व्यक्तिचरित्र - स्वामी दयानंद सरस्वती
परिचय व कार्य स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म ७ मार्च, १८२४ रोजी काठेवाड (गुजरात) मधील मोर्वी संस्थानातील टंकारा या गावी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मूळशंकर असे होते. त्यांचे वडील अंबाशंकर हे सनातनी विचारांचे च धार्मिक प्रवृत्तीचे होते; त्यामुळे बालपणी त्यांच्यावर धार्मिक विचारांचे संस्कार झाले. स्वामी दयानंदांच्या जीवनातील बालपणीच्या एका प्रसंगाने त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे कार्य केले. एका महाशिवरात्रीच्या दिवशी ते महादेवाची पूजा करण्यासाठी आपल्या वडिलांसमवेत रात्रीच्या वेळी देवळात गेले असता तेथे महादेवाच्या पिंडीवर उंदीर फिरत असल्याचे व देवापुढे ठेवलेला प्रसाद उंदीर खात असल्याचे दृश्य त्यांना पाहावयास मिळाले. हे दृश्य पाहून मूर्तीत काही सामर्थ्य नसते, तेव्हा मूर्तिपूजेला काही अर्थ नाही; असे त्यांना वाटू लागले. त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. परमेश्वराचे सत्य स्वरूप जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली आणि तेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले. पुढे घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांच्या लग्नाविषयी विचार चालविला असता त्यांनी घरातून पलायन केले- इ. स. १८४५...