भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 4
अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।
युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥४॥
शब्दार्थ
अत्र - येथे
शूरा: - शूरवीर
महा-इषु-आसा: - महान धनुर्धर
भीम-अर्जुन - भीम आणि अर्जुन
समा: - बरोबरीचे
युधि - युद्धामध्ये
युयुधान: - युयुधान
विराट: - विराट
च - सुद्धा
द्रुपद: - द्रुपद
च - सुद्धा
महा-रथ: - महान योद्धा
अर्थ
येथे (या सैन्यामध्ये) भीम आणि अर्जुन यांच्याबरोबरीचे शूर आणि महान धनुर्धर आहेत. तसेच युयुधान, विराट आणि द्रुपद यांच्याप्रमाणे श्रेष्ठ योद्धेसुद्धा आहेत.
तात्पर्य
द्रोणाचार्यांच्या बलशाली आणि निपुण युद्धकलेसमोर धृष्टद्युम्न काही फारसा मोठा अडथळा नव्हता, तरी भय वाटण्यासारखे इतरही अनेक योद्धे होते. दुर्योधन त्यांचा उल्लेख विजयाच्या मार्गातील अत्यंत मोठे अडथळे म्हणून करतो. कारण, त्यांच्यापैकी प्रत्येकजण भीम आणि अर्जुन यांच्या इतकाच शक्तिशाली होता. त्याला भीम आणि अर्जुन यांच्या शक्तीची पुरेपुर जाणीव होती म्हणून इतरांची तुलना त्याने त्यांच्याशी केली.
Comments
Post a Comment