बोरिबंदर ते प्रार्थना समाज
इथेच कोपऱ्यावर असलेल्या "आल्फ्रेड बिल्डिंग" मध्ये "पारशी डेअरी" होती. तिथे मिळणारे दुधाचे उत्तम प्रकार आणि केक खाल्ले नाहीत असा या परिसरात कोणीही नसावा. याच्या अलीकडे आणि समोरच्या रस्त्यावर अशा दोन पारसी "अग्यारी" आहेत. या "अग्यारी" जवळ असलेल्या दुकानात आजही चंदनाच्या कांड्या आणि वस्तू उच्य दर्जाच्या असतात आणि वाजवी किमतीत मिळतात. पूढे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला मिळून मला वाटते 7/8 पारसी डॉक्टर उपलब्ध असलेली "होमिओपॅथी" औषधे मिळणारी दुकाने आहेत. इथेच एका इमारती मध्ये एक पारसिबाबा डॉक्टर "हाड वैद्य" होता त्याच्या कडे पाहावे तेंव्हा गर्दी असायची आम्ही या डॉक्टर ला नाव ठेवले होते " मोड तोड तांबा पितळ"
त्याच्या थोडेसे पुढे गेले की आपल्याला लागतात त्या, या रस्त्यावर असलेल्या दोन अनोख्या वाड्या पहिली "चंदन वाडी" आणि त्यापुढे "सोनापूर गल्ली". या दोन्ही वाड्या आतमध्ये U आकारात एकमेकाला भिडतात. दोन्ही वाड्याच्या या टोकाला कोणत्याही "स्त्री पुरुष" "श्रीमंत गरीब" यांना मोक्ष देण्याची व्यवस्था आहे.( "स्मशान भूमी" आणि "वीज दाहिनी"). चंदन वाडी मध्ये "कुछ तो गडबड है" या वाक्याला अमाप प्रसिद्धी मिळवून देणारे "शिवाजी साटम" यांचे वास्तव्य. या वाडी चे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे राहणारा सुप्रसिद्ध क्रिकेट पटू "एकनाथ सोलकर". सोलकरचे वडील "हिंदू जिमखान्यात" ग्राऊंडस मन होते. या गल्लीत राहून जवळच असलेल्या हिंदू जिमखान्यात रोलर वर बॉल आपटून उडणारे कॅच अलगद पकडायचा सराव करता करता भारतीय क्रिकेट मध्ये आपले स्थान "फिल्डिंग" च्या जोरावर पक्के करणारा "सोलकर" हा एकमेव खेळाडू असेल. त्याने या अनोख्या सरावाद्वारे "क्रिकेट टेस्ट मॅच" मध्ये कित्येक रथी महारथीना चकित करणारे झेल घेऊन "सोनापूरची" वाट दाखवलीआहे. "एकनाथ सोलकर" भारता तर्फे 15 ऑक्टोबर 1969 पासून 1 जानेवारी 1977 पर्यंत म्हणजे फक्त आठ वर्षे खेळला आहे. भल्या भल्या रथी महारथी क्रिकेट वीरांना बॅट्समन च्या जवळ (close in) म्हणजे शॉर्ट लेग आणि सिली पॉईंट वर त्याची झेल घेण्याच्या अगाध शैली आणि चपळता पाहून वाटायचे की "कुछ तो गडबड है". चंदनवाडी आणि सोनापूर गल्ली मध्ये कोकणी मराठी माणसांना तुटवडा नाही. एकनाथ सोलकर भारता तर्फे 15 ऑक्टोबर 1969 पासून 1 जानेवारी 1977 पर्यंत म्हणजे 8 वर्षात फक्त 27 टेस्ट खेळला आणि त्यात शॉर्ट लेग आणि सिलिपॉइंट या कठीण जागेवर 53/54 झेल घेतले. पहिली आणि शेवटची "टेस्ट मॅच" परदेशात खेळलेला हा एकमेव खेळाडू असावा. भारतीय स्पिनर्स इरापल्ली प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकट राघवन, बिशनसिंग बेदी यांच्या बॉलिंग मधील यश माझ्या मताप्रमाणे सोलकरच्या बॅट्समन जवळच्या (close in) क्षेत्ररक्षणात दडले आहे. याला अप्रत्यक्ष पणे "बिशनसिंग बेदी" यांनी एका मुलाखती मध्ये दुजोरा दिला आहे असे वाचनात आहे.
