व्यक्तिचरित्र - राजा राममोहन रॉय

 

भारतीय प्रबोधनाचे जनक

एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी ज्या भारतीय विचारवंतांनी सामाजिक सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता प्रतिपादन केली, त्यांमध्ये राजा राममोहन रॉय यांचा अग्रक्रम लागतो. त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे व प्रत्यक्ष कार्याद्वारे भारतीय समाजाला परंपरेच्या विळख्यातून मुक्त करून आधुनिक काळात आणण्याचा सर्वप्रथम प्रयत्न केला. भारतातील धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या चळवळीचे तेच 'आद्य प्रवर्तक' होत; म्हणून त्यांना 'भारतीय प्रबोधनाचे जनक' असे म्हटले जाते. त्यांनी या संदर्भात केलेल्या कार्याची तसेच त्यांच्या विचारांची थोडक्यात माहिती आता आपण पाहू.

परिचय व कार्य

राजा राममोहन रॉय यांचा जन्म २२ मे, १७७२ रोजी बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील 'राधानगरी' या गावी एका सुखवस्तू व सनातनी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांनी लहान वयात फारसी व अरबी भाषांचा अभ्यास केला होता. संस्कृतवरही त्यांचे प्रभुत्व होते. पुढे इंग्रजी, फ्रेंच, लॅटिन, हिब्रू व ग्रीक भाषांचेही त्यांनी अध्ययन केले. अशा प्रकारे विविध भाषांचे ज्ञान त्यांनी मिळविले असल्याने निरनिराळ्या धर्मग्रंथांचा मुळातून अभ्यास करणे व त्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणे त्यांना शक्य झाले.

राजा राममोहन रॉय यांनी वयाच्या पंधराव्या वर्षीच बंगाली भाषेत एक पुस्तिका लिहून मूर्तिपूजेवर टीका केली आणि मूर्तिपूजेला वेदांचा आधार नाही, असे प्रतिपादन केले. या त्यांच्या बंडखोर विचारांमुळे त्यांच्या कुटुंबीयांशीही त्यांचे मतभेद झाले आणि त्यांना घर सोडावे लागले.

इ. स. १८०५ मध्ये रॉय यांनी ईस्ट इंडिया कंपनीत नोकरी धरली. पुढे १८०९ मध्ये त्यांची शिरस्तेदार म्हणून नियुक्ती झाली; पण १८१४ मध्ये त्यांनी नोकरीचा त्याग केला व कोलकाता (कलकत्ता) येथे राहावयास गेले. त्या ठिकाणी ते युनिटेरियन पंथाच्या खिस्ती मिशनऱ्यांच्या सहवासात आले; त्यामुळे त्यांना ख्रिस्ती धर्माविषयी आणखी अध्ययन करण्याची संधी उपलब्ध झाली.

इ. स. १८१५ मध्ये रॉय यांनी 'आत्मीय सभे' ची स्थापना केली. इ. स. १८१८ पासून त्यांनी सतीच्या अनिष्ट प्रथेविरुद्ध जोरदार मोहीम उघडली. या संदर्भात त्यांनी केलेल्या लोकजागृतीच्या कार्यामुळेच लॉर्ड विल्यम बेंटिंक याने ४ डिसेंबर, १८२९ रोजी सतीच्या प्रथेला बंदी घालणारा कायदा संमत केला. बालविवाह, बालहत्या, केशवपन, बहुपत्नीकत्व यांसारख्या प्रथांनाही रॉय यांनी विरोध केला. विधवा पुनर्विवाहाचेही त्यांनी समर्थन केले. स्त्रियांना समान हक्क असावेत असा त्यांचा आग्रह होता. राजा राममोहन रॉय यांनी इ. स. १८२७ मध्ये 'ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन' नावाची संस्था स्थापन केली. त्यानंतर २० ऑगस्ट, १८२८ रोजी त्यांनी 'ब्राह्मो समाजा'ची स्थापना केली. 'ब्राह्मो समाज' हा हिंदुस्थानातील नवीन धर्मसंस्था व धर्मसंप्रदाय यांची गंगोत्रीच ठरला.

१९ नोव्हेंबर, १८३० रोजी राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी हाऊस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढे साक्ष देताना भारतीय प्रशासनाच्या जवळजवळ प्रत्येक शाखेत महत्त्वाच्या सुधारणा सुचविल्या. या प्रश्नांवर हाऊस ऑफ कॉमन्सशी सल्लामसलत करणारे ते पहिले भारतीय होत. २७ सप्टेंबर, १८३३ रोजी ब्रिस्टॉल येथे त्यांचा मृत्यू झाला.

