भगवद्गीता - अध्याय 1: अर्जुनविषादयोग - श्लोक 21


अर्जुन उवाच

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ।

यावदेतान्निरिक्षेऽहं योद्‌धुकामानवस्थितान् ॥२१॥

कैर्मया सह योद्धव्यमस्मिन्रणसमुद्यमे ॥२२॥

शब्दार्थ

अजुर्न:उवाच - अर्जुन म्हणाला

सेनयो: - सैन्यांच्या

उभयो: - दोन्ही

मध्ये - मध्यभागी

रथम् - रथ

स्थापय - कृपया उभा कर

मे - माझा

अच्युत - हे अच्युत! (कधीच पतन न होणार)

यावत् - जोपर्यंत

एतान् - हे सर्व

निरीक्षे - पाहू शकेन

अहम् - मी; 

योद्धा-कामान् - युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या

अवस्थितान् - युद्धभूमीवर रचिलेल्या

कै: - कोणाबरोबर

मया - मला

सह - बरोबर

योद्धव्यम् - युद्ध करावयाचे आहे

अस्मिन् - या

रण - संघर्ष, युद्ध

समुद्यमे - प्रयत्नात, खटपटीत

अर्थ

अर्जुन म्हणाला: हे अच्युत! कृपया माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये घेऊन चल म्हणजे येथे युद्ध करण्याच्या इच्छेने प्रेरित झालेल्या  आणि ज्यांच्याबरोबर मला या भयंकर शस्त्रास्त्रस्पर्धेमध्ये संघर्ष करावयाचा आहे, त्या सर्व उपस्थितांना मी पाहू शकेन.

तात्पर्य

श्रीकृष्ण जरी पुरुषोत्तम श्री भगवान असले तरी त्यांच्या अहैतुकी कृपेमुळे ते आपल्या मित्राची सेवा करीत होते. ते आपल्या भक्तावरील प्रेमात कधीही चुकत नाहीत म्हणून त्यांना या ठिकाणी अच्युत असे संबोधण्यात आले आहे. सारथी या नात्याने त्यांना अर्जुनाच्या आदेशांचे पालन करावे लागत असे आणि हे करण्यात त्यांनी कधीच संकोच केला नाही. यासाठीच त्यांना अच्युत म्हणून संबोधण्यात आले आहे. जरी त्यांनी आपल्या भक्ताचे सारथ्य स्वीकारले होते तरी त्यांच्या परम स्थानाला कोणीच आव्हान देऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत ते सर्व इंद्रियांचे स्वामी, पुरुषोत्तम श्रीभगवान हृषीकेश आहेत. भगवंत आणि त्यांचा सेवक यांच्यामधील संबंध अत्यंत मधुर आणि दिव्य असतो. सेवक हा भगवंतांची सेवा करण्यात सदैव तत्पर असतो आणि भगवंतही सतत आपल्या भक्ताची सेवा करण्याची संधीच पहात असतात. भगवंत स्वत: आदेश देण्यापेक्षा, ते त्यांच्या शुद्ध भक्तांना स्वत:पेक्षा ज्येष्ठतेचे स्थान देऊन त्यांचा आदेश स्वीकारण्यात अधिक आनंद मिळवितात. भगवंत हे स्वामी असल्याने प्रत्येकजण त्यांच्या आज्ञेखाली असतो आणि त्यांना आज्ञा देणारा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीच नाही. परंतु जेव्हा ते पाहता की, त्यांचा शुद्ध भक्त त्यांना आज्ञा देत आहे तेव्हा जरी ते सर्व परिस्थितींत अच्युत असले तरी त्यांना दिव्यानंद प्राप्त होतो.

     भगवंतांचा शुद्ध भक्त या नात्याने अर्जुनाला आपल्या भावंडांशी व चुलत्याशी युद्ध करण्याची मुळीच इच्छा नव्हती; पण दुर्योधन हट्टी असल्यामुळे आणि शांततामय वाटाघाटी करण्यास कधीच तयार नसल्यामुळे अर्जुनाला युद्धभूमीत येणे भाग पडले. यासाठीच युद्धभूमीवरील उपस्थित ज्येष्ठ व्यक्तींना पाहण्यास तो उत्सुक होता. रणांगणावर शांततेचा प्रयत्न करण्याचा जरी प्रश्‍नच नव्हता तरी त्या व्यक्तींना पुन्हा पाहण्याची आणि एका अनावश्यक युद्धाची मागणी करण्यात ते किती कृतनिश्‍चयी आहेत, हेही पाहण्याची त्याची इच्छा होती.

Comments

Popular posts from this blog

द्वारकानाथ संझगिरी - गुजरा हुआ जमाना आता नहीं दुबारा