पुढे लागणारे मुंबईतील असेच एक सुप्रसिद्ध ठिकाण म्हणजे "चिरा बाजार". हा "बाजार" माहीत नाही असा ठाकुरद्वार गिरगाव परिसरातील माणूस दुर्मिळच. सकाळी लवकरच मिळणारी डायरेक्ट "ससून डॉक" वरून आलेली "ताजी मासळी" घेण्या साठी दर्दी "खव्वयांची" गर्दी बघण्यासारखी असायची. दुपारी 12 वाजून गेल्यावर इथे काही सुक्या मासळीचे "दर्दी" लोक येत असत ते "सुकेबोंबील", "सुक्या हलव्याचे तुकडे", "सुकाबांगडा" किंवा "सोडे" घ्यायला. "चिरा बाजार" हा दोन्ही प्रकारच्या मासळी, म्हणजे "ताजी आणि सुकी" उच्य प्रतीची मिळण्याचे हमखास ठिकाण असे. कारण खरेदी करणारी बहुवंश मंडळी ही समुद्र किनारपट्टीशी नाते सांगणारी म्हणजे कोकणातील असत.
पुढे लागणारी "व्हीगास स्ट्रीट" ही चिराबाजारला लागूनच असलेली वाडी म्हणजे मुंबईची मार्केटशी जवळीक सांगणारी गल्ली. नेहमी हात गाड्या, ट्रक आणि मोठी वाहने यांची गर्दी असणारी. त्या पुढची "दादी शेठ अग्यारी लेन" म्हणजे "नवी वाडी". या वाडीत लग्नपत्रिका छापणारे कारखाने होते. या वाडीतून भुलेश्वर, फणस वाडी, cp टॅंक कडे जायला पोट रस्ते होते. नंतर लागायचा तो "नाना शंकर शेट" यांचा बंगला. नाना शंकरशेट आणि मुंबई यांचा समंध माहीत नाही असा भारतीय नसेलच. या बंगल्याच्या मागील भागात सुद्धा असलेली सर्व घरे मराठीशी नाळ जोडलेली होती. "नाना शंकर शेट" बंगल्या समोरच आणखी एक प्रसिद्ध श्रीमंत हस्ती "झावबा" यांचे निवास्थान 'झावबा वाडा' आणि तिथे असलेले "साईबाबा" मंदिर खूप सुंदर होते. या "झावबा" यांची आई आणि आमची आई या "राम" मंदिरात किर्तनातील मैत्रिणी त्यामुळे आम्ही शिर्डीला कधी न जाताही या "साईबाबा" मंदिराचे दर्शन खूप वेळा घेतले आहे. आमची लहान बहीण मात्र या वाडयात खूप वेळा गेली आहे. त्याच्याच पुढे मुंबईतील एक प्रसिद्ध फोटो स्टुडिओ "वेन्गार्ड" होता. त्याच बिल्डिंग मध्ये राजेश खन्ना यांचा नातेवाईक राहत असे तो आमचा मित्र होता. या स्टुडिओ समोरच "ठाकुरद्वार पोस्ट ऑफीस" आणि त्याला लागूनच "भारतीय लंच होम " नावाची खानावळ होती. भारतीय लंच होम मध्ये मिळणारे "सुके चिकन/मटण" खाल्यावर परत "खाण्या" साठी परतला नाही असा माणूस नसेल. दिवसभर तोंडात चव आणि हाताला वास रेंगाळत असे.
याच लायनीत पुढे "सुप्रसिद्ध रहस्य कथा" लेखक "बाबुराव अर्नाळकर" यांचे ऑफिस आणि त्याच्या बाजूच्या वाडीत "भटक्या ची भ्रमंती" लिहिणाऱ्या प्रमोद नवलकर या "निर्भीड" आणि "बेदरकार" नगरसेवकाचे घर. पुढे हेच प्रमोद नवलकर शिवसेनेचे प्रथम आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेचा दक्षिण मुंबईतील आधार स्तंभ असलेले नवलकर गिरगावकरांचे पण आधार होते. थोडे पुढे "गोरा राम" आणि "काळा राम" ही ठाकरद्वार आणि गिरगावकारांची "भक्ती स्थाने" म्हणजे "मंदिरे" लगेचच दृष्टिपथात येतात.
