटेलच्या पहिल्या गल्लीत तेव्हा राहत असलेले क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, संरक्षणमंत्री कृष्णा मेनन हॉटेलात येत. केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे देखील आमचे प्रसिद्ध ग्राहक. आठवले आले की सोबतच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या घोळक्याने अख्खे हॉटेल भरून जाते', नाझरियन यांची मुलगी बीबी फतेहमेहने माहिती दिली.

मटण खिमा ही हॉटेलची सर्वांत प्रसिद्ध डिश असून, पहाटेपासून रात्री हॉटेल बंद होईपर्यंत ते उपलब्ध असते. स्पेशल पाया, चिकन करी, चिकन बर्गर, लॉलीपॉप आणि चिकन पॅटिस आणि चिकन, मटण बिर्याणीला खवय्यांची येथे मोठी मागणी आहे. वडील आता थकत चालले आहेत. त्यामुळे आपण या व्यवसायात लक्ष घातले आहे. लॉकडाउननंतर हिंमतीने पुन्हा हॉटेल सुरू केले. आता आता कुठे ४० टक्क्यांपर्यंत धंदा होऊ लागला आहे. मुंबईतील हॉटेलच्या स्पर्धेत इराणी हॉटेल चालवणे ही सोप्पी गोष्ट नाही. मात्र निव्वळ खवय्यांच्या प्रेमामुळे ते तग धरून असल्याची कृतज्ञता बीबी व्यक्त करतात.

मुंबईत ९२/९३च्या दंगलीवेळी आमचा कॅफे बंद करण्याचा प्रयत्न काहींनी केला. आजुबाजूच्या रहिवाशांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पळवून लावले. कर्फ्यूदरम्यान, बाबा मागच्या दारातून तांदूळ किंवा अन्न नागरिकांना पुरवत. बाहेर सर्व काही बंद होते. लोकांचे हाल होत होते. माझ्या वडिलांसाठी ते दृश्य खूप कासावीस करणारे होते, अशी आठवणही त्यांनी जागवली.

लेखक - नितीन चव्हाण, महाराष्ट्र टाइम्स, 2 मे 2022

Comments

Popular posts from this blog

भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 9

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

Book review - Amish Tripathi - Raavan Enemy of Aryavarta Rating - ★★★★