भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 20
अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्कपिध्वजः ।
प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ।
हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ॥२०॥
शब्दार्थ
अथ - त्यानंतर
व्यवस्थितान् - स्थित
दृष्ट्वा - पाहून
धार्तराष्ट्रान् - धृतराष्ट्रपुत्र
कपि-ध्वज: - ज्याच्या ध्वजावर हनुमानाचे चिन्ह आहे
प्रवृत्ते - युद्ध आरंभ होण्यापूर्वी
शस्त्र-सम्पाते - बाण चालविण्यापूर्वी
धनु: - धनुष्य
उद्यम्य - उचलून
पाण्डव: - पांडुपुत्र
हृषीकेशम् - भगवान श्रीकृष्णांना
तदा - त्या वेळी
वाक्यम् - शब्द
इदम् - हे
आह - म्हणाला
मही-पते - हे राजन्
अर्थ
हनुमानाचे चिह्न असलेल्या ध्वजाच्या रथावर आरूढ असलेला पांडुपुत्र अर्जुन त्या वेळी धनुष्य हाती घेऊन बाण सोडण्यास सज्ज झाला. हे राजन्! व्यूहरचनेतील धृतराष्ट्रपुत्रांकडे पाहून अर्जुन भगवान श्रीकृष्णांना पुढीलप्रमाणे म्हणाला.
तात्पर्य
युद्धाला आरंभ होण्यास कालावधी होता. वरील कथनावरुन समजून यते की, युद्धभूमीवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांद्वारे मार्गदर्शित पांडवसेनेची अनपेक्षित व्यूहरचना पाहून धृतराष्ट्रपुत्र किंचित निराश झाले होते. अर्जुनाच्या ध्वजावरील हनुमानाचे चिन्ह हे विजयाचे आणखी एक लक्षण आहे. कारण राम-रावण युद्धामध्ये हनुमानाने प्रभू श्रीरामचंद्रांना साहाय्य केले होते. आता राम आणि हनुमान दोघेही अर्जुनाला साहाय्य करण्यासाठी त्याच्या रथावर आरूढ होते, भगवान श्रीकृष्ण म्हणजेच स्वत: श्रीराम आहेत आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीराम आहेत, त्या ठिकाणी त्यांचा नित्य सेवक हनुमान आणि त्यांची नित्य सहचारिणी भाग्यलक्ष्मी श्रीमती सीतादेवी उपस्थित असतात. म्हणून कोणत्याही शत्रूकडून अर्जुनाला भयभीत होण्याचे कारणच नव्हते आणि सर्वांत मुख्य गोष्ट म्हणजे इंद्रियांचे स्वामी स्वत: भगवान श्रीकृष्ण त्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. याप्रमाणे अर्जुनाला युद्ध करण्यासाठी हितकारक मार्गदर्शन प्राप्त होते आणि भगवंतांनी निर्माण केलेल्या अशा आशादायक परिस्थितीमुळे युद्धामध्ये निश्चितपणे विजयी होण्याची खात्री होती.
Comments
Post a Comment