या दोन्ही मंदिराना वेगळे करणारी वाडी म्हणजे आमची प्रसिद्ध "झावबा वाडी". या वाडीचे वैशिट्य म्हणजे त्या काळात "टॅक्सीवाले" आत यायला घाबरत असत, कारण या वाडीला 4/5 उप वाड्या होत्या त्यातील एक "धसवाडी". इथे जर एखादा माणूस ट्याक्सितून उतरला तर कुठे गायब होईल कळणार नाही हे बहुधा सर्वानाच माहीत होते. झावबा वाडीतुन कुठेही म्हणजे भुलेश्वर, नविवाडी, फणस वाडी, कोळीवाडी असे अनेक ठिकाणी जायला चोर वाटा होत्या. या वाडीतील प्रसिद्ध बिल्डिंग म्हणजे "बोऱ्याच्या बंगला", ज्याचा उल्लेख "नाथमाधव" यांच्या "सोनेरी टोळी"या पुस्तकात पण आला आहे. इथेच एक "हॉस्टेल" पण होते, "नॅशनल हॉस्टेल" नावाप्रमाणेच या हॉस्टेल मध्ये बऱ्याच मान्यवर व्यक्ती ज्यांना मुंबईत हक्काचे घर नव्हते ते रहात असत. यात प्रकर्षाने पद्मा चव्हाण, विमल जोशी आणि एकदोन अभिनेते, एक मराठी प्रसिद्ध शास्त्रीय गायक,सरस्वती चंद्र सिनेमाचा नायक "मनीष" , मंत्रालयातील सचिव, ग्रह खात्यातील पोलीस निरीक्षक असे अनेक जण रहात होते. बाजूलाच असलेल्या "लताकुंज" या बिल्डिंग मध्ये राहणारी सुहास जोशी, बोऱ्याच्या बंगल्यात लता मंगेशकर यांचे घरी पूजा करणारे जोशी गुरुजी. तसेच लहानपण इकडेच गेलेली मंडळी म्हणजे प्रदीप पटवर्धन, निवेदिता जोशी , स्वप्नील जोशी इंदुमती पैगंणकर, अशी मातब्बर मंडळी या मूळे "झावबा वाडी" म्हणजे "सितांरोकी मंझील"च होती. झावबा वाडीच्या नाक्यावर वाडीतून बाहेर पडताना डाव्या बाजुला लागते ते "गोरा राम मंदिर" प्रशस्त आहे. या मंदिराच्या आवारात अनेक फुलांची झाडे होती त्यात प्रामुख्याने भक्तांना आणि "इतरांनाही" आवडणारे झाड म्हणजे "बकुळी" च्या फुलांचे या झाडाला चौथरा होता तिथे बसून "बकुळी"ची फुले वेचने आणि त्या सुगंधात त्या चौथऱ्यावर बसने हे अनेक प्रेमीकनाही आवडायचे. तसेच वाडीच्या उजव्या बाजूला असलेले "काळा राम" मंदिर पण एकदम सुंदर आणि प्रशस्त आहे. इतिहास काय तो माहीत नाही पण आमचा समज असा होता की "गोरा राम" मंदिरातील संगमरवरी मूर्ती मुळे याला "गोरा राम मंदिर" हे नाव असावे आणि "काळा राम" मंदिरात असलेल्या "काळ्या पाषाणात" असलेल्या मूर्ती मुळे ते "काळा राम मंदिर". अशी नावे पडली असावीत. या दोन मंदिरा समोर असलेल्या देना वाडी म्हणजे देवकरण नानजी वाडी, हेमराज वाडी आणि करेल वाडी. या तिन्ही वाड्या वेगवेगळी वैशिष्ट्य बाळगून आहेत म्हणजे देना वाडीच्या नाक्यावर असलेली ठाकुरद्वार करांच्या जिव्हाळ्याची देना बँक आणि वाडीत सुरवाती पासून शेवट पर्यंत दोन्ही बाजूला असलेल्या दोनच लांबच्या लांब अखंड चाळी. या वाडी शेजारी आमची शाळा "मराठा मंदिर" आणि त्याच्या मागे असलेली कामत चाळ ही "मालवणी" वस्ती साठी प्रसिद्ध. पुढेच लागणाऱ्या "हेमराज वाडीत" माझ्या माहिती प्रमाणे गुजराथी सिनेमात काम करणारा कलावंत "अरविंद पंड्या" आणि मराठी नाट्य सिनेमाचे दिगदर्शक "राजू पार्सेकर" हे रहात असत. या वाडीशी मी आणि माझा मित्र विजय यांचे पण नाजूक नाते होते. या वाडीच्या नाक्यावर "तांबे हॉटेल" होते तिथे "झणझणीत" उसळ बरोबर "लसूण युक्त बटाटा वडा" खाताना नाकातोंडातून पाणी येत असे चव तर बहारदार होती. "करेल वाडी" च्या नाक्यावर असलेले "ज्योती हॉटेल" आणि ठाकुरद्वार चौकात कोपऱ्यावर असलेले "सन शाईन" हे इराणी हॉटेल या दोन हॉटेल मध्ये आम्ही मित्रानी तरुणपणातले किती तास घालवले हे आठवणे तसे कठीणच आहे. त्यातल्या त्यात "सन शाईन" मध्ये चहाचे घुटके घेत "मशीन मध्ये" कॉइन टाकून आवडीची गाणी तासन तास ऐकणे हा छंद होता. या चौकात असलेल्या "सरस्वती निवास" मध्ये "राजेश खन्ना" चे निवासस्थान आणि इमारती खाली असलेले "कल्याणजी आनंदजी" यांच्या मालकीचे किराणा मालाचे दुकान प्रसिद्ध आहेच.
