व्यक्तिचरित्र - महात्मा जोतीबा फुले
स्त्रिया व अस्पृश्यांसाठी कार्य
महात्मा जोतीबा फुले यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले; परंतु त्यांचा लढा कोणत्याही एका विशिष्ट जातीविरुद्ध नव्हता. महात्मा फुले हे खरेखुरे मानवतावादी होते. अन्याय व शोषण यांचे बळी ठरलेल्या सर्वच समाजघटकांविषयी त्यांना कणव होती. त्यांच्यावरील अन्यायाचे निराकरण करणे हेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले होते.
भारतीय समाजातील अन्यायाचा बळी ठरलेले दोन प्रमुख घटक स्त्रिया व अस्पृश्य हे होते; म्हणून महात्मा फुले यांनी आपल्या कार्याची सुरुवात त्यांच्यापासून करावयाची ठरविले. फुल्यांच्या काळात स्त्रियांची स्थिती अतिशय वाईट होती. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता; त्यामुळे त्या मागासलेल्या राहिल्या होत्या. अनेक प्रकारच्या बंधनांत त्या जखडल्या गेल्या होत्या; म्हणून फुले यांनी प्रथम स्त्रियांच्या शिक्षणाकडे आपले लक्ष वळविले. इ. स. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. ही शाळा बुधवार पेठेतील भिड्यांच्या वाड्यात भरत असे. त्यानंतर रास्ता पेठ व वेताळ पेठ येथे मुलींच्या आणखी दोन शाळा त्यांनी सुरू केल्या. त्यांच्या या कार्याबद्दल सरकारने १६ नोव्हेंबर, १८५२ रोजी विश्रामबागवाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला.
स्त्रियांप्रमाणेच त्या काळात अस्पृश्यांची सामाजिक स्थितीही अतिशय दयनीय होती; म्हणून फुल्यांनी अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्यही हाती घेतले. इ. स. १८५२ मध्ये त्यांनी वेताळ पेठेत अस्पृश्याच्या मुलांसाठी दोन शाळा उघडल्या. पुढे १८५३ मध्ये त्यांनी आपल्या काही मित्रांच्या सहकायनि 'महार, मांग इत्यादी लोकांस विद्या शिकविण्याकरिता मंडळी' या नावाची संस्था स्थापन केली.
अस्पृश्यांसाठी शाळा स्थापन करण्याबरोबरच महात्मा फुल्यांनी अस्पृश्यांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी व त्यांच्यात जागृती घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी अस्पृश्यांमध्ये शिक्षणाची गोडी उत्पन्न केली. उन्हाळ्यात अस्पृश्यांचे पाण्याविना हाल होत असल्याचे पाहून ज्योतीबांनी सन १८६८ मध्ये आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यासाठी खुला केला. तसेच अस्पृश्यांमधील काही व्यक्तींना हाताशी धरून त्यांना संघटित करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला.
सत्यशोधक समाज
महात्मा फुले यांचे सर्वांत महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील शूद्रातिशूद्र बहुजन समाजाला जागृत करून त्यास सामाजिक अन्यायाच्या प्रतिकारासाठी सज्ज बनविले हे होय. फुलेंचा विषमता, अन्याय व शोषण यांवर आधारित समाजव्यवस्थेला विरोध होता. त्यासंबंधीची आपली भूमिका अतिशय स्पष्ट व परखड शब्दांत त्यांनी सार्वजनिक सत्यधर्म, अस्पृश्यांची कैफियत, ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड इत्यादी ग्रंथांतून मांडली आहे.
जोतीबा फुले यांचे असे मत होते की, आपल्या समाजातील वरिष्ठ जातींनी आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक इत्यादी सर्व क्षेत्रांत स्वतःची मक्तेदारी निर्माण करून शूद्रातिशूद्र बहुजन समाजाला गुलाम बनविले आहे. त्यांनी असे म्हटले होते की, जातिभेदाचे मूळ ब्राह्मणांच्या स्वार्थी धर्मांधतेत आणि अहंकारात आहे. ब्राह्मणांनी खोटे धर्मग्रंथ निर्माण करून कनिष्ठ जातींवर आपली मानसिक गुलामगिरी लादली आणि बहुजन समाजाला अज्ञानात ठेवून स्वतः सर्व सत्तास्थाने बळकाविली. धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रांत तर ब्राह्मणांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केलेच; परंतु त्याच्या जोरावर राजकीय व आर्थिक सत्तास्थानेही त्यांनी बळकाविली. अशा प्रकारे वरिष्ठ ब्राह्मण वर्गाने सर्व विशेषाधिकार स्वतःकडे ठेवून कनिष्ठ वर्गांना आपल्या स्वार्थासाठी राबवून घेतले. आपल्या 'गुलामगिरी' या ग्रंथात “ब्राह्मण लोक तुम्हाला लुटून खात आहेत हे माझ्या शूद्र बांधवांना सांगण्याच्या हेतूनेच मी हा प्रस्तुत ग्रंथ लिहीत आहे" असे जोतीबांनी म्हटले आहे.
समाजातील शूद्रातिशूद्र कनिष्ठ वर्गांनी संघटित होऊन आपल्या न्याय्य हक्कांसाठी ब्राह्मणी वचस्वाविरुद्ध संघर्ष केला पाहिजे, असे जोतीबांना वाटत होते. त्यांनी असे म्हटले होते की, झगडा केल्याशिवाय नष्ट झालेले मानवी अधिकार परत मिळणार नाहीत. वरिष्ठ वर्ग स्वतःस मिळालेल्या सवलती, अधिकार, सत्ता व दर्जा सहजासहजी सोडणार नाहीत; म्हणून बहुजन समाजाने वरिष्ठ वर्गांच्या वर्चस्वाचा संघटितपणे पाहिजे आणि हे वर्चस्व मोडून काढले पाहिजे. याच उद्देशाने महात्मा फुल्यांनी २४ सप्टेंबर, १८७३ रोजी पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ते या समाजाचे पहिले अध्यक्ष व कोषाध्यक्ष बनले.
सत्यशोधक समाजाची मुख्य तत्त्वे
(१) ईश्वर एकच असून तो निर्गुण-निराकार आहे.
(२) सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत.
(३) परमेश्वराची भक्ती करण्याचा प्रत्येक मानवाला अधिकार आहे.
(४) परमेश्वराची भक्ती करण्यास मध्यस्थाची गरज नाही. तेव्हा कोणत्याही व्यक्तीला पुरोहित वर्गाच्या मध्यस्थीविना आपल्या प्रिय परमेश्वराची उपासना करता येते.
(५) माणसाला जातीने नव्हे तर गुणांनी श्रेष्ठत्व प्राप्त होते.
(६) पुनर्जन्म, कर्मकांड, जपजाप्य इत्यादी गोष्टी अज्ञानमूलक आहेत व त्या कनिष्ठ वर्गांच्या पिळवणुकीचे कारण आहेत.
(७) कोणताही धर्मग्रंथ ईश्वरनिर्मित नाही. सर्व धर्मग्रंथांची निर्मिती मानवानेच केली आहे.
सत्यशोधक समाजाचे कार्य
येथील बहुजन समाजाला संघटित करून त्यास वैचारिकदृष्ट्या जागृत करणे आणि त्याला आपल्या हक्कांची जाणीव करून देणे हे कार्य महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केले. अनेक ठिकाणी त्यांनी सत्यशोधक समाजाच्या शाखा स्थापन केल्या आणि त्यांच्याद्वारे लोकशिक्षणाची मोहीम उघडली. समाजातील सर्व जातिधर्मांच्या लोकांना या संघटनेचे सभासदत्व स्वीकारण्यास मुभा होती.
सत्यशोधक समाजाच्या स्थापनेने महाराष्ट्रात सामाजिक व सांस्कृतिक क्रांतीच घडून आली. बहुजन समाजातील लोक मोठ्या संख्येने या संघटनेत सामील होऊ लागले आणि त्यांनी वरिष्ठ जातींच्या वर्चस्वाविरुद्ध सर्वंकष लढा पुकारला. सत्यशोधक समाजाच्या रूपाने बहुजन समाजाची अस्मिता जागी झाली. सामाजिक न्याय व सामाजिक पुनर्रचना यांचा आग्रह त्याने धरला; त्यामुळे येथील पारंपरिक समाजव्यवस्थेला प्रथमच जोराचा हादरा बसला. वरिष्ठ जातींच्या मानसिक गुलामगिरीतून बहुजन समाज हळूहळू मुक्त होऊ लागला. महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात सामाजिक परिवर्तनाची जी महान चळवळ उभी राहिली तिचे श्रेय महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाद्वारे घडवून आणलेल्या या वैचारिक जागृतीलाच द्यावे लागते.
Comments
Post a Comment