धर्मविषयक विचार

राजा राममोहन रॉय हे धर्मसुधारक व सत्याचे उपासक होते. त्यांनी हिंदू, ख्रिस्तां मुस्लिम, बौद्ध अशा अनेक धर्माचे अध्ययन केले होते. सर्वच धर्मांविषयी त्यांना आदर व आपलेपणा वाटत होता. मुस्लिम धर्मातील एकेश्वरवाद व ख्रिस्ती धर्मातील नीतीविषयक तत्त्वे व मूल्ये यांनी ते प्रभावित झाले होते. विविध धर्मांच्या अभ्यासावरून सर्वच धर्माज्ञ एकेश्वरवादाचा पुरस्कार केला असल्याचे त्यांच्या प्रत्ययास आले. विविध धर्म व धर्मपंच यांच्या ऐक्यावर त्यांचा विश्वास होता. रॉय एकेश्वरवादाचे पुरस्कर्ते असल्याने हिंदू धर्मातील अनेकेश्वरवादाला त्यांनी विरोध केला. ते मूर्तिपूजेच्याही विरुद्ध होते. आत्म्याच्या अमरत्वावर त्यांचा विश्वास होता.

शिक्षणक्षेत्रातील कार्य

राजा राममोहन रॉय यांचे शिक्षणक्षेत्रातील कार्यही अतिशय मोलाचे आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच कोलकात्यास 'हिंदू कॉलेज'ची स्थापना झाली. भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्यात यावे असा त्यांनी आग्रह धरला व त्याकरिता सरकारकडे प्रयत्न केले. इंग्रजी सत्ता ही भारतीय लोकांना मिळालेली दैवी देणगी आहे; कारण तिच्यामुळेच भारतीयांना आधुनिक ज्ञान व विज्ञान यांचा लाभ झाला, असे त्यांचे मत होते.

रॉय यांनी विपुल लेखन केले. 'आधुनिक बंगाली गद्याचा जनक' असा त्यांचा उल्लेख केला जातो. वृत्तपत्रस्वातंत्र्याचा त्यांनी हिरीरीने पुरस्कर केला. 'संवाद कौमुदी' नावाचे पाक्षिक त्यांनी चालविले. या पाक्षिकाची सुरुवात ४ डिसेंबर, १८२१ रोजी झाली. 'मिरात-उल्-अखबार' (१८२२) नावाचे फारसी भाषेतील साप्ताहिकही त्यांनी चालविले होते. राजकीय विचारांच्या क्षेत्रात ते उदारमतवादाचे पुरस्कर्ते होते.

योग्यता

राजा राममोहन रॉय यांनी धर्मसुधारणा व समाजसुधारणा या क्षेत्रांत केलेली कामगिरी त्यांच्या द्रष्टेपणाची साक्ष देते. भारतीय समाजजीवनात निर्माण झालेली विकृती दूर करून त्याची निकोप पायावर उभारणी करण्यासाठी रॉय यांनी अविरत प्रयत्न केले. त्यांनी भारतात आधुनिक युगाची सुरुवात केली; म्हणून त्यांना 'भारतीय प्रबोधनाचे जनक' असे म्हटले जाते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतात एकोणिसाव्या शतकात धर्मसुधारणेची प्रचंड लाट उसळली आणि या लाटेने हिंदू धर्मात जे जे अपवित्र व जे जे अमंगल होते ते ते सर्व धुऊन टाकण्याचा प्रयत्न केला. अधोगतीकडे वाटचाल करू लागलेल्या भारतीय समाजाला त्यांनी नवविचारांचा मंत्र देऊन त्याची अधोगती रोखण्याचे कार्य केले. आपल्या देशबांधवांनी बुद्धिवादाची कास धरावी, यासाठी ते अखेरपर्यंत प्रयत्नशील राहिले.

राजा राममोहन रॉय यांनी विविध क्षेत्रांत केलेली कामगिरी पाहता 'आधुनिक भारताचे निर्माते' असा त्यांचा जो गौरव केला जातो तो उचितच म्हणावा लागेल. केशवचंद्र सेन हे समाजसुधारणेचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी स्त्री-शिक्षण, विधवा- विवाह यांचा पुरस्कार केला. तसेच बालविवाह, बहुपत्नीकत्व इत्यादी अनिष्ट प्रथांना विरोध केला; परंतु त्यांनी आपल्या अल्पवयीन कन्येचा विवाह कुचबिहारच्या महाराजांशी करून दिला. त्यांची ही कृती त्यांच्या अनुयायांना आवडली नाही; त्यामुळे भारतीय ब्राह्मो समाजातील आनंदमोहन बोस, शिवचंद्र देव, उमेशचंद्र दत्त, शिवनाथ शास्त्री इत्यादी अनेक कार्यकर्ते त्या संघटनेतून बाहेर पडले आणि त्यांनी इ. स. १८७८ मध्ये आपला वेगळा 'साधारण ब्राह्मो समाज' स्थापन केला.

Comments

Popular posts from this blog

In the Sargasso Sea by Thomas Allibone Janvier (दर्जा : ****)

Indian Postal Stamp - Surakshit Jayen Prashikshit Jayen

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)