लगेच नजरेत येणारे तीन "महाल" म्हणजे "सूर्य महाल", "चंद्र महाल" आणि "मापला महाल" यांचे नाव "महाल" असले तरी त्या 3 मजली चाळीच होत्या. मापला महाल मध्ये सिनेनटी "चेंना रुपारेल" राहायची हिचे वडील सुप्रसिद्ध कवी होते. त्याच्या पूढेच बहुधा हे तीन "महाल" होते म्हणून असलेला "सरकार तबेला" आहे. असे वाचण्यात आहे की या गल्लीत इंग्रज सरकारची "घोड्याची पाग" होती. या "सरकार तबेल्या" बाहेरच एक मोठे घड्याळाचे दुकान होते "अरुणोदय वॉच कंपनी" तिथे घड्याळ देखभाल दुरुस्ती आणि विक्री होत असे. पुढे आहे ती प्रसिद्ध "मांगल वाडी" जिथे कल्याणजी आनंदजी याचे घर आणि "ब्लफ मास्टर" या "शम्मी कपूर" अभिनित चित्रपटातील दहीहंडी फोडण्याचा काही भाग चित्रित केल्या मुळे प्रसिद्ध पावली. पुढे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे भालेराव नाट्य मंदिर असलेली "केळे वाडी" आणि समोरच असलेली एक छोटी गल्ली ही ठाकुरद्वार येथे असलेली "पत्ते" कंपनीचा "स्टार क्लब" असलेली गल्ली "बोरभाट लेन". मग येणारि सदाशिव लेन आणि समोरच असलेली गाय वाडी. गाय वाडीत असलेली बेकरी म्हणजे गिरगावकरांची पाव , खारी, नांन कटाई खरेदी करायची आवडती जागा आणि समोर सदाशिव लेन मध्ये असलेले स्वामी समर्थ मंदिर हे मुंबईत "स्वामी" आले होते त्या वेळी राहिलेले ठिकाण आणि आता असलेला स्वामी मठ.
इथून पुढे आहे ते "कोना रेस्टरन्ट" या हॉटेल मध्ये मिळणारी "कोथिंबीर वडी" आणी "अळूवडी"ची चव अविस्मरनिय होती. लगेच येणारी "खोताची वाडी" म्हणजे तसे मिनी गोवाच होते. या वाडीला आत मध्ये अनेक गल्ल्या असल्याने तसा तो चक्रव्यूह होता. नवख्या माणसाला आत सोडले तर त्याचे बाहेर येणे तसे कठीणच होते कारण सगळ्या गल्या आणि बंगले यांची गोंधळात टाकणारी रचना. या वाडीत दोन प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे A1 वेफर्स ही वेफर्स बनवण्याची फॅक्टरी आणि दुसरे म्हणजे "अनंत आश्रम" ही दर्दी खवय्यांची खानावळ. या खानावळीत जेवण केले नसतील असे मराठी कलाकार आणि गायक, गायिका मिळणे मुश्किलच. अति सुंदर आणि चविष्ट मांसाहारी त्यातल्या त्यात माशाचे जेवण करावे तर ते "अनंताश्रमात" असे तिथे जेवल्यावर प्रत्येकाच्या कडून ऐकायला मिळते, आणि आमचा अनुभव आहेच. समोरच्या फुटपाथ ला असलेले पणशीकर पियुष साठी प्रसिद्ध आहेतच. नंतर होता तो "मॅजेस्टिक सिनेमा" मोकळी जागा आणि सुंदर परिसर असलेले मराठी सिनेमाचे ठिकाण. मॅजेस्टिक समोरच्या गल्लीच्या आसपास सुप्रसिद्ध स्टार "जितेंद्र" रहात असे. मॅजेस्टिक च्या शेजारीच "मॅजेस्टिक बुक स्टॉल" होते यांच्या कडे महाराष्ट्र लॉटरी ची सोल agency होती . त्याचाच शेजारचे "राजा रिफ्रेशमेन्ट" हे दाक्षिणात्य पदार्थांचे चे आस्वाद देणारे ठिकाण होते. पुढे लागणारा प्रसिद्ध चौक म्हणजे "प्रार्थना समाज" इथे असलेले चर्च खूप जुने आहे असे म्हणतात. असा हा बोरिबंदर ते प्रार्थना समाज हा प्रवास 1964 पर्यंत, पायी, टॉक्सिने, बसने करण्यापेक्षा, त्या काळी म्हणजे 1963/1964 पर्यंत उपलब्ध असलेल्या "ट्राम" नावाच्या अतिमहत्वाच्या वाहनाने करण्यात काही और मजाच होती ती नंतरच्या पिढीला मिळाली नाही हे त्यांचे दुर्दैव.
लेखक - रमेश नेवगी
Comments
Post a Comment