पुस्तक परिचय - संजय सोनवणी - तृतीय नेत्र

विजयनगर साम्राज्याचा सम्राट देवरायाने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरातील शिवप्रतिमेवर 'तृतीय नेत्र' म्हणून एक दुर्मीळ रक्तवर्णी हिरा बसवला. सोळाव्या शतकातील मुस्लीम आक्रमणाच्या काळात रहस्यमयरीत्या ‘तृतीय नेत्र' गायब झाला आणि त्या विनाशकारी धामधुमीनंतर हंपी शहरच नष्ट झाल्याने तो विस्मरणातही गेला. एकविसाव्या शतकात अचानक काही सूचक जुनी कागदपत्रे हाती आल्यावर गुप्तपणे आंतरराष्ट्रीय टोळीच्या हस्तकांनी निर्दय होत त्याचा शोध सुरू केला. सुरत स्वारीच्या दरम्यान तृतीय नेत्र शिवाजी महाराजांच्या हाती लागून तो महाराष्ट्रात आला असावा, या शंकेने कर्नाटकात सुरू असलेला शोध महाराष्ट्रात आला. एका पाठोपाठ एक रक्तरंजित घटना घडू लागल्या. पोलीसही चक्रावले. पण ही खुनांची मालिका आणि त्यामगील रहस्य शोधत बदमाशांच्या मार्गात आडवे आले एक इतिहास संशोधक धाडसी तरुण जोडपे. कोठे होता एवढा काळ तो तृतीय नेत्र ? काय होते त्याचे रहस्य ? शेवटी कोणाच्या हाती लागला तो ? एक जळजळीत रहस्यमय थरार कादंबरी तृतीय नेत्र...!

          भन्नाट कादंबरी वाचायला हाती घेतली आणि वाचतच राहिलो. खिळवून ठेवणं काय असतं याचा प्रत्यय ही कादंबरी वाचताना आला. यातील एकानंतर एक धक्के देणाऱ्या विलक्षण आणि उत्कंठावर्धक घटना, अचंबित करणारे रहस्य, प्रभावी संवादशैली सारेच अगदी अफलातून आहेत. त्यामुळे ही साहित्यकृती वाचताना वाचकाला आगळीवेगळी अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. वाचक वेगळ्याच विश्वात रममाण होऊन जातो!

   विजय नगरच्या वैभवशाली काळात तिथला सम्राट देवराय हंपीच्या विरूपाक्ष मंदिरातील महादेवाच्या मूर्तीवर आपल्या नितांत श्रद्धेपोटी शिवाचा तिसरा डोळा म्हणून 'तृतीय नेत्र' हा अनमोल हिरा बसवतो. त्यानंतर सोळाव्या शतकात मुस्लिमांच्या जुलमी आक्रमणाच्या धामधूमीत दुर्दैवाने हा रक्तवर्णी 'तृतीय नेत्र' रहस्यमयपणे मंदिरातून गायब होतो! विजयनगरचे साम्राज्य लयाला जाऊन हंपी शहरही बेचिराख होते. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ऐतिहासिक सुरत शहरावरील स्वारीच्या दरम्यान 'तृतीय नेत्र' महाराष्ट्रात आल्याचा अंदाज इतिहासकार बांधतात. आणि मग सुरू होतो या तिसऱ्या डोळ्याचा - 'तृतीय नेत्र'चा अफलातून शोध, सोबतच जीवघेण्या खुनांच्या रक्तरंजित घटनांची मालिका... तसेच खडबडून जागी झालेली पोलीस यंत्रणा अन त्यांचं तपासकार्य!

     तरुण इतिहास संशोधक राहुल भोसले याचा प्रामाणिकपणे शोध सुरू असताना, ध्यानीमानी नसताना त्याच्या पाळतीवर असलेले गुन्हेगार त्याचं अपहरण करतात. या घटनेनं पोलीस यंत्रणाही चक्रावून जाते! या अपहरण नाट्यामागे गुन्हेगांराचा कुठला कुटील हेतू असतो? का घडतात एकामागून एक अमानुष खुनांच्या घटना? शेवटी त्यांचा हेतू साध्य होतो का? रहस्यमयी 'तृतीय नेत्र'चा शोध लागतो का? पोलिसांना गुन्हेगारांचा सुगावा लागतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी स्वतः इतिहास संशोधक असलेले संजय सोनवणी यांची 'तृतीय नेत्र' ही शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी रहस्यमय कादंबरी वाचायलाच हवी.

या कादंबरीत केलेलं विजयनगरच्या साम्राज्याचं वर्णन वाचकांच्या ज्ञानात भर टाकते. तसेच रायगड किल्ला आणि परिसराचे वर्णन वाचताना नकळतपणे रायगडाचं दर्शन घेतल्याचं समाधान लाभतं.  भरीस भर पुढीलप्रमाणे सुंबरान वाचून आगळावेगळा आनंदही प्राप्त होतो...

आली आई भवानी सपनात

म्हटली लुटून घ्यावी सुरत!

पाठविला बहिर्जी नाईक

घेऊनी संगे हेर सात...

सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं!

आणि तो तिसरा डोळा?

जसा क्रोधाने ओकी लाल ज्वाळा!

घेऊनी बहिर्जी आला राजगडाला

शिवचरणी अर्पायाला...

सुंबरान मांडलं गा सुंबरान मांडलं! ( क्रमश: )

        अशा या सुंबरानचं ऐतिहासिक महत्त्व, ते संपूर्ण वाचल्यानंतरच लक्षात येते. पुढे येणारं वाघजाईचं  चित्तथरारक वर्णन वाचताना जणू आपल्या डोळ्यासमोरच सगळं घडत असल्याचं प्रकर्षानं जाणवतं! या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने बरेच अदभूत आणि अचंबित करणारे प्रसंग अक्षरशः जिवंत केले आहेत, हे या कादंबरीचं वैशिष्ट्य असल्याचं इथं आवर्जून नमूद करावं लागेल. त्यामुळे 'तृतीय नेत्र' वाचताना 'आता पुढे काय' यासाठी कमालीची उत्सुकता वाढत जाते. तसेच प्रभावी संवादशैली ही या कादंबरीची जमेची बाजू असल्याने वाचकांना गुंतवून ठेवण्यास भाग पाडते. अर्थातच एखाद्या थ्रीलर, सस्पेन्स चित्रपटाप्रमाणे कथा वेगाने पुढे सरकत असल्यामुळे कादंबरी हातातून सुटत नाही, हे लेखकाचे खरे कसब आहे. 

     रसिक वाचक एकाच बैठकीत 'तृतीय नेत्र' वाचून संपवू शकतील हे निर्विवादच! एक सशक्त आणि विचार करायला भाग पाडणारे कथानक असल्यामुळे ही कादंबरी वाचन करताना आलेला अनुभव  केवळ अवर्णनीय... त्यातून लगेच बाहेर पडणं हे तर अशक्यच. आपल्या वाचक मित्रांना काहीतरी चांगलं देण्यासारखी 'अनुपम भेट' म्हणजे 'तृतीय नेत्र' ही विलक्षण रहस्यमय कादंबरी! सुरुवातीपासून शेवटपर्यंत अक्षरशः जागेवर खिळवून ठेवणाऱ्या या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघतील यात वाद नाही.

किंमत : ३७०/- पायल बुक्स, धायरी, पुणे. मो नं व्हाट्स अप ९९७०९२६५५०

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा