व्यक्तिचरित्र - स्वामी दयानंद सरस्वती

परिचय व कार्य

स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म ७ मार्च, १८२४ रोजी काठेवाड (गुजरात) मधील मोर्वी संस्थानातील टंकारा या गावी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव मूळशंकर असे होते. त्यांचे वडील अंबाशंकर हे सनातनी विचारांचे च धार्मिक प्रवृत्तीचे होते; त्यामुळे बालपणी त्यांच्यावर धार्मिक विचारांचे संस्कार झाले.

स्वामी दयानंदांच्या जीवनातील बालपणीच्या एका प्रसंगाने त्यांच्या जीवनाला कलाटणी देण्याचे कार्य केले. एका महाशिवरात्रीच्या दिवशी ते महादेवाची पूजा करण्यासाठी आपल्या वडिलांसमवेत रात्रीच्या वेळी देवळात गेले असता तेथे महादेवाच्या पिंडीवर उंदीर फिरत असल्याचे व देवापुढे ठेवलेला प्रसाद उंदीर खात असल्याचे दृश्य त्यांना पाहावयास मिळाले. हे दृश्य पाहून मूर्तीत काही सामर्थ्य नसते, तेव्हा मूर्तिपूजेला काही अर्थ नाही; असे त्यांना वाटू लागले. त्या वेळेपासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली. परमेश्वराचे सत्य स्वरूप जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली आणि तेच त्यांनी आपले जीवितकार्य मानले.

पुढे घरातील वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांच्या लग्नाविषयी विचार चालविला असता त्यांनी घरातून पलायन केले- इ. स. १८४५. त्या वेळेपासून ते इ. स. १८६० पर्यंत सुमारे १५ वर्षे त्यांनी देशाच्या विविध भागांत प्रवास केला. या कालावधीत त्यांनी खऱ्या ज्ञानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. इ. स. १८६० मध्ये त्यांनी स्वामी विरजानंद सरस्वती यांचे शिष्यत्व पत्करले. इ. स. १८६४ पासून दयानंदांनी प्रवचने करीत देशभर भ्रमंती सुद्धा सुरू केली. इ. स. १८६९ मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मणांशी शास्त्रार्थावर वादविवाद केला; त्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले. सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास करणारा 'सत्यार्थ प्रकाश' हा त्यांचा ग्रंथ इ. स. १८७९ मध्ये प्रकाशित झाला.

आर्य समाजाची स्थापना

स्वामी दयानंद सरस्वतींनी ब्राह्मो समाजाच्या कार्यापासून धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा घेतली. तथापि, पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले. त्यानुसार ७ एप्रिल, १८७५ रोजी त्यांनी मुंबईत काकडवाडी येथे 'आर्य समाजा'ची थाना केली. २४ जुलै, १८७७ रोजी लाहोर येथे आर्य समाजाची शाखा स्थापन स्थापना करण्याच्या प्रसंगीच आर्य समाजाच्या घटनेला अंतिम स्वरूप देण्यात आले.

आर्य समाज

धर्मसुधारणेच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणारी दुसरी प्रमुख संघटना म्हणून "आर्य समाजा'चा उल्लेख करावा लागेल. धर्मसुधारणेच्या उत्थापनात प्रमुख भूमिका बजाविणाऱ्या ऐतिहासिक अशा या आर्य समाजाच्या स्थापनेचे श्रेय स्वामी दयानंद सरस्वती यांच्याकडे जाते.

आर्य समाजाची तत्त्वे

या समाजाची तत्त्वे पुढीलप्रमाणे सांगता येतील-

(१) सर्व यथार्थ ज्ञानाचा उगम परमेश्वर असून सर्व वस्तू परमेश्वराच्या स्वरूपात आहेत.

(२) परमेश्वर हा सच्चिदानंद-स्वरूप असून तो अनादि, अनंत, निराकार, सर्वसाक्षी, सर्वशक्तिमान व दयाळू आहे. परमेश्वर हा सर्व विश्वाचा निर्माता व पालक आहे. 

(३) वेद हे ईश्वरापासून निर्माण झाले असून त्यांत सर्व ज्ञानाचा उगम आहे. परमेश्वराच्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान वेदांमध्ये आहे; म्हणून वेदांचा अभ्यास करणे व त्यांतील ज्ञानाचा प्रसार करणे हे प्रत्येक आर्याचे पवित्र कर्तव्य आहे.

(४) प्रत्येक व्यक्तीने सत्याचा स्वीकार व असत्याचा त्याग करावा.

(५) प्रत्येक व्यक्तीने नीतिनियमांना अनुसरून आणि चांगल्या-वाइटाचा विचार करून सद्‌गुणांचे संगोपन व संवर्धन होईल, अशा प्रकारची कृती करावी.

(६) प्रत्येक व्यक्तीने मानवजातीची भौतिक, सामाजिक व आध्यात्मिक उन्नती करून मानवजातीच्या सर्वांगीण कल्याणाचा विचार प्रधान मानावा.

(७) प्रेम, न्याय व वैयक्तिक सद्गुण यांवर आधारित वर्तणूक ठेवणे प्रत्येकाचे कर्तव्य होय.

(८) प्रत्येक व्यक्तीने केवळ स्वतःच्या कल्याणात धन्यता न मानता दुसऱ्याच्या उत्कर्षातच आपलाही उत्कर्ष आहे, असे समजून वागावे.

आर्य समाजाचे कार्य

(१) शुद्धीकरणाद्वारे हिंदू धर्मात पुनर्प्रवेश : आर्य समाजाचा प्रसार उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर झाला. या समाजास लाला हंसराज, स्वामी श्रद्धानंद, लाला लजपतराय यांसारखे अनुयायी लाभले. आर्य समाजाने शुद्धीकरणाची मोहीम हाती घेऊन परधर्मात प्रवेश केलेल्या हिंदूंना शुद्ध करून परत हिंदू धर्मात येण्याची वाट मोकळी करून दिली

(२) शाळा-महाविद्यालयांची स्थापना : आर्य समाजाने शिक्षणक्षेत्रातही महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली. या समाजाने शिक्षण-प्रसाराच्या कार्यावर भर दिला. त्यासाठी 'गुरुकुल संस्था' व 'दयानंद अँग्लोवैदिक कॉलेज'ची स्थापना केली. देशाच्या विविध भागांत अनेक शाळा व महाविद्यालये उघडली.

(३) सामाजिक सुधारणांबाबत जनजागृती : आर्य समाजाने सामाजिक सुधारणांच्या कार्यातही लक्ष घातले. या समाजाच्या अनुयायांनी मूर्तिपूजा, जातिभेद, बालविवाह इत्यादी प्रथाविरुद्ध प्रचार करून लोकमत जागृत केले. आंतरजातीय विवाहांना उत्तेजन देण्याचे कार्यही त्यांनी केले.

(४) भारतीय संस्कृतीच्या श्रेष्ठत्वाचे प्रतिपादन : आर्य समाजाचे वेगळेपण असे की, त्याने प्राचीन भारतीय संस्कृती व वैदिक वर्णाश्रमधर्म यांचे श्रेष्ठत्व प्रतिपादन करून भारतीय संस्कृतीच्या महान परंपरेची आपल्या लोकांना जाणीव करून दिली व त्यायोगे त्याने हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन घडवून आणले. मात्र त्याच वेळी या धर्मातील अनिष्ट प्रथा व दोष दूर करण्याच्या गरजेवरही भर दिला.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा